समलैंगिकतेच्या मुद्दय़ावर आतापर्यंत अनेकदा चर्चा झाली आहे. प्रगत देशांत अशा संबंधांना वैध मान्यता आहे. आपल्याकडेही २००९ मध्ये समलैंगिकता हा गुन्हा नाही, असे सांगून राज्यघटनेचे कलम ३७७ दिल्ली उच्च न्यायालयाने अवैध ठरवले होते, पण नंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हय़ाच्या छायेतून बाहेर काढण्याचे काम संसदेनेच करावे असे सांगितले होते. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे समलैंगिकता हा कुठला मानसिक रोग नाही असे सर्वप्रथम सांगून या अल्पसंख्याक समुदायाला दिलासा देणारे अमेरिकेतील ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ डॉ. रॉबर्ट एल. स्पिटझर यांचे नुकतेच झालेले निधन.
१९६०च्या सुमारास या शास्त्रात निदानामध्ये विश्वासार्हता नव्हती. प्रत्येक डॉक्टरचे निदान वेगळे असायचे, पण त्याच वेळी कोलंबिया विद्यापीठात मानसशास्त्रातील एक चांगला डॉक्टर स्पिटझर यांच्या रूपाने घडत होता. मानसविकारतज्ज्ञ फ्रॉइडने मानसिक रोगांचे जे विश्लेषण केले होते त्याला छेद देणारे ते पहिलेच. मनोरुग्णांच्या माहितीचे मूल्यमापन-विश्लेषण करण्यात त्यांनी आयुष्य खर्ची घातले. त्या काळात समलैंगिकता हा मानसिक रोग मानला जात होता. डॉ. स्पिटझर यांनी मात्र मूल्यमापनात्मक चिकित्सा करून तो रोग नाही, असे सांगितले व आता समलैंगिकता हा शब्दच रोगांच्या यादीतून काढून टाकण्यात आलेला आहे. त्यांनी समलैंगिकतेविषयी जी टिपणे केली होती त्यावर आधारित डीएसएम ३ या मार्गदर्शिकेला त्या काळात प्रचंड मागणी होती. फ्रॉइडचे पाठीराखे असलेले विश्लेषक, संशोधक, पत्रकार यांच्याशी त्यांना संशोधनाच्या आधारे लढा द्यावा लागला. समलिंगी वर्तन बदलता येते अशी उपचार पद्धत शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला होता, पण त्या अभ्यासावर मात्र त्यांना २०१२ मध्ये सपशेल माफी मागावी लागली. मानसशास्त्रातील निदानाची विश्वासार्हता त्यांनी वाढवली. डय़ुक विद्यापीठात ते मानद प्राध्यापक होते. कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. नंतर न्यूयॉर्क विद्यापीठातून वैद्यक शाखेत एमडी झाले. कोलंबिया विद्यापीठाच्या सेंटर फॉर सायकोअॅनॅलॅटिक ट्रेनिंग अॅण्ड रीसर्च संस्थेतही त्यांनी शिक्षण घेतले. मानसशास्त्रीय रोगनिदानाची डीएसएम मार्गदर्शिका हे त्यांचे सर्वात मोठे काम. त्याच्या डीएसए ३, ४, ५ अशा आवृत्त्या प्रसिद्ध आहेत त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. त्यांनी मानसिक रोगांचे अचूक वर्गीकरण केले, त्यामुळे कुठल्याही डॉक्टरने लक्षणे बघितली तर त्यांच्या निदानात आता फरक होत नाही.
रॉबर्ट एल. स्पिटझर
समलैंगिकतेच्या मुद्दय़ावर आतापर्यंत अनेकदा चर्चा झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-01-2016 at 03:18 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about robert l