अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशिष्ट साहित्यकृती आणि शैली यांच्याशी जोडले जाण्याचे भाग्य फार कमी साहित्यकारांच्या वाटय़ाला येते. ती साहित्यकृती वाचली नसली तरी हे स्मरण होते. उदा. ‘पसायदान’ हा शब्द उच्चारला तरी संपूर्ण ज्ञानेश्वरी डोळय़ासमोर उभी राहते.

भागवत, भारुडे, मनाचे श्लोक, गाथा, दोहे, अभंग आदी शब्द नुसते उच्चारले तरी एकेक संत डोळय़ासमोर येतो. या मालेत शोभणारा एक शब्द आहे ‘गीताई’ आणि दोन चरण आहेत,

‘गीताई माउली माझी तिच़ा मी बाळ नेणता।

पडतां रडतां घेई उचलूनी कडेवरी।।’

या दोहोंमुळे क्षणात आठवते ते आचार्य विनोबा भावे हे नाव. पन्नाशी उलटलेल्या पिढीला एवढीही गरज पडत नाही.

‘गीताई’ म्हणजे गीतेचा अत्यंत सोपा अनुवाद ते ज्ञानेश्वरीनंतरचे काव्य अशी मतमतांतरे समोर येतात. यातले काही समज आहेत तर काही गैरसमज. जाणते लोक ‘गीताई’च्या मर्यादाही दाखवून देतात. एवढे असूनही तिचे महत्त्व मात्र कुणी नाकारत नाही. अगदी विनोबांचे टीकाकारही याला अपवाद नाहीत.

खुद्द विनोबा मात्र, वर दिलेले चरण म्हणजे ‘गीताई’ची प्रस्तावना आहे, हे सांगून मोकळे होतात. ‘पडतां रडतां’ हे शब्दप्रयोग म्हणजे वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणतात. संपूर्ण जीवन-प्रवासात – आध्यात्मिक आणि लौकिक – पातळीवर जेव्हा म्हणून पतनाचे क्षण आले, तेव्हा ‘गीताई’ने आपल्याला उचलले आणि कडेवर घेतले अशी त्यांची श्रद्धा होती.

वर दिलेल्या श्लोकाच्या पहिल्या चरणात ‘आई’ आणि ‘माउली’ हे दोन समानार्थी शब्द आले आहेत. ‘गीताई माझी आई’ हा सरळ अर्थ झाला. तथापि आणखी एक अर्थ लावता येईल. गीता आणि आईचे अद्वैत आहे आणि त्यापलीकडे गीताई ‘माउली’ रूपातही आहे.

आईने आज्ञा केली म्हणून विनोबा ‘गीते’कडे वळले. रुक्मिणीबाईंची म्हणजे विनोबांच्या आईची स्मृती म्हणून ‘गीते’ला आईची जोड लाभली. 

‘माउली’ हा शब्दप्रयोग व्यापक अर्थाने घेतला तर त्यात प्रत्येक माय-बहीण येईल. विनोबांनाही हे अभिप्रेत असावे. त्यांच्या मते, ‘‘..गीतेचे भाषांतर करताना सर्व आयाबहिणींना हा ग्रंथ उपयोगी पडावा व त्यांच्याद्वारे सर्व समाजाचे कल्याण व्हावे हीदेखील एक दृष्टी आहे. जर स्त्रियांच्या हातात ‘गीता’ आली तर समाजाचे केवढे कल्याण होईल याची कल्पना उपमेने देता येणार नाही. प्रत्येक घरात हे भाषांतर वाचले जाईल तर महान गृहशिक्षण मिळाले असे होईल. आम्ही गृहशिक्षणाकडे लक्ष दिले नाही. स्त्रियांना महत्त्वाच्या ग्रंथांचा परिचय करून दिला नाही. तरी आपापल्या परीने स्त्रिया शनिमाहात्म्य, व्यंकटेशस्तोत्र इ. इ. काही ना काही वाचतच असतात. पण एवढय़ाने कार्यभाग व्हावयाचा नाही.’’

वयाच्या विशीत आईच्या म्हणजे एका स्त्रीच्या आज्ञेनुसार विनोबा ‘गीते’च्या सोप्या रूपांतरणाकडे वळले आणि ‘साम्ययोगा’सारख्या एक दर्शनाचे निर्माते झाले. हे दर्शन आठ दशके जनसामान्यांच्या सेवेत होते. हा प्रवास पाहणे कुणाही संवेदनशील व्यक्तीला समृद्ध करणारा अनुभव ठरावा. येते वर्षभर आपण साम्ययोग आणि त्याच्या विविध छटा जाणून घेणार आहोत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samyog article author atul sulakhe geetai addhyay geetai literature zws
First published on: 03-01-2022 at 01:15 IST