scorecardresearch

राष्ट्रभाव : इथे फक्त भारतीय संस्कृतीच!

कोणत्याही राष्ट्राची संस्कृती त्या राष्ट्राचा आत्मा असतो. एक भूमी, एक जन आणि एक संस्कृती म्हणजेच राष्ट्र होते.

संमिश्र संस्कृती अशी काही गोष्ट इथे अस्तित्वातच नाही, कारण राष्ट्राची एकच संस्कृती असते. इथे फक्त भारतीय ही एकच संस्कृती आहे..

रवींद्र माधव साठे

कोणत्याही राष्ट्राची संस्कृती त्या राष्ट्राचा आत्मा असतो. एक भूमी, एक जन आणि एक संस्कृती म्हणजेच राष्ट्र होते. एका राष्ट्राची एकच संस्कृती असते. भारत किंवा हिंदूस्थान हे जर एक राष्ट्र आहे तर इथे संमिश्र संस्कृतीची गोष्ट करणे हे पूर्णत: अशास्त्रीय आहे. रसायनशास्त्रात संयुग आणि रासायनिक मिश्रण हे शब्दप्रयोग नियमित वापरण्यात येतात. त्याच्या उदाहरणाने माझा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. साखर, मीठ आणि वाळू या तीन गोष्टी समजा आपण एका पांढऱ्या कागदावर घेऊन एकत्र केल्या तरी त्या आपापली ओळख व गुणधर्म सोडत नाहीत. मिठाचे खारटपण सुटत नाही आणि साखर तिचा गोडवा सोडत नाही. हे झाले मिश्रणाचे किंवा संमिश्रतेचे उदाहरण. मात्र हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात तेव्हा हायड्रोजन आपले हायड्रोजनत्व विसरतो आणि ऑक्सिजन आपले ऑक्सिजनत्व. दोघेही एकरूप होऊन त्याचे जल बनते. तसेच देशाची संस्कृती, राष्ट्रीयत्व एकजीव होऊन स्वत:ची एक ओळख निर्माण करतात, त्यास रासायनिक  संयुग म्हणता येईल. तेथे संमिश्रतेची बाब शिल्लक राहात नाही.

दुसरा मुद्दा असा की भारतात संमिश्र संस्कृती आहे असे जी मंडळी म्हणतात तो नेमका काय विचार करतात? कारण संमिश्र संस्कृती होण्यासाठी दुसऱ्या एका संस्कृतीचे अस्तित्व गरजेचे आहे आणि अशी कोणती संस्कृती इथे आहे जिच्याबरोबर आपण मिळू- मिसळू शकतो. संमिश्र संस्कृती म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर लगेच इस्लाम किंवा ख्रिस्ती संस्कृती येते. परंतु भारतात व इतरत्र ख्रिस्ती किंवा इस्लाम नावाची संस्कृती नाही. संपूर्ण युरोपवर पोपचे आधिपत्य होते त्या वेळी त्यांनी ख्रिश्चॅनिटीला संस्कृती म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा दावा असा होता की ज्याअर्थी पूर्ण युरोपमध्ये ख्रिस्ती आहेत त्याअर्थी ख्रिस्ती एक संस्कृती आहे, आणि पूर्ण युरोप ख्रिस्ती आहे. त्यामुळे माझ्या वर्चस्वाखाली संपूर्ण युरोप राहील. परंतु त्यांचा हा दावा चुकीचा ठरला. कारण युरोपमधील प्रत्येक राष्ट्राची स्वतंत्र संस्कृती होती आणि तिने डोके वर काढले. पोपचे ठोकताळे चुकले. फ्रान्सीसी संस्कृतीवाल्यांनी फ्रान्स राष्ट्राचे गठन केले, आंग्ल संस्कृतीवाल्यांनी ब्रिटन, जर्मन संस्कृतीवाल्यांनी जर्मनी. वेगवेगळय़ा राष्ट्रांची निर्मिती त्याच युरोपमध्ये झाली जिथे पोपने आपले प्रभुत्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे दोन्ही महायुद्धे ख्रिश्चन राष्ट्रांमध्येच झाली. मुद्दा हा की, एका संस्कृतीचे एक राष्ट्र असते आणि ख्रिस्ती एक संस्कृती असती तर एवढी राष्ट्रे झाली नसती आणि सर्व ख्रिस्ती मिळून एक राष्ट्र निर्माण झाले असते.

जे ‘ख्रिस्ती’ संस्कृतीबद्दल तेच इस्लामच्या बाबतीतही आहे. कारण इस्लाम नावाचा पंथ आहे, संस्कृती नाही. आम्ही भारतीय मूलत: धर्मसहिष्णु आहोत. त्यामुळे इस्लामबद्दल आदर राखण्यात कोणतीही समस्या नाही. परंतु इस्लाम नावाची संस्कृती नाही. ती असती तर इजिप्तपासून इंडोनेशियापर्यंत एक राष्ट्र झाले असते. इथेसुद्धा अनेक राष्ट्रे आहेत आणि एक इस्लामी राष्ट्र आपल्या हितासाठी दुसऱ्या इस्लामी राष्ट्रासाठी लढते हाही इतिहास आहे. इराण-इराक संघर्ष हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. प्रथम महायुद्धानंतर मुस्लीम देशांमध्येसुद्धा राष्ट्रीयत्वाचे जागरण होऊ लागले आणि यातील प्रत्येकाला वाटू लागले की कोणाची अफगाण संस्कृती आहे, कोणाची इराकी, कोणाची इराणी, कोणाची अरब व अशा प्रकारे वगवेगळी राष्ट्रीयत्वे निर्माण झाली. इस्लामी राष्ट्रांमध्येसुद्धा वेगवेगळ्या संस्कृती आहेत. इस्लामी राष्ट्रांची एक संस्कृती नाही. यात आश्चर्य हे की जिथे शत-प्रतिशत मुस्लीम होते, तेथे कट्टरपंथी मुल्ला-मौलवींनी राष्ट्रीयतेस विरोध केला होता.

गाझी अमानुल्ला खान हा १९१९- २९ या काळात अफगाणिस्तानचा राजा होता. त्या वेळी त्याने घोषित केले की आपण मुसलमान आहोत, मोहम्मद पैगंबरांना अवश्य मानतो, कुराण आम्हाला पवित्र आहे परंतु आमची संस्कृती अफगाणी आहे. अमानुल्लाच्या या भूमिकेमुळे तेथील कट्टरपंथी मौलवींनी यावर तीव्र आक्षेप घेतला व अमानुल्लास गादी सोडावी लागली. इराणमध्ये राष्ट्रीयत्वाचे जागरण झाले त्या वेळी तेथे संस्कृती, राष्ट्रीय इतिहास, पूर्वजांचे स्मरण करण्यात आले. यांत जमशेद, रुस्तम, सोहराब अशा पूर्वजांचा समावेश होता. त्यावर मुल्ला-मौलवींनी असे मत दिले की सोहराब, रुस्तम हे तर काफीर आहेत कारण ते बिगर-मुस्लीम आहेत. पैगंबरांचा जन्म १४०० वर्षांपूर्वी झाला होता आणि ही मंडळी त्यापूर्वी जन्मास आली त्यामुळे ते मुस्लीम कसे असतील. परंतु इराणी संस्कृती आणि इराणी राष्ट्रीयतेचे हे महापुरुष असल्यामुळे ते स्मरणीय आहेत असे तेथील जनतेस मात्र वाटत होते. मुल्ला-मौल्लवींना तिथे आपली एकाधिकारशाही समाप्त होत आहे असे भासू लागले म्हणून त्यांनी विरोध केला. मिस्र (इजिप्त) देशातही राष्ट्रीयतेचे जागरण झाले आणि प्राचीन इतिहासाबद्दल अभिमान जागृत झाला. तेथील प्रसिद्ध पिरॅमिड्स फारो (Pharoah) राजाने निर्माण केले होते. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने तो स्मरणीय होता. त्याचा परिणाम असा झाला की तेथील प्रमुख रस्ते, ग्रंथालये यांना फारो राजाची नावे देण्यात आली. जागोजागी त्याच्या प्रतिमा व पुतळे होऊ लागले. परंतु तेथील कट्टरपंथी मौलवींनी त्यास जोरदार विरोध केला. कारण या राजाचा जन्म पैगंबराच्या आधीचा, त्यामुळे तो मुस्लीम नाही असा मौलवींचा दावा. परिणामत: नवजागृत राष्ट्रवादी मिस्री आणि धर्माध मिस्री यांच्यात संघर्ष झाला.

तुर्कस्तानच्या कमाल पाशाचे तर अनोखे उदाहरण आहे. कमाल पाशाने तेथील खिलाफत नष्ट करून आधुनिक तुर्कस्तानची निर्मिती केली. पाशाने तुर्की राष्ट्र आणि तुर्की संस्कृतीवर भर दिला. त्यानेही म्हटले की आम्ही इस्लामला मानतो, मोहम्मद पैगंबरांना, कुराणला मानतो. आम्ही मशिदीत जाऊ. परंतु इस्लामच्या नावावर तुर्की लोकांवर अरब संस्कृतीचे आक्रमण आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे त्यांनी अरबी संस्कृतीच्या सर्व प्रतीकांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पाशाने केलेल्या या प्रयत्नांमुळे तेथील कट्टरपंथी नाराज झाले आणि तुर्कस्तानमध्येही मोठय़ा प्रमाणात दंगे व रक्तपात झाला. कमाल पाशा व त्याचे मार्गदर्शक झिया गॉक अल्प यांनी या रूढीवादी मौलवींच्या विरोधास न डगमगता परिवर्तन घडवले.

मुदलात काय तर, सर्व ठिकाणी मूळ संघर्ष आहे तो राष्ट्रवाद विरुद्ध कट्टरपंथी मानसिकता असा. शेवटी प्रत्येक राष्ट्राची एक संस्कृती, सभ्यता व भावविश्व असते आणि त्यात राहणाऱ्या सर्व घटकांनी त्याच्याशी समरूप व्हावे लागते. भारतात भारतीय संस्कृती हीच येथील राष्ट्रीय संस्कृती आहे याची यच्चयावत लोकांना जाणीव हवी. एकदा ही मानसिकता तयार झाली तर देशाच्या दृष्टीने हितकारक ठरेल. भारतात तर सर्व धर्माच्या लोकांना उपासनास्वातंत्र्य आहे आणि येथील सर्व मुसलमान काही अरबस्थानातून आलेले नाहीत वा सर्व ख्रिस्ती रोममधून आलेले नाहीत. त्यांचे खानदान भारतीय आहे. सर्वाचे पूर्वज एक आहेत. इतिहास एक आहे आणि संस्कृती एक आहे.

इंडोनेशियाचे उदाहरण आपल्या सर्वाना पथदर्शी आहे. तो देश स्वतंत्र झाला त्या वेळी डॉ. सुकार्णो हे तेथील राष्ट्रपती होते. १९४६ च्या सुमारास त्यांनी पं.नेहरूंना पत्र लिहिले. हा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यांत सुकार्णो म्हणतात ‘‘आम्ही आपले ऋणी आहोत, कारण भारताची जी सांस्कृतिक विरासत आहे तिचा आम्ही उपभोग घेत आहोत’’. इंडोनोशिया हा एक मुस्लीम देश. तिथे ८७ टक्के लोक मुस्लीम आहेत. परंतु त्यांची संस्कृती हिंदू आहे. सर्वजण कुराण वाचतात, मशिदीत जातात. महम्मद पैगंबरांना मानतात. परंतु त्याच वेळी रामलीला उत्सव साजरा करतात. रामायण, महाभारतातील कथा वाचतात. पांडव आणि प्रभु रामचंद्राला आपले पूर्वज मानतात. त्यांच्या विमानसेवेचे नाव गरुडा एअरवेज असे आहे.

एकदा पाकिस्तानच्या  परराष्ट्र मंत्र्यांनी एका आंतरराष्ट्रीय संमेलनात इंडोनेशियाच्या पंतप्रधानांना विचारले होते की ‘‘तुम्ही मुसलमान असून राम आणि कृष्णाला कसे मानता?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिले की ‘‘ऐतिहासिक कारणांमुळे आम्ही आमचा धर्म जरूर बदलला आहे, उपासना पद्धती बदलली आहे परंतु आम्ही आमचे पूर्वज बदलले नाहीत’’. तिथे असे घडते की शाळेत जाणारा विद्यार्थी कुराण वाचतो आणि परीक्षेला जाण्यापूर्वी गणेशाची पूजा करतो. इंडोनेशिया, धर्ममतानुसार इस्लामी आहे. परंतु तेथील संस्कृती मात्र हिंदू आहे. (संदर्भ : दत्तोपंत ठेंगडी यांचे भाषण दि. १६ सप्टेंबर १९७०, नागपूर)

मुद्दा हा की, इस्लाम किंवा ख्रिस्ती हे धर्ममत किंवा पंथ होऊ शकतात परंतु या नावाची कोणतीही संस्कृती अस्तित्वात नाही. त्यामुळे भारतात संमिश्र संस्कृतीची गोष्ट केली जात असेल तर ते गैर आहे. येथील राजकारण्यांनी सत्तेच्या हव्यासापायी असत्याशी समझोता केला म्हणूनच मिली-जुली संस्कृती या शब्दाचा उदोउदो झाला. जी संस्कृती अस्तित्वातच नाही त्याच्याशी मिसळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण शेवटी एका राष्ट्राची एकच संस्कृती असते. इथे एकच भारतीय संस्कृती आहे. आपापले धर्मग्रंथ म्हणजे कुराण किंवा बायबल वाचून, महम्मद पैगंबर किंवा येशू ख्रिस्ताला मानून येथील मुस्लीम व ख्रिस्ती हे राष्ट्रीय दृष्टीने भारतीयच आहेत, हे सर्वानी समजून घेण्याची आवश्यकता आहे.

ravisathe64@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rastrabhav only indian culture composite culture of the nation ysh