scorecardresearch

माझी वाचन मुशाफिरी..

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या पंकज भोसले यांनी घेतलेल्या मुलाखतीवर आधारित लेख

उदगीर येथे उद्यापासून सुरू होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या पंकज भोसले यांनी घेतलेल्या मुलाखतीवर आधारित लेख. एका सिद्धहस्त लेखकाची लहानपणापासूनची वाचनप्रक्रिया उलगडून दाखवणारा..

चांदोबा आमच्या घरी येत असे. त्याचं मोठं आकर्षण होतं. त्यातली चित्रं आणि त्यात ज्या काही सुरम्य गोष्टी सांगितल्या जात असत, त्याचा माझ्या मनाच्या जडण-घडणीत परिणाम निश्चितच होता.  आमच्या शाळेनं पुस्तकपेटी म्हणून उपक्रम सुरू केला होता. एका पेटीत काही पुस्तकं असत. आठवडय़ातून एकदा ती उघडली जाई आणि गुरुजी आम्हाला त्यातली पुस्तकं वाचायला देत. आठवी ते दहावी या कालावधीत माझ्या वाचनाचा सांधा थोडा बदलला. प्रौढांचे जे साहित्य असते ते सारे म्हणजे कथा आणि इतर प्रकार, मनोहर आणि त्या काळी जी साप्ताहिकं, मासिकं निघत होती त्यांचं एक आकर्षण निर्माण झालं. परंतु बालसाहित्य म्हणून जे होतं, ते वाचन मागे पडलं नाही. कारण त्याचं कुतूहल मला नेहमीच राहिलेलं आहे.

दहावीमध्ये जेव्हा असं लक्षात आलं की इंग्रजी वाचलं पाहिजे. वडिलांनी पेरी मेसनच्या मालिका घरात आणून ठेवल्या होत्या, त्या मी वाचायला लागलो. त्यातली सोपी इंग्रजी भाषा आणि आपल्याला ते कळतंय याचा आनंद होता. त्यातून मी ती भाषा वाचू लागलो आणि शिकलोही. त्यासह कथासरित्सागरही माझ्या हाती पडलं होतं.

अहमदनगरमध्ये एक चांगलं वाचनालय होतं. आम्ही काही मित्र-मंडळी तेथे जात असू. हे अर्थातच कॉलेजमध्ये गेल्यानंतरच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांतलं. तिथं जाऊन आम्ही काय वाचलं जातंय, काय येतंय, काय आहे हे पाहत असू. काय लिहिलं जातंय हेही तिथेच कळत होतं. शाळेच्या किंवा कॉलेजमधल्या काळातही कुणी वाचनगुरू भेटला नाही किंवा एखादा विशिष्ट प्रकारचे वाचतोय म्हणून आपण ते वाचावे, असे झाले नाही. किर्लोस्कर, स्त्री, मनोहर ही मासिके वाचनालयात येत. ती आम्ही हाताळत असू.

वडील पोलीस असले तरी त्यांना सर्व उच्चकलांचं आकर्षण होतं.  चांगली पुस्तके त्यांनी घरामध्ये ठेवली होती. आमच्याकडे शेक्सपिअरचे ऑक्सफर्डने काढलेले खंड होते. १८०० सालामध्ये प्रकाशित झालेली इंग्रजी पुस्तकं होती. धुळय़ात असताना एकदा वडिलांनी कालिदासाचं मेघदूत हातात आणून दिलं आणि वाचायला सांगितलं होतं.

मी माझ्यावर कोणत्याच लेखकाचा प्रभाव मी पडू दिला नाही. एका बाजूने मी जी.एं.चं नाव ऐकायला लागलो होतो. चिं.त्र्यं. (खानोलकर) यांच्याबाबत ऐकत होतो, की त्यांचं सनई वाचा अन् अमुक पुस्तक वाचा. त्यामुळे अधूनमधून चिं.त्र्यं.देखील वाचू लागलो होतो. पुढेदेखील ते वाचले. मग जी. ए. कुलकर्णीही वाचले. त्याच वेळी कथाकार पंचकही बहरात होते. पुंडलिक लिहीत होते. व्यंकटेश माडगुळकरांच्याही काही कथा मला आवडल्या होत्या. मोकाशींच्या कथांपेक्षा त्यांच्या कादंबऱ्या आणि अकथनात्मक लेखन मला भावलं होतं. पण कादंबऱ्या वाचनाची चर्चा करायची झाली, तर र. वा. दिघे यांच्या ‘पड रे पाण्या’, ‘आई आहे शेतात’ या माझ्या आवडत्या कादंबऱ्या होत्या. ग्रामीण कादंबऱ्या, कथा मी त्या काळात खूप वाचल्यात. त्यावर पुढे चर्चाही झाली की जो रोमॅण्टिसिझम फडक्यांनी साहित्यात आणला, तोच पुढे ग्रामीण साहित्यात उतरला. त्यामुळे खेडं सुंदर-रम्य आहे, हिरवं आहे, खळखळणारं पाणी आहे, त्याच्या शेजारचा रोमान्स आहे, खेडय़ातील प्रेमकथा आहे. त्यामुळे त्यात वेगळं काही नाही, असं म्हणून अनेकांनी ते निकालात काढलं. तरी त्या काळामध्ये मला ते लेखन आवडत असे. अशा प्रकारचं त्यावेळेला मी वाचत होतो. कादंबरी वाचनही माझं याच प्रकारचं असलं, तरी खूप उशिराने मी जी.ए. वाचले. जी.एं.ना वाचायला सुरुवात केली, तेव्हा हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे, आपण खूप सावकाशीने हे वाचायला हवे, असे लक्षात आले होते. पण त्याच वेळेला माझ्या लेखनाची शीरदेखील तशाच कुठल्यातरी पद्धतीने चालली होती. म्हणून मला जी.ए. अधिक वाचावेसे वाटले असावेत. पण जी.एं. इतकेच मी चिं.त्र्यं खानोलकरही वाचत होतो. अरिवद गोखलेही मी वाचले. गाडगीळांच्या कथेची प्रकृती मला फारशी खेचून घेणारी वाटली नाही. त्यानंतर माझ्या समकाल्ीन लेखकांचे वाचण्याकडेही माझा कल होता. १९७५ ते ८० या काळात लिटिल मॅगझीनबद्दल आम्ही ऐकून होतो. प्रत्यक्षात ते हाती पडणं, वाचणं आणि त्या वर्तुळात आम्ही खेचलं जाणं हे होण्याची शक्यताच नव्हती.

कोसला मी फार उशिराने वाचली. पण त्या काळात त्या कादंबरीच्या प्रभावाने जी भारावून गेली होती, त्यात सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी नव्हतो. मी त्यापासून दूर राहिलो हे मात्र खरे. मला माझ्यावर कुणाचाही प्रभाव पडू द्यायचा नसल्यामुळे एखाद्या थोर किंवा ग्रेट म्हटल्या जाणाऱ्या गोष्टीतील मोठेपणा काय आहे, तो तेवढय़ापुरता समजून घ्यायचा या विश्लेषक भूमिकेतूनच मी साहित्याकडे पाहत आलेलो आहे.

कथांबाबत माझ्या धारणा निराळय़ा असायचे कारण त्याच वेळी मी समकालीन हिंदी कथा वाचत होतो. समकालीन इंग्रजी कथाही मिळवून वाचत होतो. मराठीत किंवा इतर ठिकाणीही सर्वोत्कृष्ट कथेचा वस्तुपाठ म्हणून मी कोणत्याही कथेकडे पाहिले नाही.

नारायण धारप यांचं लिखाण मी त्याच वेळी वाचलं होतं. त्यांच्या आधी लिहिणारे खांबेटेही मला आवडत. खांबेटेंचा रमाकांत वालावलकर वाचला, हा एक वेगळाच प्रयोग आहे, हे मला तेव्हा लक्षात आलं होतं. त्याचबरोबर रहस्यकथांमधील इतर लेखकही वाचत होतो. अर्नाळकरही मी वाचले. पण अर्नाळकरांचा काळा पहाड मला तितकासा नाही रुचला. मी झुंझार आणि वीररस असणारे अर्नाळकरांचे इतर नायक वाचले. गुरुनाथ नाईक थोडकेच वाचले. वीरधवल मात्र या काळात वाचलेले आणि आवडलेले पुस्तक होते. नाथमाधव आणि गो. ना. दातारांची मोठय़ा आकाराची रूपांतरेही मी सवडीने वाचली, तेव्हा मला लक्षात आले, की यांना कुणी श्रेय देत नाहीये. पण हे खरे निष्णात कथनकार (मास्टर्स स्टोरीटेलर्स) आहेत. कारण इंग्रजी वातावरणातून भारतीय वातावरण निर्माण करून खिळवून ठेवणारी मोठी संहिता लिहिणं आणि अनेक पात्रांचा खेळ करणं हे सोपं नाही. हे सगळं त्या लेखकांनी केलं आहे.

पेरी मेसनच्या कथा वाचताना दोन गोष्टी आवडल्या. एक म्हणजे पेरी मेसन नावाच्या वकिलाची नैतिकता. त्याचा सच्चेपणा आणि झुंज हा दुसरा भाग. भाषा अमेरिकन असली, तरी १९३० मधली. त्या काळचं न्यूू यॉर्क आणि तिथली इतर शहरं. पेरी मेसन वाचल्यानंतर आपण इंग्रजी वाचू शकतो, याचा आत्मविश्वास आला. त्यानंतर मग इंग्लिशच नाही, तर अनुवाद होऊन इंग्लिशमध्ये आलेलं लेखनही सापडायला लागलं. विलास गीतेसारखा माझा मित्र, इंग्रजीतलं काय वाचले पाहिजे, हे सांगे. कोणती मासिके आपल्याकडे येतात, त्यांच्या वाटा तो दाखवत असे. मग मी त्या ठिकाणी जाऊन ती मुशाफिरी करीत असे. पण या ठिकाणी मी अभ्यासू वृत्तीने रमलेलो आहे, असे कधी झाले नाही. त्या वेळी जे उपलब्ध होतं आणि सांगितलं जायचं, त्याचंच वाचन केलं जायचं.

गॅब्रियल गार्सिया माख्र्वेज या दक्षिण अमेरिकेच्या लेखकाचे ‘वन हण्ड्रेड इयर्स इन सॉलिटय़ूड’ हे गाजलेलं पुस्तक त्यावेळी मिळवून वाचल्याचं आठवतं. इंग्रजी शिकवणारी प्राध्यापक मंडळी मराठीमध्ये मुशाफिरी करताना विचारत ‘तुम्ही माख्र्वेज वाचलाय का?’ मग लेखक मंडळी सांगत ‘नाही बुवा वाचला. ते कोण आहेत?’ मग प्राध्यापक जाणकार असल्यागत लॅटिन अमेरिकी, ब्लॅक लिटरेचरबद्दल सांगत. हा असं लिहितो, तो असं लिहितो असं बोलत. त्यांनी  मुळापासून ते वाचलेलं नसलं तरी त्यांचा आव मात्र तसा असायचा. मराठी लेखकाला त्याचे संदर्भही माहिती नसायचं. अनेक वर्षे असं अज्ञानाचं झालेलं शोषण हे मराठी लेखकांमध्ये न्यूनगंड निर्माण करणारं असे. तो मला नको होता. म्हणून मी हाती पडेल ते वाचत गेलो. 

लिहिता लिहिता सुचत जाणं हा लेखन प्रक्रियेचा एक भागच आहे. कारण सगळा तुमचा आराखडा पक्का झालाय आणि तुम्ही डागडुजी करताय. आराखडा तयार झाला आहे, फक्त मध्ये भिंतीच घालायच्यात, असं कधी होत नाही. निर्मितीची प्रक्रिया म्हणूनच गूढ अशी आहे. जेव्हा काही तुम्ही ठरवता, तेव्हा ते फार धुसर असं ठरवलेलं असतं. ते ठरत जाईपर्यंत आणखी दुसऱ्या गोष्टी तुमच्या समोर आलेल्या असतात. त्याही तुम्हाला कथेत उतरवण्यासाठी साद घालत असतात. त्याही मग तुम्ही पकडू पाहता. त्या संमिश्रणातून मग कथेची वास्तू बनते. त्यामुळे अगदी ठरवून लिहिणं. हे आपण सुव्यवस्थित बांधणी केलेल्या रहस्यकथेमध्येदेखील पाहू शकत नाही. कारण रहस्यकथेनेदेखील काही स्वातंत्र्य घेतलेलं असतं. त्यात मध्येच वेगळी व्यक्तिरेखाही येऊ शकते. अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांमध्ये अशी कितीतरी पात्रं आहेत, जी कथावस्तूला उपकारक आहेत. पण त्याचवेळी ती वेगळी काढली तर मुख्य धारेतील ललितगद्यामध्येही त्यांचा समावेश करता येईल. 

(साहित्य संमेलनात प्रकाशित होत असलेल्या ‘विस्तीर्ण पिंपळाची सळसळ – भारत सासणे यांच्या मुलाखती’ या पुस्तकातून)

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interview of bharat sasane president 95th akhil bharatiya sahitya samelan in udgir zws

ताज्या बातम्या