कसदार परीक्षापद्धतीच्या शोधात

परीक्षा विद्येची न होता पोचट पाठांतराची होते!

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| राजीव साने

घाऊक प्रमाणात मानकीकरण व कोणावर अन्याय झाल्याचा आरोप होऊ नये याची अति-चिंता, यामुळे परीक्षा विद्येची न होता पोचट पाठांतराची होते!

परीक्षांचे निकाल लागतात तेव्हा मार्काचा चलनातिरेक आता संपृक्त अवस्थेला पोहोचल्याचे दिसते. विद्यार्थ्यांना ‘परीक्षा देण्याची कला’ याच विषयात नपुण्य प्राप्त झाल्याचे दिसते. लेखी परीक्षेत, विद्यार्थ्यांने आठवून उत्तर दिले आहे, की विचार करून ते काढले आहे? हे समजण्याचा कोणताच मार्ग परीक्षकांकडे नसतो. बरेच प्रश्न असे असतात की त्यांच्या समवेत क्ल्यू देणारे ऑप्शन्स असतात. अंदाजपंचे उत्तर दिले तरी ते बरोबर निघण्याची संभाव्यता असते. पेपर सेटिंग हे तपासणाऱ्याला पक्षपात किंवा गहाळपणा करण्याची संधीच राहू नये या दृष्टीने बेतलेले असते. या आणि अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्यांची जाण, समज वाढली आहे का? त्याला दृष्टी (इनसाइट) लाभली आहे का? याचा पत्ताच लागत नाही.

खरे तर विद्यार्थ्यांची उलटतपासणी घेतली गेली पाहिजे. पण तोंडी परीक्षांत सढळ हस्ते मार्क दिले जातात. थोडे मुद्दे जरी तो ‘बरोबर’ बोलला तर साधारण चढे मार्क द्यायचे, अगदीच काही नाहीच आले तरच नापास करायचे, असे धोरण राहते व अशा मार्कात लहरीपणाही राहतो. पक्षपातीपणाचा धोका तर नेहमीच भेडसावत असतो.

विस्तृत लेखनाची किंवा भाषणाची स्पर्धा ठेवली तरीसुद्धा, अगदी निपक्षपाती आणि तळमळीच्या परीक्षकालाही, नेमकी तुलना करणे खरोखरच अवघड असते. मूल्यनकौल (इव्हॅल्युएटिव्ह जजमेंट) देणे आणि त्याही पुढे जाऊन हा कौल संख्यांकित करणे ही अवघड जाणारी गोष्ट आहे. या अवघड आणि अवघडलेल्या कष्टातून तपासनीसाची मुक्तता करणे आवश्यक वाटत राहिलेले आहे. त्यातून कौल-मुक्त तपासणी करता यावी या दृष्टीने ‘वस्तुनिष्ठ’ प्रश्नपत्रिकांचे प्रारूप बनत गेलेले आहे. मार्क द्यायचा की द्यायचा नाही हे त्याला स्पष्ट हो किंवा नाही या स्वरूपात ठरवता यावे अशी प्रश्नपत्रिकेची रचना रुळलेली आहे.

या लेखापुरते एक मर्यादित आव्हान घेऊन मुक्तचिंतन केले आहे. वस्तुनिष्ठ रचनेला फारसा धक्का न लावता, पण तरीही प्रश्न कसे बनवायचे (फ्रेम करायचे), यावर मी पर्याय सुचवण्याची सुरुवात करत आहे. उत्तर देणारी व्यक्ती फक्त परीक्षार्थी आहे की विद्यार्थीही आहे? हे कसाला लागावे. तो त्या विषयात व त्या इयत्तेइतपत स्वत: विचार करू शकतो आहे की नाही? विषयात ‘वावरू’ शकतो आहे की नाही? हे तपासले जावे. हे उद्दिष्ट ठेवून प्रश्न कसे फ्रेम करता येतील याची उदाहरणे देत आहे.

नव्या प्रकारची प्रश्नपत्रिका

प्रश्नांना वेगळे वळण कसकसे देता येईल? हे व्यक्त करण्यासाठी नमुनेदार नव्या प्रकारचे प्रश्न, जसे सुचले तसे पुढे देत आहे. साधारणत प्रश्न विचारण्याचे काही रुळलेले आकार (फॉम्र्स) असतात. ते उलटवणे हेही एक फलदायी धोरण असू शकते. ‘गाळलेले शब्द भरा’ या हमखास येणाऱ्या आकाराच्या उलट ‘अनावश्यक’ (रिडंडंट) शब्द हुडका!  असे केल्याने समज जास्त दिसून येईल. तसेच ‘गाळलेले शब्द भरा’ मध्येही असा बदल करता येईल की गाळलेल्याच्या जागी अशी गॅप द्यायचीच नाही. वाक्यात तो कोठे गाळला गेला आहे हेही ओळखायला लावायचे. जोडय़ा लावाच्याऐवजी विजोड जोडय़ा पकडा असे उलट करता येईल. किंवा पुढील शब्द संचात ‘न बसणारा’ शब्द पकडा असे काम देता येईल. चार पर्यायवाले कुप्रसिद्ध प्रश्न. त्यात फक्त बरोबर पर्याय शोधायचा एवढेच न ठेवता, प्रत्येक पर्यायापुढे; साफ-चूक/ चकवणारे/ जवळचे/ बरोबर हे रिमार्क टिक् मारायला सांगायचे. हा अनुक्रमही बरोबर आला तर जास्त मार्क ठेवायचे. विरुद्ध अर्थाचे शब्द सांगा हे ठीकच आहे; पण विरुद्ध अर्थ अनेक अंगांनी असू  शकतो. ‘नसíगक’ला विरुद्ध अर्थाच्या कृत्रिम/ सांस्कृतिक/ विकृत अशा जास्त छटा शोधल्यास जास्त मार्क! असेही करता येईल. हे झाले फॉर्म उलटवण्याबाबत. इतरही अनेक मार्ग आहेत.

‘व्याख्या द्या’ म्हटले तर त्या पाठ केलेल्या असू शकतात. पण पुढीलपकी कोणत्या व्याख्या निर्णायक आहेत व कोणत्या संदिग्ध/सदोष राहतात? हे विद्यार्थ्यांला ‘कळून’च सांगता येईल. सिद्धता किंवा डेरिव्हेशन हेसुद्धा कित्येक जण कविता पाठ केल्यासारखे पाठ करतात. यामुळे विद्यार्थी पायरी पायरीने सिद्धता करत जाऊ  शकतोय का? हे कळत नाही. यावर एक उपाय असा असू शकतो. पायऱ्या प्रश्नपत्रिकेतच द्यायच्या! पण प्रत्येक पायरीला देण्याचे समर्थन, जे पायरीच्या उजव्या बाजूला आले पाहिजे, ते भरायला लावायचे. व्याख्येवरून, गृहीतावरून, अमुक प्रमेयावरून, पायरी क्र. अमुकचे अमुक रूपांतर करून, अमुक नियम लावूनच्या जागी टाकून (सबस्टिटय़ूट करून) इत्यादी. ही समर्थने देता आली तर सिद्धता करता आली! म्हणजे पायऱ्या पाठ करून उपयोग नाही. लोक समर्थनेसुद्धा पाठ करतील, हा धोका अभ्यासक्रमात घेतलेल्या सिद्धातांच्याबाबत आहेच. म्हणून तत्सम पण वेगळ्या सिद्धता ऐन प्रश्नपत्रिकेत द्यायच्या व समर्थने मागायची अशीही युक्ती करता येईल. प्रयोग शिकवलेले असतात. आख्खा प्रयोग  वर्णन करून लिहूच नका. या प्रयोगात ‘इतर कारणांनी तोच परिणाम होत असण्याची’ शक्यता काढून टाकण्यासाठी (एलिमिनेट करण्यासाठी) कोणती युक्ती वापरली आहे? एवढेच विचारायचे!

‘दिलेले गणित सोडवून दाखवा’ हे नेहमीचे झाले. अशा अशा दिलेल्या परिस्थितीत अमुक ठरवायचे आहे. हे तुम्ही गणितरूपात कसे मांडाल? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. दिलेल्या गोष्टींना क्ष य झ व स्थिरांकांना अ ब क नावे द्यायची. आता या क्ष य झ, अ ब क वगरेचे गणिती सूत्र काय येते? उत्तरात दिलेले सूत्र बरोबर आहे की नाही याचे ‘मॉडेल-आन्सर’ तपासनीसाकडे असेल. गणित सोडवा या प्रकारातही एक बदल करता येईल. पायरी गाळलेले गणित देऊन गाळलेली पायरी ओळखायला सांगता येईल. किंवा पुढील गणितांपकी कोणती गणिते अपुऱ्या माहितीमुळे सुटूच न शकणारी आहेत? आणखी काही माहिती लागेल! ती कोणती? असेही विचारता येईल. निरनिराळ्या चलघटकांना मापे व मिती असतात. लांबी, वस्तुमान, काळ वगरे. पुढे दिलेली सूत्रे मितींबाबत एकसंध (डायमेन्शनली होमोजिनस) आहेत की नाहीत? हा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारता येतो. डावीकडची राशी आणि उजवीकडची राशी यांच्या मितीच जर जुळत नसतील तर ते सूत्र चूकच असू शकते. चुकीची सूत्रे ऐन पेपरातच पाहायला मिळाल्याने ती चुकीची आहेत हे ‘समजले’ तरच पकडता येते. काही सूत्रे योग्य मितींचीही असतील. योग्य कोणती व अयोग्य कोणती हे विद्यार्थ्यांला ठरवावे लागेल.

पुढीलपकी कोणते प्रश्न हे प्रश्न म्हणूनच अयोग्य आहेत? किंवा निदान या विषयाच्या या इयत्तेत बसत नाहीत? असा प्रश्नही विचारता येतो. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षण ‘किती’ असते हे न्यूटनच्या नियमानुसार सांगता येते. पण ते मुळात ‘का’ असते? याला न्यूटनकडे उत्तर नसते! प्रश्न विषयाच्या आवाक्याबाहेर जातो आहे, हा निवाडा विद्यार्थी देऊ शकला, तर त्याला विषयाचा आवाका कळलेला आहे हे दिसून येते.

भाग्याचा घटक कमी करणे

विश यू बेस्ट ऑफ लक! अशी शुभेच्छा देताना आपण एक सत्य मान्यच करत असतो. सगळा अभ्यास झालेला असणे शक्य नसते. टॉपिक्स ऑप्शनला टाकले जातात. भरगच्च सिलॅबसे करण्याचा सोस फार! पण तेवढे सारे शिकवायला वेळही मिळत नाही. यामुळे ऑप्शन-लक फार वाढते. बऱ्याच मार्काचा आख्खा प्रश्नच ‘नको तो’ निघाला तर ते मोठेच दुर्भाग्य ठरते. याकरिता सर्व टॉपिक्स सर्व प्रश्नांत विखरून टाकले पाहिजेत. म्हणजे तेवढा एकेक उपप्रश्न हुकेल. पण बाकीची उत्तरे देता आल्याने दुर्भाग्याचे काहीसे सपाटीकरण तरी होईल. विखरून पण सर्वस्पर्शी प्रश्नपत्रिका असली की ती फुटण्यामुळे कोणाला ऐनवेळी फार फायदाच राहणार नाही! हे भ्रष्टाचाराचे समर्थन नसून भ्रष्टाचाराच्या संधीच कशा कमी करता येतील, याचा विचार आहे. (हे पेपरफुटीच नव्हे तर सर्वच क्षेत्रांत लागू आहे).

चुकीच्या उत्तराला ऋण मार्क देणे हे योग्यच पाऊल आहे. यात एक अधिक सुधारणा. उत्तरात विद्यार्थ्यांने ‘खात्रीने’ की ‘अंदाजे’ हा रिमार्क लिहायचा. खात्रीने आणि बरोबर तर दोन मार्क. अंदाजे आणि बरोबर एक मार्क, अंदाजे आणि चूकला उणे एक मार्क आणि खात्रीने व चूक आल्यास उणे दोन मार्क. सविस्तर मजकूर प्रश्नपत्रिकेतच देऊन, याची ‘साररूप मुद्दे-शीर्षक-यादी’ म्हणजे सिनॉप्सिस बनवा, असे काम देता येईल.

एकुणात काय, तर ‘आठवून उत्तर देणे म्हणजे कॉपी करण्यासाठी मेंदू वापरणे!’ हे बदलले पाहिजे.

rajeevsane@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विरोध-विकास-वाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Exams in india

ताज्या बातम्या