लता मंगेशकर

शब्दांकन : शांता ज. शेळके

लता मंगेशकर.. एक रूप.. अनेक रंग. शतकाशतकातून क्वचितच पृथ्वीतलावर होणाऱ्या अशा चमत्काराचे अर्थनिधान करण्याचे अगणित प्रयत्न आजवर झाले. आजही होत आहेत. पुढेही होत राहतील. अगदी स्वत: लतानेही आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं तरी तिच्याही कवेबाहेरचं हे आहे,  हाच प्रत्यय येतो..

कोल्हापूरला आम्ही आलो तेव्हा बेचाळीस साल संपत होते. त्रेचाळीस साल उजाडत होते. एकोणतीस तारखेला रात्री आम्ही पुण्याहून निघालो आणि तीस तारखेच्या पहाटेला कोल्हापुरात पाऊल ठेवले. ही तारीख नेमकी माझ्या ध्यानात राहिली त्याला एक कारण आहे. कोल्हापूरला आल्यावर दुसऱ्याच दिवशी रात्री आम्ही सिनेमाला गेलो. रात्री बारा वाजता शो चालू असताना मध्ये पडद्यावर एक स्लाइड दाखवली गेली. तिच्यावर लिहिले होते : ‘बेचाळीस साल संपले.’

कोल्हापूरला आल्यावर पहिले दोन दिवस सामान लावण्यात गेले. नंतर स्टुडिओत येण्याचा मला निरोप आला. आमच्या राहत्या जागेपासून शालिनी स्टुडिओ दोन-अडीच मैल तरी लांब असावा. विनायकरावांनी कोल्हापूरला आल्यावर ‘प्रफुल्ल’चा संसार तिथे थाटला होता आणि यावेळी ‘माझे बाळ’ चित्रपटाचे शूटिंग चालू होते.

मला स्टुडिओत न्यायला बग्गी आली होती. तिच्यात बेबी आचरेकर, वसंतराव जोगळेकर वगैरे मंडळी होती. त्यांच्याबरोबर बग्गीत बसून मी शालिनी स्टुडिओत गेले. खूपच मोठे आवार होते या स्टुडिओचे. ‘प्रफुल्ल’चा बारदाना खूप मोठा होता. हळूहळू तिथल्या सर्व लोकांशी माझी ओळख झाली. आणि त्यांतल्या काहींशी माझा चांगला स्नेहही जमला. स्टुडिओतली सर्वात महत्त्वाची व्यक्ती अर्थातच विनायकराव. त्यांचे वय यावेळी पस्तीस-छत्तीस वर्षांचे असावे. भरपूर काळा रंग, खूप दाट कुरळे केस, गोल गोबरा चेहरा, उत्साही, बडबडय़ा स्वभाव ही त्यांची वैशिष्टय़े होती. विनायकरावांच्या काम करण्याच्या पद्धतीत फारशी शिस्त नव्हती. त्याऐवजी कलावंताचा लहरीपणाच तिथे विशेष दिसून येई. पण त्यांची कामाची पद्धती चांगली होती. अभिनयातले अनेक सूक्ष्म बारकावे ते उत्तम रीतीने समजावून देत.

ते मला सांगत, ‘‘लता, सेटवर येत जा. शूटिंग चालू असेल तेव्हा ते मुद्दाम पाहत जा. म्हणजे तुला तुझ्या शूटिंगच्या वेळी सोपं जाईल.’’ विनायकरावांपुढे मी देवासारखी गप्प बसून राही. एरव्ही मात्र माझ्या इतक्या खोडय़ा चालत, की देवदेखील मला गप्प करू शकला नसता!

स्टुडिओमध्ये माझा वेळ चांगला जाऊ लागला. तिथले एकंदर वातावरण असे मोकळे, घरगुती होते की मला आपण तिथे काम करीत असल्याची भावना सहसा झाली नाही. पुन्हा जे काही काम करावे लागे तेही दीड-दोन तासांपुरते असल्यामुळे त्याचा विशेष ताण कधी जाणवला नाही. मी सारा दिवसभर स्टुडिओत सगळीकडे भटकत असे. स्टुडिओचे आवार खूप मोठे होते. भोवती मोकळे रान होते. बाजूला दूरवर पसरलेली शेते होती. स्टुडिओच्या आवारात चिंचांची झाडे होती. बोरांची झाडे होती. चिंचा, बोरे असले खाणे मला मनापासून आवडे. या झाडांवरून चढून मी चिंचा व बोरे काढीत असे. एकदा विनायकरावांनी माझा हा उद्योग पाहिला आणि त्यांनी मला सडकून दम भरला.

माझा भटकेपणा सारखा चालू असे. या दिवसांत माझ्याकडे एक जुना ब्राऊन कोट होता. तो मला फार आवडे. तो अंगात अडकवून स्टुडिओभर मी एकसारखी भटकत असे. कंपनीचे कुठलेही खाते मला वर्ज्य नव्हते. मी सगळीकडे हिंडत असे आणि सारे काही कुतूहलाने बघत असे. दुपारी सवड मिळाली की मी मोल्डिंग डिपार्टमेंटमध्ये जाऊन बसे. तिथे बाबूराव जाधव, गायकवाड, पवार, हावळ, मंडलिक हे लोक असत. बाबूराव जाधव मला पेंटिंग शिकवीत. मी तिथे पेंटिंग शिके. मेणाची फुले करीत बसे. रेकॉर्डिग विभागात आप्पासाहेब जाधव माझ्याशी फारच प्रेमाने वागत. माझे गाणे त्यांना आवडायचे. ते स्वत:ही सुरात गात. त्यामुळे आम्ही दोघे तासन् तास गात बसत असू. चिपाडे, बेबी रेणुका, अलका आचरेकर, दादा साळवी आणि मी- आम्हाला रिंग खेळायचा भारी नाद होता. तेव्हा रिंग खेळण्यातही बराच वेळ जाई. पागे हे कंपनीचे डान्समास्तर होते. ते आम्हाला डान्स शिकवीत. कथ्थक नृत्याचे पाठ मी त्यांच्यापाशीच घेतले. पण का कोण जाणे, नृत्यात माझे मन तितकेसे रमले नाही. वाचनाचेही जबरदस्त वेड मला याच काळात लागले. इंदूरची माझी मावसबहीण आक्का  आमच्याकडे राहायला आली होती. ती गावातल्या एका वाचनालयातून पुस्तके घेऊन येई. ती पुस्तके मी भराभर वाचून काढी. खांडेकर आणि सानेगुरुजी हे त्या काळातले माझे आवडते लेखक होते. त्या दोघांची मिळतील तेवढी सारी पुस्तके मी वाचून काढली.

आमची डान्स प्रॅक्टिस आणि गाण्याच्या तालमी रोज चालत. शेवटी माझ्या गाण्याच्या रेकॉगर्डिचा दिवस उजाडला. ‘नाही मी पोरटी छोटी आता’ हे गाणे मला गायचे होते. त्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून मी सारखी गात होते, पण विनायकरावांच्या ते काही केल्या मनासच येईना. दुपारनंतर माझा आवाज थकला. मीही थकून गेले. त्यातून ते कोल्हापूरचे रेकॉर्डिग. उजेडच सगळा. शेवटी कसेबसे संध्याकाळी चार-पाचच्या सुमाराला रेकॉर्डिग संपले. आणि माझा जीव व घसा दोन्ही एकदाचे भांडय़ात पडले.

‘माझे बाळ’ चित्रपटातले माझे पहिले शूटिंग ज्या दिवशी झाले तो दिवस मला अजून आठवतो. त्या दिवशीचा माझा वेष पाहण्यालायक होता. धोतर, अंगरखा, उपरणे, डोक्याला रुमाल, डोळ्यांना चष्मा असा पोशाख माझ्या अंगावर चढवलेला होता. अनाथाश्रमातली एक मुलगी आश्रमाचे चालक अण्णा यांचा वेष करून खेळत आहे असा सीन होता. पण मला ते सारे कसेसेच वाटत होते. मला पहिलेच वाक्य होते, ‘‘व्हॉट डू यू वॉट?’’ पण मला बराच वेळ ते वाक्य म्हणायलाच जमेना. त्यामुळे मी अधिकाधिक बावरून जात चालले. विनायकरावांची शिकवण्याची पद्धती फार चांगली होती. आणि वेगळीही होती. पण त्यांच्या कामात शिस्तीऐवजी लहरीपणाचा भाग अधिक असे. ते कधी तालमी घेत नसत. ऐनवेळी सेटवर वाक्येच्या वाक्ये बदलीत. त्यामुळे गोंधळल्यासारखे होऊन जाई. त्यातून मला गाणे कितीही आवडत असले तरी चित्रपटात काम करणे मला कधीच पसंत नव्हते. वय वर्षे चौदा.. म्हणजे खेळ, खोडय़ा, दंगामस्ती यांत मन जास्त रंगायचे. पेंटिंग आवडायचे. पण तासभर तोंडाला रंग थोपटून दिव्यांच्या झगमगाटात कॅमेऱ्यासमोर नाटक करण्याचा तिटकारा येई. तरीही ‘गरजवंताला अक्कल नसते’ या म्हणीला अनुसरून मी सांगतील ती कामे करीत होते. त्यामुळे शूटिंगच्या त्या पहिल्या खेपेला माझ्या मनाला फार त्रास झाला. ‘माझे बाळ’मधल्या एका सीनमध्ये मीना, आशा, उषा, बाळ हे सारेजण होते. त्यांना तसे काम करताना बघूनही माझे मन अतिशय उदास झाले. याचवेळी हृदयनाथवरच्या प्रेमापोटी एक चूक मी केली. या सीनमध्ये अनाथाश्रमातल्या मुलांच्या अंगावर ठरावीक कपडे घातलेले होते. बाळसाठी ते कपडे मी मागितले आणि मला नकार मिळाला. त्यामुळे मनाला डागण्या बसल्यासारखे झाले. आपण जे करू नये ते केले या जाणिवेने नंतर कितीतरी काळ मला दु:ख होत राहिले.

तसे जर पाहिले तर कंपनीत मी साऱ्यांची फार लाडकी होते. काही मोजके अपवाद सोडले तर बाकी साऱ्यांनी मला तिथे अतिशय ममतेने वागवले. विनायकरावांना माझे गाणे फार आवडे. त्याचे त्यांना कौतुकही असे. पण ते ज्या तऱ्हेने आल्या-गेल्यासमोर मला गायला लावीत ते मला मनातून फारसे रुचत नसे. ‘उसना नवरा’ नाटक झाले, त्यातदेखील मला गाणे म्हणायला लावले. पुढे पुढे मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येऊ लागला. तेव्हा मी अजाण, अननुभवी होते. वडलांच्या वेळचे माझे जग मर्यादित होते. आमची ऑर्थोडॉक्स फॅमिली. बाहेरच्या रंगीबेरंगी, चटकफटक जगाचा मला वारा नव्हता. घराबाहेर काय काय घडू शकते त्याची जाणीव नव्हती. आणि आता एकदम मी व्यवहारात, बाहेरच्या जगात फेकली गेले होते. मनात येई : आपल्याला शिक्षण नाही. आपल्याला जगाचा म्हणावा तसा अनुभव नाही. वडीलधाऱ्या माणसाचा आधार नाही. आपली जर नोकरी सुटली तर आपले काय होईल? या कल्पनेने माझे मन भयभीत होऊन जाई.

विनायकरावांची माझ्यावर एक दहशत असे. दबाव असे. एकतर ते ‘प्रफुल्ल’चे मालक होते. कंपनीचे प्रमुख होते. कलावंत, दिग्दर्शक म्हणून ते फार मोठे होते. त्यांच्याविषयी मला आदर वाटे. पण त्यात भीतीही असे. पुन्हा विनायकराव सतत वाङ्मयीन बोलत. ध्येयवादाच्या गोष्टी सांगत. त्यामुळेही त्यांचा माझ्यावर दरारा असे. हा प्रभाव इतका जबरदस्त होता, की विनायकराव गेल्यानंतरदेखील मनावर दीर्घकाळ त्यांचा दबाव राहिला.

माझ्या ठिकाणी त्या दिवसांत मुळीच आत्मविश्वास नव्हता. गाण्यात मी पटाईत होते. त्याबाबतीत मी कुणालाच कधी भीत नसे. पण त्यापलीकडे मला स्वत्वाची जाणीव आलेली नव्हती.

‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात काम करीत असताना, ‘नटली चैत्राची नवलाई’सारखी त्यातली गाणी गात असताना नूरजहॉंच्या गाण्यांनी मला भारून टाकले होते. चित्रपटातले गाणे सुरेलपणे आणि उत्कट भावपूर्णतेने कसे म्हणावे याचा प्रत्यक्ष वस्तुपाठच सहगल आणि नूरजहाँ या थोर कलावंतांनी मला दिला होता. ‘प्रफुल्ल’मध्ये मी काम करीत असताना याच दृष्टीने आणखी एक संस्कार माझ्या मनावर झाला. ‘बॉम्बे टॉकीज’चा ‘बसंत’ हा चित्रपट कोल्हापूरला लागला. ‘बसंत’मधली ‘मेरी छोटीसी दुनिया’सारखी गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. मलाही ती गाणी फार आवडली. पण तोपर्यंत ‘प्लेबॅक सिंगिंग’ची काहीच कल्पना मला नव्हती. चित्रपटात काम करणारी जी नटी असेल तीच स्वत:ची गाणी गाते अशी माझी समजूत होती. ‘बसंत’प्रमाणे ‘हमारी बात’ या चित्रपटातली गीतेही मला विलक्षण आवडली. ऐ बादे सबा इठलाती ना आ’ हे एक गाणे तर माझ्या फारच आवडीचे होते. एकदा या गाण्यासंबंधी मी वसंतराव जोगळेकरांशी बोलत होते. तेव्हा चित्रपटातल्या गाण्याबद्दल माझ्या डोक्यात असलेला घोटाळा त्यांच्या ध्यानी आला आणि ते हसून मला म्हणाले, ‘‘लता ही गाणी काही चित्रपटातल्या नटीने म्हटलेली नाहीत.’’

‘‘मग कुणी म्हटली आहेत ती?’’ आश्चर्याचा धक्का बसून मी त्यांना विचारले.

‘‘ही गायिका आहे पारुल घोष.’’ वसंतराव म्हणाले, ‘‘पन्नालाल घोष यांची पत्नी आणि संगीत दिग्दर्शक अनिल विश्वास यांची सख्खी बहीण.’’

मग मला ‘प्लेबॅक’ ही गोष्ट प्रथम कळली. आणि अशा रीतीने पारुल घोष या गायिकेची माहिती मला झाली. पारुल घोषची गाणे म्हणण्याची पद्धत फार मोहक होती. तिचा स्वर जरासा जाड होता. शब्दोच्चारांना बंगाली वळण होते. पण त्या जाड स्वरात अतोनात लडिवाळपणा, आर्जव असे. आणि गाण्यात भावना ओतप्रोत भरलेली असे. पारुल घोष मोठी सुरेल गायिका होती. गाण्यातल्या तिच्या हरकती, मुरक्या साफ, स्वच्छ येत. पारुल घोषची गाणी ऐकल्याबरोबर मी सारखी तिच्या गाण्यांची नक्कल करण्याचा सपाटा लावला.

कंपनीतले माझे दिवस असे चालले होते. पण घरची परिस्थिती मात्र बिकट होती. माझे कुटुंब आता वाढले होते. कारण इंदूरची अक्का यावेळी आमच्याकडे येऊन राहिली होती. तिची दोन मुले- विद्या व अरुण- हीही तिच्याबरोबर होती. शिवाय माई व आम्ही पाच भावंडे मिळून नऊ माणसांचे आमचे कुटुंब होते. कंपनीकडून मला ऐंशी रुपये पगार मिळे. तेवढय़ात सारे घर चालवणे ही अवघड गोष्ट होती. त्यामुळे आपण मिळवून आणले नाही तर अवस्था कठीण आहे, ही जाणीव मला सतत असे.

एक मात्र खरे.. आम्हा भावंडांचा वेळ कोल्हापूरला मजेत जाई. कोल्हापूरला आल्यानंतर आशा, मीना, उषा यांना मी ‘विद्यापीठा’त शाळेत घातले होते. मुले तिथे नियमितपणे जात. शिक्षणाबद्दल मला सतत आस्था वाटे. त्याचे महत्त्व जाणवे. पोरकेपणामुळे, आपल्या परिस्थितीमुळे हा एक भाग मुलांचा अज्ञात राहील असे मला भय असे. त्यामुळे मी सतत त्यांना सांगे, ‘‘मी शिकले नाही, पण तुम्ही शिका. ग्रॅज्युएट व्हा.’’ ग्रॅज्युएट होणे ही माझ्या दृष्टीने शिक्षणातली मोठी पायरी होती.

कोल्हापूरच्या त्या बिकट दिवसांतही आम्ही आमचे आनंद, आमच्या साध्या साध्या करमणुकी शोधून काढल्या होत्या. आमची अक्का वाचनालयातून पुस्तके आणी. ती मी अधाशासारखी वाचत असे. आणा- दोन आण्याला मिळणारी ‘नेसल्स’ चॉकलेटची लाल पॅकेट्स आणून चॉकलेट खाणे ही आमची स्वस्तातली चैन असे. पण आमची सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे सिनेमा बघणे. सिनेमाचे पहिल्यापासून मला भयंकर वेड आहे. त्यावेळी कोल्हापुरात ‘राजाराम’, ‘प्रभात’, ‘रॉयल’, ‘पद्मा’ ही थिएटरे होती. त्यांना आम्ही नेहमी भेट देत असू. त्यातल्या त्यात ‘पद्मा’ थिएटर माझ्या विशेष आवडीचे होते. त्याचे कारण एवढेच- की तिथे दोन आणे हा तिकिटाचा दर होता. तो आम्हाला परवडण्याजोगा असे.

त्रेचाळीस साली विनायकरावांनी माझ्या वडलांची पहिली पुण्यतिथी कोल्हापूरला साजरी केली. हा समारंभ कोल्हापूरच्या ‘पॅलेस’ थिएटरमध्ये झाला. कार्यक्रमात मी माझ्या वडलांची गाजलेली दोन गाणी गायिली. ती ‘मानापमान’ नाटकातली होती. ‘शूरा मी वंदिले’ आणि ‘भाळी चंद्र असे धरिला.’ त्यानंतर सहगलचे प्रसिद्ध ‘मैं क्या जानू क्या जादू है’ हे गाणे मी गायिले. त्या गाण्याला मी तीन ‘वन्स मोअर’ घेतले. तरीदेखील का कोण जाणे, त्या दिवशी गाण्याची भट्टी बरोबर जमली नसावी. लोकांना जरी माझे गाणे आवडले तरी विनायकराव, माई यांना माझे त्या दिवशीचे गाणे पसंत पडले नाही. विनायकराव तर तिथल्या तिथेच म्हणाले,

‘‘काही चांगली गायली नाहीस तू.’’

माईही घरी आल्यावर मला म्हणाली,

‘‘लता, आज तुला काय झाले होते? तू गाताना अशी का तोंडे वेडीवाकडी करीत होतीस? तुझे वडील तुला नेहमी सांगायचे, गाताना तोंड सरळ ठेवावे. ते तू विसरलीस वाटते?’’

आधीच माझे मन उदास झाले होते. त्यात माईचा अभिप्राय ऐकून मला रडूच कोसळले. मी खूप रडले.

हा कार्यक्रम आर्थिकदृष्टय़ा मात्र यशस्वी झाला. कार्यक्रमाला तेवीसशे रुपये उत्पन्न झाले होते.

‘प्रफुल्ल’मध्ये कोल्हापूरच्या मुक्कामात मी तीन चित्रांतून काम केले. ‘माझे बाळ’, ‘चिमुकला संसार’ आणि ‘गजाभाऊ’ हे ते तीन चित्रपट. चित्रपटात काम करणे मला मुळीच आवडत नसे. इतकेच नव्हे, तर नंतर चित्रपटातली आपली छबी पाहण्याचेही मला कौतुक किंवा औत्सुक्य वाटत नसे. काम केलेच पाहिजे आणि पैसे कमावून घरी आणलेच पाहिजेत, हा भाव मनात असे, एवढेच. चित्रपटातल्या गाण्यांची मात्र मला फार आवड असे. आणि गाण्याच्या रिहर्सल्स मी अगदी मन लावून करी. रिहर्सल्सच्या वेळी विनायकराव बहुधा हजर असत. अनेकदा ते गाण्यात बदलही सुचवीत. गाणे एकदा बसले की ते सतत माझ्या तोंडात घोळत असे. स्टुडिओत, घरी, दारी सगळीकडे मी गाणी म्हणायची आणि दिवसभर लकेऱ्या मारीत हिंडायची. ‘गजाभाऊ’ हा चित्रपट फक्त माझ्यासाठी घेतला होता आणि मला त्यात महत्त्वाची भूमिका होती. आणि माझ्या जोडीने दामूअण्णा मालवणकरांना काम होते. दत्ता डावजेकरांनी या चित्रपटाला सुरेख संगीत दिले होते. मला या चित्रात एकंदर तीन गाणी होती. ‘धाव संख्या गिरिधारी’ हे सॅड गाणे होते. त्याप्रमाणेच ‘वाहते सुखाचे वारे’ आणि ‘दैवाचे चक्र फिरे’ अशी आणखी दोन गाणी होती. या चित्राचे काही शूटिंग कोल्हापूरला व काही मुंबईला झाले. चव्वेचाळीस सालच्या एप्रिलच्या चौदा तारखेला मुंबईत तो कुप्रसिद्ध स्फोट झाला. त्याच्या जरा नंतर शूटिंगसाठी आम्ही मुंबईला आलो होतो..

दरम्यान एक घटना घडली. भालजी पेंढारकरांकडून त्यांच्या ‘प्रभाकर पिक्चर्स’मध्ये नोकरीसाठी मला विचारणा करण्यात आली. बाबांची माझी प्रत्यक्ष गाठ पडली नाही, पण त्यांचे एक सहकारी जयशंकर दानवे मला विचारायला आले होते. बाबा मला महिना तीनशे रुपयेप्रमाणे पगार द्यायला तयार होत.े मी बुचकळ्यात पडले. काय करावे, ते मला कळेना. पंधरा वर्षांचे वय. कुटुंबाची वाढती जबाबदारी. बाळचा आजार. कोल्हापूरला आमचे तसे हालच होत होते. शेवटी विनायकरावांना प्रत्यक्ष भेटून काय ते बोलावे म्हणून मी, माई व बाळ स्वतंत्रपणे मुंबईला आलो. मी विनायकरावांची भेट घेऊन त्यांना म्हणाले, ‘‘मला कंपनी सोडायची आहे.’’

‘‘का?’’ विनायकरावांनी आश्चर्याने विचारले.

‘‘पगार ऐंशी रुपये. मला दिवसेंदिवस परवडेनासे झाले आहे. एवढय़ा पगारात कोल्हापूरला घर चालवणे मला अशक्य आहे. मी भालजी पेंढारकरांकडे नोकरी करायचे ठरवले आहे. ते मला तीनशे रुपये महिना पगार द्यायला तयार आहेत.’’ एका दमात मी सर्व सांगून टाकले.

माझे बोलणे ऐकून विनायकराव बरेच बेचैन झाले असावेत. क्षणभर ते काहीच बोलले नाहीत. जरा वेळाने ते इतकेच म्हणाले, ‘‘लता, माझे ऐक. तू कंपनी सोडू नकोस. इथे मुंबईला ये. मी सध्या दोनशे रुपये पगार करतो तुला.’’

विनायकरावांनी असे सांगितले तेव्हा तूर्त कंपनी सोडण्याचा विचार मी रहित केला.

मग पंधरा दिवस मी मुंबईलाच विष्णुबागेत राहिले. पण माझे मन दिवसेंदिवस अधिकाधिक अस्वस्थ होत चालले. भोवताली जे

वातावरण होते, ज्या तऱ्हेचे प्रकार घडत होते,

ते पाहून मला त्या साऱ्याचा तिटकारा वाढू लागला. माझे वय वाढते होते. एक नवी जाणीव, नवी दृष्टी येत होती. त्या नजरेने मी जगाकडे बघायची. अशा वेळी मोठय़ा माणसांच्या ज्या गोष्टी नजरेपुढे येत, त्यांच्या योगाने मनाला धक्का बसे. कित्येकदा माझ्या जिवाला दुखवणाऱ्या घटनाही घडत.

(१९८८ च्या ‘मौज’ दिवाळी अंकातील

संपादित लेख.. साभार)