पद्माकर कांबळे padmakarkgs@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी, त्यांच्या चरित्रातील एरवी अचर्चित राहणाऱ्या प्रसंगमालिकेचा हा धांडोळा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यंदाच्या जयंतीला पंजाबची प्रकर्षांने आठवण येण्याची महत्त्वाची कारणे दोन. पहिले कारण, पंजाब विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना, तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसने पक्षांतर्गत वादावर तोडगा म्हणून, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच एका ‘दलित-शीख’ व्यक्तीला बसविले. दुसरे कारण, आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत असा निर्णय जाहीर केला की, पंजाबमधील सरकारी कार्यालयात यापुढे फक्त भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच प्रतिमांना स्थान असेल! पंजाबच्या समृद्ध अशा कृषी परंपरेतील महत्त्वाचा सण ‘बैसाखी’ हा नेमका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी येत आहे हे तिसरे, पण बिनमहत्त्वाचे कारण. अविभाजित पंजाबातील लाहोर येथील जात-पात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले पण त्यांना करता न आलेले भाषण (‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक) हा एक प्रसंग अनेकांना ठळकपणे माहीत असतो, तितकी अन्य प्रसंगांची आठवण राहिलेली दिसत नाही.

कॉ. भगतसिंग आणि पंजाब यांचा संबंध जवळचा आहे. याउलट डॉ आंबेडकरांचे कार्यक्षेत्र मुंबई पर्यायाने महाराष्ट्र आणि दिल्ली राहिले असले तरी, आंबेडकरांच्या हयातीत झालेल्या चळवळीत तत्कालीन अनेक शहरांप्रमाणे आजच्या भारतीय पंजाबातील शहरे (प्रामुख्याने शहरेच) सहभागी होती. १३ एप्रिल १९३१ रोजी ‘जनता’ वृत्तपत्राच्या अंकात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना फाशी दिली गेल्याच्या घटनेची दखल ‘तीन बळी’ या शीर्षकाखाली ‘प्रासंगिक विचार’ मांडून घेतलेली दिसते! ‘‘जर सरकारचा निष्कर्ष असा आहे की, या घटनेपासून इंग्रज सरकार पूर्णपणे न्यायप्रिय आहे किंवा न्यायपालिकेच्या आदेशांचे पालन करते असा समज लोकांमध्ये मजबूत होईल आणि लोक त्याला पाठिंबा देतील, तर तो सरकारचा मूर्खपणा आहे!’’ असा युक्तिवाद करून, भगतसिंगांच्या फाशीसंदर्भात भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या खुल्या व गुप्त राजकारणाची चर्चा ‘जनता’तील टिपण उपस्थित करते. ‘‘महात्मा गांधी आणि व्हाइसरॉय आयर्विन भगतसिंगांच्या फाशीला जन्मठेपेत बदलण्याच्या बाजूने होते. आयर्विनकडून गांधीजींनी हे वचनसुद्धा घेतले होते! पण ब्रिटनचे अंतर्गत राजकारण आणि ब्रिटनच्या लोकांना खूश करण्यासाठी या तिघांना फाशी देण्यात आले!’’

१९३५ साली येवला येथे डॉ. आंबेडकरांनी धर्मातराची घोषणा केली तेव्हा अस्पृश्यांनी शीख धर्माचा स्वीकार करावा किंवा काय यासंबंधी डॉ. आंबेडकरांच्या मनात विचारद्वंद्व सुरू होते. डॉ. आंबेडकरांना शिखांच्या लढाऊ इतिहासाबद्दल आकर्षण वाटत होते. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी ‘प्रभू अनुप’ म्हणून  (तत्कालीन अस्पृश्य) संत रविदास यांचा केलेला गौरव तसेच गुरू गोिवदसिंग यांनी शीख धर्मात अस्पृश्यांना सामावून घेण्याचा केलेला प्रयत्न, एवढेच नव्हे तर ‘पंच प्यारे’ म्हणजे पहिल्या पाच खालसांपैकी तिघे अस्पृश्य समाजाचे असल्याचा इतिहास, यामुळे डॉ. आंबेडकरांना शीख धर्माविषयी आकर्षण वाटत असावे.

अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून धर्मातर केले तर पुणे कराराने अस्पृश्यांना प्राप्त झालेल्या राजकीय सवलती मिळू शकतील किंवा कसे, या प्रश्नावर लंडनमधील संसदीय पंडित आणि मंत्रिमंडळाचे सभासद यांची मते अजमावण्यासाठी डॉ. आंबेडकर १९३६ साली इंग्लंडला गेले, तेव्हा त्यांना अमृतसरच्या शीख मिशनने प्रवासखर्चासाठी सात हजार रुपये दिले होते. याची नोंद गुरुद्वारा गॅझेट, अमृतसरमध्ये मिळते. अस्पृश्यांनी हिंदू धर्माऐवजी शीख धर्म स्वीकारण्यास अनेक पुढाऱ्यांचाही पािठबा होता. डॉ. कूर्तकोटी (शंकराचार्य) यांनी तर असेही जाहीर केले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसहित शीख धर्माचा स्वीकार केला तर आपणही शीख धर्माचा स्वीकार करण्यास तयार आहोत!’

मे १९३६ मध्ये झालेली ‘मुंबई इलाखा महार परिषद’ शीख मिशनच्या जागेत नायगाव बंबखान्याजवळील मैदानावर (सध्याचे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या इमारतीपाठीमागील मैदान) झाली होती. शिखांचा या कार्यक्रमातील सहभाग लक्षणीय होता. डॉ. आंबेडकरांच्या ‘जनता’ या वृत्तपत्राचा छापखानाही पूर्वी शीख मिशनच्या जागेत होता. या काळात डॉ. आंबेडकरांचे शीख मिशनशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले होते. पुण्यात १९३६ साली भरलेल्या ‘अखिल महाराष्ट्रीय अस्पृश्य तरुण परिषदे’साठी खास अमृतसरहून मोठय़ा प्रमाणात शीख सरदार आले होते. तर १९३७ साली, मुंबईत शीख मिशनच्या वतीने खालसा महाविद्यालयाची स्थापना करण्यात डॉ. आंबेडकरांनी पुढाकार घेतला होता. या महाविद्यालयाला इमारतीसाठी जागा मिळावी म्हणून केलेला अर्जही डॉ. आंबेडकरांच्या सहीचा होता. सरदार नारायणसिंग यांच्या देखरेखीखाली चाललेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी डॉ. आंबेडकर अधूनमधून जात असत.

डॉ. आंबेडकरांनी शीख धर्माचा जवळून अभ्यास करण्यासाठी १६ जणांचे शिष्टमंडळ अमृतसरला पाठवले होते. त्यापैकी तिघांची प्रकृती बिघडल्याने ते परत आले. उरलेल्या १३ जणांना ३१ मार्च १९३७ रोजी अकाल तख्तासमोर शीख धर्माची दीक्षा देण्यात आली. ११ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथील ‘बैसाखी’ला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आंबेडकर हजर राहिले होते. त्यांचा शीख पद्धतीच्या पोशाखातील फोटोही एप्रिल १९३७ मध्ये प्रसिद्ध झाला होता. तथापि या कार्यक्रमातील भाषणात डॉ. आंबेडकरांनी ‘मला शीख धर्म आवडतो’ एवढेच म्हटले होते. आपण शीख धर्माचा स्वीकार करू, असे डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत म्हटले नव्हते. या भाषणात डॉ. आंबेडकरांनी उपस्थित शीख समुदायाला विचारले की, ‘अस्पृश्य शीख झाल्यानंतर आपण आपली मुले-मुली अस्पृश्यांना द्याल का?’ शीख समुदायाने जोरदारपणे सांगितले, ‘निश्चित देऊ.’  डॉ. आंबेडकरांच्या या भाषणाचा परिणाम शिखांवर खूप झाला. 

 डॉ. आंबेडकरांनी शीख धर्म स्वीकारल्यास त्यांची संस्थानाचे दिवाण म्हणून नेमणूक करण्यास पतियाळाच्या महाराजांची तयारी होती! १९४७ पर्यंत अनेक मातब्बर राजकारणी संस्थानाचे दिवाण म्हणून काम करण्यास तयार असत. डॉ. आंबेडकरांनी अधिकारपद स्वीकारतानाही, व्यक्तिगत लाभ व सन्मान यापेक्षाही दलित वर्गाची उन्नती करण्यास ज्या अधिकारपदामुळे मदत होईल असेच अधिकारपद स्वीकारले.

मजहबी शिखांचे पुढारी सरदार किशनसिंगांनी ४९,५५७ अस्पृश्यांना शीख धर्माची दीक्षा दिली होती. तरीही शीख-अस्पृश्यांच्या स्थितीत पालट झाला नाही. या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधून सरदार किशनसिंगांनी डॉ. आंबेडकरांना, ‘आपण शीख धर्माचा बिलकूल स्वीकार करू नका’ अशी विनंती केली होती. या संदर्भात ४ फेब्रुवारी १९३३ च्या ‘जनता’ पत्राच्या अंकातील एक बातमी बोलकी ठरेल.एका शीख धर्मीय सैनिकाने त्याला कनिष्ठ जातीय शिखांप्रमाणे वागणूक दिल्यामुळे चिडून त्याच्या अधिकाऱ्यांवर हत्यार उभारण्याचा प्रयत्न केला. हा खटला हायकोर्टात चालला होता. सदर शिखाने, ‘आपल्या धर्माप्रमाणे मजहबी, रामदासी व लोभाना या अस्पृश्य जातीतील शिखांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते हा धर्मनियम आहे..’ असे न्यायालयास सांगितले होते. याला पुरावा म्हणून त्याने, ‘नांदेड येथील दहावे गुरू हुजूरसाहेब यांच्या गुरुद्वारात मजहबी लोकांना प्रवेश मिळत नाही’ हे तत्कालीन उदाहरण सांगितले.

याच लेखात उल्लेख केलेले, शीख धर्माची दीक्षा घेतलेले तेरा जण मुंबईत परतल्यावर त्यांना धर्मप्रसारासाठी शीख मिशनकडून दरमहा अल्पवेतन मिळू लागले. शीख धर्माची दीक्षा घेतलेल्यांमध्ये डॉ. आंबेडकरांचे एक निष्ठावंत अनुयायी शंकरदास बर्वे (भाई अमरसिंग) होते. त्यांच्या नावे प्रसिद्ध झालेल्या ‘अस्पृश्यांच्या चळवळीतील सावळागोंधळ’ या पुस्तिकेत भाई अमरसिंग लिहितात : ‘‘(शीख) मिशनने दरमहा ४५ रुपये पगार देण्याची तयारी दाखवली होती. परंतु डॉ. आंबेडकरांनी १५ रुपये पगार या लोकांना बस्स होईल अशी शिफारस केल्यामुळे आम्हाला कमी पगार ठरविण्यात आला. शीख धर्मप्रसारासाठी आम्ही पगार घ्यावयाचा शीख मिशनकडून आणि प्रचारकार्य करावयाचे डॉ. आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे असा हास्यास्पद प्रकार. पक्ष स्थापल्यानंतर धर्मातराच्या कार्याकडे डॉ. आंबेडकरांनी मुळीच लक्ष दिले नाही. आम्हाला वेळेवर पगार मिळत नसत. या व अशा इतर अनेक कारणांमुळे शीख धर्म स्वीकारलेल्यांपैकी बऱ्याच जणांनी शीख धर्माची वस्त्रे दूर फेकून दिली. मी अद्याप शीख आहे.’’ स्वत: शीख धर्म न स्वीकारता आपल्याला मात्र शीख धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करून डॉ. आंबेडकरांनी वाऱ्यावर सोडले असे भाई अमरसिंग यांना वाटणे साहजिक होते. ते कायमचे आंबेडकरी चळवळीपासून दूर झाले. मुंबईतील खालसा महाविद्यालयात शिपाई म्हणून शंकरदास बर्वे ऊर्फ अमरसिंग नोकरी करीत राहिले ते १९५० साली निधनापर्यंत. 

१९४१ च्या एप्रिलमध्ये अमृतसरच्या शीख मिशनबरोबरची डॉ. आंबेडकरांची जवळीक संपुष्टात आलेली दिसते. डॉ. आंबेडकर शीख धर्म स्वीकारणार नाहीत हे अमृतसरच्या शीख धर्मप्रचारकांच्याही लक्षात आले. आपण शीख धर्म का स्वीकारला नाही याची कारणे डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे कधी सांगितली नाहीत. शिखांनीही त्याबाबत कधी खुलासा केल्याचे आढळत नाही. लेखक राज्यशास्त्र व समाजजीवनाचे अभ्यासक आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr babasaheb ambedkar birth anniversary dr ambedkar and punjab zws
First published on: 14-04-2022 at 01:07 IST