भारतीय वंशाच्या कुणाची नियुक्ती अमेरिकेत महत्त्वाच्या जागी होण्याचे प्रसंग जितके बराक ओबामा यांच्या कार्यकाळात आले, तितके नंतर आले नाहीत हे खरे. म्हणूनच न्यू यॉर्क शहराच्या महापौरांनी डॉ. डेव्ह ए. चोक्शी यांची केलेली नियुक्ती, हा अशा काळातला सुखद धक्का ठरतो. डॉ. चोक्शी हे आता, न्यू यॉर्क शहराचे प्रमुख वैद्यकीय आयुक्त (हेल्थ कमिशनर) झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाचा गेल्या सुमारे दीड दशकांचा अनुभव असलेले डॉ. चोक्शी अवघ्या ३९ वर्षांचे आहेत. करोना विषाणूचा दुसरा हल्ला न्यू यॉर्कवर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात असताना त्यांनी शहराच्या वैद्यकीय आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
डेव्ह यांचे वडील मुंबईहून अमेरिकेत आले, लुइझियाना प्रांतात राहू लागले. तेथेच डेव्ह यांचे शालेय शिक्षण झाले. नॉर्थ कॅरोलिना राज्यातील डय़ूक्स विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि लोकनीती विषयांत ‘बीए’, आरोग्य व्यवस्थापन शिकण्यासाठी ‘ऱ्होड्स शिष्यवृत्ती’ मिळवून ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात, तर त्यानंतर पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून रीतसर वैद्यकीय शिक्षण घेऊन ‘एमडी’ ही पदवी, असा त्यांचा शैक्षणिक प्रवास. त्यानंतर ते आधी स्वत:च्या मूळ राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काम करू लागले. विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य गरजांसाठी संगणक व मोबाइल अॅप देणारा नवउद्यम (स्टार्टअप) त्यांनी सुरू केला आणि तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुश यांचे नाकर्तेपण सिद्ध करणाऱ्या कतरिना वादळात डेव्ह यांनी महत्त्वाचे मदतकार्य केले. ओबामा यांच्या काळात ते व्हाइट हाउसमधील सहायक होते. ओबामांनी त्यांची नेमणूक आरोग्य जागृती व उपचार समितीचे सल्लागार म्हणून केली होती. माजी सैनिक कल्याण समितीचे आरोग्य सल्लागार, ही स्वतंत्र जबाबदारीदेखील त्यांच्यावर होती. पुढल्या काळात मात्र वॉशिंग्टनमध्ये न रमता ते न्यू यॉर्कला आले. तेथील ‘हेल्थ+हॉस्पिटल्स’ म्हणून ओळख असलेल्या सार्वजनिक आरोग्य संस्थेत जनआरोग्य विभागाचे प्रमुख झाले. मधल्या काळात ५० हून अधिक संशोधन-निबंध त्यांनी सार्वजनिक आरोग्याच्या विविध पैलूंवर लिहिले. शाकाहाराचा सुपरिणाम काही आजारांत होतो का, याविषयी ते प्रयोग करीत होते. वैद्यकीय आयुक्त झाल्यावरही, ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत राहतील.