कथाकार ‘शांताराम’ अर्थात के. ज. पुरोहित गेले. गतशतकाच्या उत्तरार्धभर विपुल कथालेखन केलेल्या शांताराम यांची दखल त्यांच्या लेखनबहराच्या काळातही (रा. भा. पाटणकर, विलास खोले असे मोजके अपवाद वगळता) फारशी कुणी घेतली नाहीच; आणि  वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाल्यावर, एरवी साहित्यिकाच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर नोंदींचा खच पाडणाऱ्या पिढीनेही त्यांच्याकडे दुर्लक्षच केले.

तब्बल सहा दशकांहून अधिक काळ कथालेखन करूनही शांताराम यांचे ‘आऊटसायडर’ राहणे हेच त्याचे कारण! म्हणजे- गाडगीळ, भावे, गोखले, माडगूळकर या ‘नवकथा’कारांच्या बहरकाळात लेखन करूनही ते स्वत:ला ‘नवकथाकार’ म्हणवत नव्हते. नवकथा जोशात असतानाच ती आवर्तात सापडली असल्याचे रोखठोकपणे त्यांनी सांगितले. समकालीन कथाकारांच्या लेखनातील विफलतेचे तत्त्वज्ञान उचलून धरले जात असतानाही शांताराम मात्र त्या वाटेला गेले नाहीत. आदिवासी, शेतकरी जीवनाचे चित्रण त्यांच्या कथांमध्ये येते, तरीही त्यांची कथा ग्रामीण ठरली नाही. समाजातल्या खालच्या स्तराचे प्रतिबिंब त्यांच्या कथांमध्ये पडले. फडके-खांडेकरांना नाकारण्याच्या काळात त्यांच्या लघुनिबंधांचे मराठी गद्यावरील ऋण ते मान्य करत होते. रसाळ व्याख्याने आणि कथाकथनांच्या सुगीच्या काळात त्यांनी त्याविरुद्ध मत मांडले.

What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Ram Satpute Answer to Praniti Shinde
प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं उत्तर, “धर्म आणि जातींमध्ये फूट पाडून इतकी वर्षे…”

शांताराम यांनी अशा भूमिका कशा काय घेतल्या आणि तरीही २५०च्या आसपास कथा ते कसे लिहू शकले? याचे कारण नवे ज्ञान, त्यातून येणारी आधुनिकता आणि नवता यांच्यातील संबंध त्यांनी नेमकेपणाने जाणला होता. आधुनिकतेची अपरिहार्यता मान्य करूनही त्यातल्या एकारलेपणाला ते शरण गेले नाहीत. आत्यंतिक व्यक्तिवादापेक्षा माणसांना आणि त्यांच्यातील संबंधांना समजून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटले. विदर्भात जन्म आणि तिथेच शिक्षण घेतलेल्या केशव जगन्नाथ पुरोहितांवर वैदर्भीय ग्रामीण संस्कृतीचे संस्कार झाले. पुढे वाचनाने लेखनाकांक्षा निर्माण झाली आणि १९४१ साली ‘सह्य़ाद्री’ मासिकात ‘शांताराम’ या टोपणनावाने त्यांनी कवी अनिलांच्या ‘भग्नमूर्ती’ या खंडकाव्यावर टीकालेख लिहिला. त्याच वर्षी ‘भेदरेखा’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि वर्षभरात सोळा कथांचा ‘संत्र्यांचा बाग’ हा संग्रहही आला. परंतु १९५७च्या ‘शिरवा’पासून त्यांच्या कथेला खरी कलाटणी मिळाली. ‘जमिनीवरची माणसं’, ‘चंद्र माझा सखा’, ‘उद्विग्न सरोवर’, ‘चेटूक’ या संग्रहातल्या कथांतून ते ध्यानात येते. पुढे ‘संध्याराग’ (१९९०) ते अलीकडच्या ‘कृष्णपक्ष’ (२००५) पर्यंतच्या त्यांच्या कथांना आत्मनिष्ठेबरोबरच सामाजिक परिमाणही लाभले. तंत्रात न अडकता त्यांची कथा देशीपणाशी, लोकव्यवहाराशी नाते सांगत राहिली. शेक्सपीअर, इब्सेन, युरायपीडिसच्या नाटकांचा अनुवाद, तसेच ‘व्रात्यस्तोम’, ‘मी असता..’ असे आत्मपर लेखनही त्यांनी केले. तब्बल चार दशके विदर्भ, गोवा, मुंबई येथे त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यांच्या निधनाने गतशतकातील सर्वार्थाने ‘आऊटसायडर’ कथाकार साहित्यविश्वाने गमावला आहे.