क्रिकेट हा इंग्रजांनी शोधलेला भारतीय खेळ असल्याचे गमतीने म्हटले जाते. क्रिकेट विश्वावर आज सर्वार्थाने भारताची सत्ता असली, तरी या सत्तास्थानापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यावश्यक असलेली खेळाविषयीची आसक्ती ही आजची नाही. गोऱ्या अंमलदारांनी या देशात क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून भारतीयांना क्रिकेटविषयी आकर्षण वाटू लागले होते. प्रत्येक दशकागणिक या आकर्षणात भरच पडत गेली. इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतरही क्रिकेट या देशात राहिले आणि रुजले. साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात एकीकडे भारतीय क्रिकेट संघाची वाटचाल धिम्या गतीने होत असताना, रेडिओच्या माध्यमातून हा खेळ घराघरांत पोहोचवण्याचे श्रेय भारतातील जाणकार आणि रसिक समालोचकांनाही दिले पाहिजे. भारतीय चित्रपट संगीताचा होता तसाच हा समालोचनाचाही सुवर्णकाळ होता. बॉबी तल्यारखान, डिकी रत्नागर, अनंत सेटलवाड, सुरेश सरय्या असे काही समालोचक त्या सुवर्णकाळाचे मानकरी होते. कालांतराने या मंडळींमध्ये विजय र्मचटही दाखल झाले. प्रत्येकाची शैली निराळी होती. यांतील अनंत सेटलवाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने त्या देदीप्यमान परंपरेतील आणखी एक दुवा निखळला. हल्लीच्या कर्कश दूरचित्रवाणीच्या जमान्यात नेमक्या आणि मोजक्या शब्दांतील समालोचनाची कला जवळपास अस्तंगत झाली आहे. सेटलवाड यांना ती खासच अवगत होती. विख्यात इंग्रज समालोचक जॉन अरलॉट यांनी रेडिओ समालोचनात नवीन मानदंड निर्माण करताना काही युक्त्या सांगितल्या होत्या. समालोचकाने श्रवणचित्र उभे केले पाहिजे आणि श्रोत्यांना एका नवीन, अनाम विश्वाची सफर घडवली पाहिजे, असे ते सांगत. सेटलवाड यांच्यासाठी ते ब्रह्मवाक्य होते. त्यांच्या समालोचनात नाटय़मय असे काही नव्हते. समोर उलगडत जाणाऱ्या घटनांचे चित्र नेमक्या शब्दांमध्ये उभे करण्याची त्यांची खासियत होती. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व आणि शब्दांचा खजिना अफाट. नामवंत वकील कुटुंबात जन्म आणि पब्लिक स्कूलमधील शिक्षणाचा तो एकत्रित परिणाम. अशा शब्दवंतांना कोणत्याही परिस्थितीचे मौखिक वर्णन करतानाही फार सायास पडत नाहीत.

सेटलवाड यांचे समालोचन एखाद्या शैलीदार फलंदाजाच्या फलंदाजीसारखे होते. धावा झटपट होत नाहीत किंवा षटकार-चौकारांची बरसातही झडत नाही. पण अशा फलंदाजाचे खेळपट्टीवरील अस्तित्वच सुखावणारे, रमवणारे असते. गोलंदाज चेंडू कसा टाकतो किंवा विशिष्ट फलंदाजाची उभी राहण्याची पद्धत कशी आहे या बाबी, गोलंदाजाने चेंडू फेकण्यासाठी धाव घेतल्यापासून तो प्रत्यक्ष चेंडू टाकेपर्यंत सेटलवाडांनी सांगितलेल्या असायच्या.

त्यांचा आवाज आश्वासक होता. त्या काळात अनेकदा भारतीय संघाचे घरच्या वा दूरच्या मैदानांवर पतन होत असताना, सेटलवाड यांच्या आवाजामुळे क्रिकेट चाहत्यांचा उद्वेग काही प्रमाणात कमी व्हायचा. एकदा एका सामन्यात वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू वेळकाढूपणा करत राहिले आणि हातातला सामना अनिर्णित राहिला. त्या वेळी सेटलवाड यांच्या सबुरीच्या सल्ल्यामुळेच मैदानातील प्रेक्षक शांत राहिले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.