उद्योग भुईवर, सेन्सेक्स आभाळात

अ ची कथा त्याच्या पातळीवर चालू आहे. क्ष, य आणि झ यांच्या कथेशी अ चा संबंधच येत नाहीये.

प्रतिनिधिक छायाचित्र

राजीव साने – rajeevsane@gmail.com

उद्योगात प्रत्यक्ष गुंतलेले भांडवल (बुक-व्हॅल्यू) अंतर्गुतवणुकीद्वारे वाढतेसुद्धा, पण अंदाज-पजी खेळामुळे भांडवल बाजारातील चढउतार अतिशयोक्त ‘दिसतात’..

उत्पादकाला भांडवल मिळाले पाहिजे आणि ग्राहकाला क्रयशक्ती मिळाली पाहिजे ही गोष्ट आवश्यक आणि शुभ अशीच आहे. उत्पादकाने गुंतवणूकदाराला लाभांश दिला पाहिजे आणि अंतर्गत वाढ करून समभागाची बुक-व्हॅल्यू वाढवली पाहिजे. (बुक-व्हॅल्यूतील गोच्या सध्या बाजूला ठेवू.)

आता आपण अ, ब आणि क या तिघांची एक कथा कशी घडली (घडू शकते) ते पाहू. समजा अ ने, ब नावाच्या समभागधारकाकडून मिळालेल्या १०० रु. भांडवलानिशी उत्पादन करून व ते ग्राहकाला विकून, वर्षांकाठी २० रु. नफा मिळवला. याचा मोबदला म्हणून त्याने ब ला एक वर्षांनंतर १० रु. लाभांश दिला. शिवाय कमावलेल्या २० रु. नफ्यातील १० रु.ची मशीनरी घेतली आणि १००च्या समभागाची बुक-व्हॅल्यू ११० बनवून दाखवली. ब ला लाभ झाला व अ ला उद्योग सुरू करता आला.

आता असेही समजा की, ब ला पशांची गरज लागली. त्याला समभाग विकावा लागला. क नावाच्या नव्या गुंतवणूकदाराने अ च्या कामगिरीचा प्रत्यय येऊन मूळ १०० चा, आता ११० बुक-व्हॅल्यूचा, समभाग ब कडून १२० रुपयाला विकत घेतला. कारण त्याला भविष्यात अ कडून मिळणाऱ्या परताव्याचा फायदा, पुढे कायम मिळत राहाणार होता. निदान क ला तशी खात्री वाटत होती. या कथेत अ ला उत्पादक भांडवल मिळाले. ब ला १० रु.चा लाभांश आणि २० रु. भांडवली मिळकत (कॅपिटल गेन) सुद्धा मिळाली. क ला भविष्यात चांगला परतावा देणारी गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. अशा तऱ्हेने अ, ब आणि क हे तिघेही संतुष्ट झाले. इतकेच नाही तर अ च्या उत्पादनाच्या ग्राहकांना उपयोगमूल्य व कामगारांना कामही मिळाले. इथपर्यंत ‘ऑल इज वेल’!  या अ, ब आणि क कथेला आपण ‘औद्योगिक भांडवलशाही’ असे म्हणू.

आता एक अगदी वेगळी कथा पाहू या. क्ष, य आणि झ अशी पात्रे आहेत.

‘अंदाज-पजी’ वित्तबाजार 

काही वर्षांनंतर, जेव्हा अ ने आपली बुक व्हॅल्यू फक्त १४० रु. इतकीच वाढवलेली होती, तेव्हा त्याच्या कानावर आले, की एक य नावाचा (यडचॅप!) माणूस ५०० रु. देऊन आपला समभाग घेऊ इच्छितोय! अ हा अत्यंत सज्जन माणूस (असे मानू!). त्याने य ला गाठून विचारले की, ‘‘माझ्या फक्त १४० रु.च्या ऐवजाला तुम्ही ५०० रु. का हो देऊन राहिलाय?’’ य ने अ ला स्पष्ट केले, ‘‘मी तुम्हाला ५०० रु. देणारच नाहीये.’’ अ बुचकळ्यात पडला. त्याने विचारले, ‘‘मग कोणाला देणार आहात?’’ य ने उत्तर दिले, ‘‘त्याचं असं आहे की, एक क्ष नावाचा माणूस आहे. त्यानं ऑलरेडी तुमचा शेअर ४९० रु.ला विकत घेतलाय.’’ ‘‘पण का? आणि कोणाकडून?’’ ‘‘त्याच्याशी मला काही घेणं नाही. मला एका दिवसात फक्त १० रु. देऊन २० रु. मिळणार आहेत ते मी का सोडू?’’ ‘‘ते कसे काय मिळणार आहेत बुवा?’’ ‘‘कारण मला नक्की कळलंय की, एक झ नावाचा माणूस थोडय़ाच वेळाने मी ५०० ला घेतलेला शेअर ५१० ला घेणार आहे.’’ ‘‘अहो, पण झ ला तरी ही इच्छा का निर्माण झालीय?’’ ‘‘त्याच्याशीही मला काही घेणं नाही आणि तुम्हाला ४९०, ५०० आणि ५१० यापैकी काहीच मिळणार नाहीये. हे आमचं आमच्यात चालू आहे.’’ या संवादावरून लक्षात येईल की अ चा क्ष, य आणि झ यांच्या कथेशी संबंधच नाहीये!

य ने ५००च्या ऐवजावर मालकी मिळवली. अपेक्षेनुसार झ ने ५१०ची ऑफर खरोखरच दिली. य ने ती मान्य केली. आता झ ने ५१० किंमत देऊन समभागाची डिलिव्हरी घ्यायला हवी; पण दिवसभरात, असं काही तरी झ च्या कानावर आलं, की त्याला आपण चूक करतोय असं वाटायला लागलं! झ ने य ला कळवलं, ‘सॉरी! मी काही ५१० ला घेणार नाहीये.’’ यावर य म्हणाला ‘‘नका घेऊ; पण मला दिलेलं वचन तुम्ही मोडताय. त्यामुळे माझं १० रु.चं नुकसान करताय. हे चालणार नाही. तुम्ही एवढंच करा, की मला १० रु. देऊन टाका. मी व्यवहार ‘उलटवतो’.’’ झ चा नाइलाज होता. त्याने य ला दहा रुपये देऊन टाकले.

आता यात काय झाले ते पाहू. क्ष ला ४९०चा ऐवज ५००ला विकून १० रु. भांडवली मिळकत (कॅपिटल गेन) मिळाली. य लासुद्धा, ५००चा ऐवज स्वत:कडेच ठेवून, केवळ झ चा अंदाज चुकल्याखातर, झ कडून १० रु.चा गेन झाला. झ ला मात्र अंदाज चुकल्याखातर १० रु.चा घाटा पत्करावा लागला.

यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, फायदे-तोटे फक्त १० रु.चेच झाले; पण व्यवहार ४९०, ५०० आणि ५१० असे झाले! यात मूळ अ ला काहीच मिळाले नाही. क्ष, य आणि झ उत्पादन करतच नाहीयेत. ते एका दिवसात बसल्या जागी शून्यातून १० रु. मिळवण्याच्या मागे आहेत. त्यांचे अंदाज खरे ठरणे किंवा खोटे ठरणे यानुसार त्यांना हे ‘मार्जिन’ मिळतेय वा गमवावेही लागतेय.

अ ची कथा त्याच्या पातळीवर चालू आहे. क्ष, य आणि झ यांच्या कथेशी अ चा संबंधच येत नाहीये. जेव्हा बऱ्याच वर्षांनी अ ने उत्पादक प्रयत्नांद्वारे त्याची बुक व्हॅल्यू २०० रु.पर्यंत नेलेली असेल तेव्हा क्ष, य आणि झ यांची कथा उदाहरणार्थ २४५० रु., २५०० रु. आणि २५५० रु. या रकमांनिशी तशीच्या तशी घडू शकते! तेव्हाही हलतात फक्त ५० रु. आणि व्यवहार दिसतात २५००च्या भोवती! या २५०० भागिले २०० म्हणजे १२.५ पटीला काय म्हणतात? सेन्सेक्स! म्हणजे जमिनीवर जे फक्त दोन पट झालेले असते ते आकाशात २५ पट होते. अशा तऱ्हेने वित्तबाजाराचा जमिनीशी संबंध तुटतो.

मूल्य थोडे उलाढाल फार

अ ब क या कथेत उत्पादन असल्यामुळे त्यात धन बेरजेचा डाव घडतो. मात्र क्ष, य आणि झ हे मूलत: जुगारी वृत्तीचे लोक आहेत. जुगारात नवे मूल्य काहीच निर्माण होत नसल्याने जुगार हा शून्य बेरजेचा डाव (झिरो सम गेम) असतो. त्यामुळे त्यांच्यात हरणारे आणि जिंकणारे एकमेकांची फिट्टंफाट करत असतात. शिवाय ते फक्त मार्जिनवर खेळून, ऐवज मात्र अख्खे खेळवत असतात! म्हणून त्यांच्या जगात अवास्तव आकडे दिसत राहतात. हे क्ष, य आणि झ नेहमीच वाढती आशा असणारे असतीलच असे नाही. ‘वाढणार आहे’ ही बातमीच किंमत वाढवत नेते किंवा ‘उलट घटणार आहे’ ही बातमीच किंमत घटवत नेते. याला सेन्सेक्स उसळणे/ कोसळणे म्हणतात.

आता प्रश्न असा येतो, की हे चढ-उतार चालू असूनही, एकुणात वाढच का दिसते? याला तीन स्पष्ट कारणे आहेत. एक म्हणजे सार्वत्रिक भाववाढ म्हणजेच रुपयाची किंमतच कमी होत जाते. दुसरे म्हणजे प्रत्यक्ष उद्योगातील वाढीमुळे बुक-व्हॅल्यूची दिशा ही वाढीचीच असते. तिसरे कारण मानसशास्त्रीय आहे.

बहुसंख्य सुरक्षिततावादी माणसांना, हानीची घृणा (लॉस अव्हर्शन) जास्त आणि लाभाची आसक्ती (गेन अ‍ॅट्रॅक्शन) कमी असते. उलट साहसवादी माणसांना, हानी झाली तरी चालेल, पण लाभाची संधी सोडता कामा नये, असेच वाटत असते. असे लोक पजा मारून पसा मिळवण्याच्या खेळात उतरतात. त्यांच्याकडे ‘मार्जिन खेळवण्याइतका’ पसा असतो. त्यांच्या तात्कालिक भराऱ्या जरी वर-खाली गेल्या तरी दूरगामी कल वरच्याच दिशेने राहातो. कारण त्यांचे लाभ-आकर्षण हे हानी-घृणेपेक्षा जास्त प्रभावी ठरत राहाते. म्हणूनच मार्केट-व्हॅल्यू ही बुक-व्हॅल्यूपासून, वरवर सरकत जाते!

जुगारी माणसे कशावरही- क्रिकेटवर, निवडणुकांवर वगैरे पजा मारू शकतात; पण येथे ती वित्तबाजारात उतरलेली आहेत! यात शेअर्स, फॉरवर्ड ट्रेिडग, ऑप्शन्स, क्रूडऑइल, फॉरेक्स अशी बरीच क्षेत्रे येतात. मुख्य म्हणजे वित्तसंस्थाही यात गुंतत जातात. म्हणजेच, बेतशीर पण सुरक्षित परतावा पत्करणाऱ्या सामान्य बचतदारांनाही धोका संभवतो. म्हणूनच अति-चंचल देवघेवींवर कर बसविला पाहिजे आणि बँकांवर असा अंकुश हवा, की त्या ‘खेळाडूं’ना (हर्षद मेहताछाप) वित्तपुरवठा करूच शकणार नाहीत.

मात्र हेही ध्यानात ठेवले पाहिजे, की बाजारच बंद केला, तर अ ला शून्यातून सुरुवात करताच येणार नाही!

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विरोध-विकास-वाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about fluctuations in capital market

ताज्या बातम्या