हठयोगाशी निगडित अनेक गोष्टी ज्ञानेंद्रला वाचून माहीत होत्या. हृदयेंद्रलाही काही काळ योगाचं आकर्षण होतं, त्यामुळे काही बाबी त्याला ऐकून माहीत होत्या. असं असलं तरी या ‘योगा’चा ‘पैल तो गे काऊ’ या अभंगाशी काय संबंध आहे, हे त्यांना समजत नव्हतं. त्यामुळे योगेंद्रच्या बोलण्याकडे त्यांचं कुतूहलपूर्वक लक्ष होतं. योगेंद्र म्हणाला..
योगेंद्र – आपण नेहमीच चर्चा करतो की खरी आध्यात्मिक वाटचाल तेव्हाच सुरू होते, जेव्हा ‘मी’पण सुटू लागतो. हा ‘मी’ नेमका काय आहे?
हृदयेंद्र – माझं हे शरीर आणि या जन्मातली माझी जी ओळख आहे तिलाच मी ‘मी’ मानत असतो. प्रत्येक जन्मी ‘मी’ बदलत असतो, ‘मी’ची बाह्य़ परिस्थिती बदलत असते, पण त्या देहाशी, भीती-काळजी-व्यथा आणि चिंतांशी माझी जखडण तशीच असते. कारण वेगळं असेल पण काळजी तशीच असते..
योगेंद्र – आता या भीती, काळजी, चिंतांची जाणीव होते कुठे? बाह्य़ परिस्थितीचा अनुकूल किंवा प्रतिकूल प्रभाव उमटतो कुठे?
हृदयेंद्र – अर्थात मनातच! मन आहे म्हणून जाणीव आहे.
योगेंद्र – याचाच अर्थ देह आणि या देहाला चिकटलेलं मन म्हणजेच ‘मी’ आहे. या ‘मी’पलीकडे जायचं तर देहात असूनही देह आणि मनाच्या पकडीतून पलीकडे जाता यायला पाहिजे. असं झालं तरच खऱ्या अर्थानं परमतत्त्वाशी ऐक्यता साधेल आणि तसं होण्यासाठीची सर्व सोयही या देहातच असली पाहिजे!
कर्मेद्र – म्हणजे?
योगेंद्र – पहा बरं, आपण जगतो ते कशाच्या जोरावर? किंवा आणखी अचूक विचारायचं तर, या देहात असं काय आहे म्हणून आपण जिवंत आहोत?
ज्ञानेंद्र – अर्थातच प्राण आहेत म्हणून मी जिवंत आहे.
योगेंद्र – हा प्राण कशाच्या आधारावर आहे?
हृदयेंद्र – श्वासोच्छ्वासाच्या..
योगेंद्र – बरोबर.. योगी लोक काय म्हणतात? ही जी प्राणशक्ती शरीरात आहे ना, तीच कुंडलिनी शक्ती आहे. या कुंडलिनी शक्तीचा आणि प्राणशक्तीचा जो प्रवाह या देहात चालतो त्याबाबत थोडं नीट पाहू. आता मला सांगा आपल्यावर दृश्य जगाचा परिणाम होतो ना?  
हृदयेंद्र – हो जगापासून आपली कधी सुटकाच नसते..
योगेंद्र – आता ‘दृश्य जग’ आपल्यावर प्रभाव पाडतं. इथे ‘दृश्य’ हा शब्दच सांगतो की जे दिसतं तेच परिणाम करतं! मग तो अनुकूल असेल नाहीतर प्रतिकूल असेल! अर्थात डोळ्यासमोरच्या जगाचाच आपल्यावर प्रभाव पडतो आणि परिणाम होतो. समोरचं जग जसं दिसतं आणि त्याचा जसा तात्काळ भला-बुरा परिणाम होतो तसं पाठिमागचं जग काही तात्काळ  दिसत नाही! अगदी त्याचप्रमाणे दृश्य दिसतं पण ते ज्या सूक्ष्म कारणातून अवतरलं, साकारलं ते दृश्या पाठीमागचं सूक्ष्म कारण आपण नेमकेपणानं जाणत नाही!
कर्मेद्र – तू काय बोलतोयंस ते तुला तरी कळतंय का?
योगेंद्र – थोडं अवघड आहे मान्य. पण अगदी बारकाईनं विचार केलात की कळेल की आपण सूक्ष्म जाणत नाही पण सूक्ष्म जाणून घेण्याची आणि त्यावर ताबा मिळवण्याचीच आपल्याला खरी ओढ असते. ते सूक्ष्म जाणायचं तर दृश्याच्या प्रभावापलीकडे जावं लागेल! त्यासाठी या स्थूल देहातल्या सूक्ष्म अशा प्राणशक्तीचा आधार घ्यावा लागेल. मी मगाशीच म्हटलं, कुंडलिनीशक्ती हीच प्राणशक्ती आहे, पण या कुंडलिनीची जाणीव आपल्याला नाही, प्राणशक्तीची जाणीव आहे. प्राण हाच आपल्या जगण्याचा आधार आहे. आता आपल्या शरीरात प्राणाचा हा प्रवाह कसा सुरू आहे? गुह्य़स्थान, बेंबी, हृदय, कंठ आणि नाक या शरीराच्या पुढील भागांतून प्राणाचा सततचा प्रवाह सुरू आहे. यालाच योगी ‘पूर्व मार्ग’ म्हणतात. प्राणांचा हा प्रवाह जरी पुढच्या मार्गानं सुरू असला तरी त्याला पाठबळ असतं ते इडा आणि पिंगला या ज्ञानतंतूंच्या दोन प्रवाहांचं. इथे मी पाठबळ म्हटलं ना? कारण या इडा आणि पिंगला पाठीच्या कण्यातच असतात! या पाठीच्या कण्याला मेरुदंड म्हणतात. या मेरुदंडाचं शरीरात फार महत्त्व आहे. मेरु पर्वताचा जसा पृथ्वीला आधार आहे, म्हणतात ना? तसा या मेरुदंडानं शरीराचा तोल सांभाळला जातो. माणसाची खरी ताकदही या पाठीच्या कण्यावरच तर जोखली जाते! एखाद्या स्वाभिमानी माणसाचं वर्णन आपण ताठ कण्याचा माणूस म्हणूनच करतो ना?
चैतन्य प्रेम