‘कुहुकुहु’ असा गोड आवाज व त्यापाठोपाठ खिडकीच्या तावदानावर चोचीने केलेली टकटक ऐकून दंडबैठका मारण्यात तल्लीन असलेल्या राहुलजींची तंद्री भंगते. थांबून बघतात तर खिडकीतून आत आलेला कोकीळ मेजावरच बसलेला. ‘मला काही बोलायचे आहे’ असे त्याने म्हणताच व्यायाम थांबवून राहुलजींनी नजर त्याच्याकडे लावली. ‘त्या संबित पात्रांनी आमची तुलना तुमच्याशी केल्यापासून आम्ही अस्वस्थ आहोत. खरे तर त्यांनी या राजकारणात आम्हाला ओढण्याचे कारण नव्हते. पण, ‘अति’ बोलण्याच्या नादात त्यांनी हे केले असावे. ते आजवर तुम्हाला आळशी म्हणायचे, पण तुमच्या आळसाची तुलना त्यांनी आमच्याशी केली हे योग्य झाले नाही. तरीही जाब विचारण्यासाठी त्यांच्याकडे न जाता तुम्ही ‘ऐकून’ घेता म्हणून इकडे आलो. हे मान्य की आम्हाला बसण्यासाठी कायम दुसऱ्याचा आधार लागतो. कधी आंबा तर कधी बाभळी असा आमचा प्रवास सुरू असतो. पण तुमचे तसे नाही ना, तुम्हाला बसण्यासाठी पक्षातील अध्यक्षपदाची खुर्ची केव्हाची वाट बघतेय पण तुम्ही अजूनही आईचा पदर सोडायला तयार नाही. आम्हाला जागा शोधाव्या लागतात. तुमच्यासाठी तर ती हक्काने चालत आलेली. तरीही तुम्ही निर्णय घेत नसाल तर याला आमचा स्वभाव कारणीभूत कसा? आमचा आवाज गोड. साऱ्यांना सुखावणारा. त्यामुळे आम्ही माणसांपासून जरा दूर राहतो. आवाजापायीच पोपटाच्या नशिबी नेहमी कैद येते तसे आमच्या बाबतीत घडू नये म्हणून. पण, तुम्ही माणसांपासून दूर का पळता आणि करता काय तर नुसता चिवचिवाट! त्याने ध्येय थोडीच साध्य होणार? हे कबूल की आम्ही घरटी बांधत नाही. अंडी द्यायची वेळ आली की कावळ्यांच्या घरटय़ात घुसखोरी करतो पण तुमचे तसे नाही ना! तुम्हाला तर वारशाने पक्षाचे घर मिळाले. त्याला सावरण्याची, सजवण्याची जबाबदारी घ्यायची सोडून दूर का पळता? खरे तर अशा प्रतिकूल स्थितीत तुम्ही घर सांभाळत पेटून उठायला हवे. तुमच्या आजोबांनी तेव्हा तेच केले. मग त्यांच्या मार्गावर आता चालण्यात तुम्हाला अडचण काय? जन्माला घातल्यावर आम्ही आपल्या पिल्लांना वाऱ्यावर सोडतो हा प्रचार खोटा. तसे काही तुमच्या बाबतीत होत असेल तर विरोधकांवर तुटून पडा ना! आम्ही पिल्लांना सूर शिकवतो. गोड आवाजात कसे गायचे ते सांगतो. सूर हाच आमच्या आयुष्याचा गाभा याची जाणीव करून देतो, पण तुमचे समर्थक काही काळानंतर बेसूर व्हायला लागतात. विरोधकांच्या सुरात सूर मिसळतात. पंखाला बळ येण्याआधीच तुमची साथ सोडून जातात. असे का? पिल्लू असो वा समर्थक, त्यांच्यात विश्वास निर्माण करायला हवा. ते सतत सोबत असले की तो निर्माण होतो. हे आम्हाला जमते, मग तुम्हाला का नाही? वसंत ऋतू हा आमच्यासाठी सर्जनाचा काळ. या काळात आमचा सूर बहरतो. तुमचा वसंत म्हणजे निवडणुका. पण नेमके त्याच काळात तुम्ही परदेशी निघून जाता व सारा मोसम ‘बेसुरा’ करून टाकता. आम्ही इवलेसे पक्षी, तुम्ही तर महान वारसा लाभलेल्या पक्षाचे नेते. त्यामुळे आपली तुलना व्हायलाच नको. ही बदनामी टाळायची असेल तर झटका आळस व लागा कामाला.’

दीर्घ स्वगत संपवून कोकीळ भुर्रकन उडून जातो तसे राहुलजी भानावर येतात. उर्वरित दंडबैठका मारायच्या की नाही, या संभ्रमात काही काळ घालवल्यावर ते मनाशी काही ठरवत उभे होतात व आळस झटकत सचिवाला तातडीने कार्यसमितीची बैठक बोलावण्याचे निर्देश देतात.