‘‘काळाची पानं उलटता येतात, पण फाडून फेकून देता येत नाहीत’’ हे मराठी वाक्य, त्यातील ‘ळ’सकट अगदी नीटसपणे उच्चारून १९८१ सालच्या ३१ डिसेंबर रोजी, तत्कालीन ‘मुंबई दूरदर्शन’च्या मराठी प्रेक्षकांनाही लुकू सन्याल यांनी आपलेसे केले होते.. ‘गजरा’सारखा एक खास कार्यक्रमच त्या दिवशी लुकू यांच्या निवेदनातून सादर झाला होता आणि ‘‘मला मराठी बोलण्याची सवय नाही’’अशी दिलगिरी त्यांनी या निवेदनाच्या सुरुवातीलाच व्यक्त केली असली, तरी उच्चाराची एकही चूक त्यांनी केली नव्हती! त्यांचा इंग्रजीतला तो ‘हस्की’.. काहीसा घोगराच आवाज शुद्ध शब्दोच्चारणामुळे कोणत्याही भाषेत ऐकत राहावा असाच होता. हा एकमेव मराठी अपवाद वगळता, लुकू सन्याल या जुलै १९७४ ते १४ ऑगस्ट १९८२ पर्यंत ‘मुंबई दूरदर्शनवरील एक इंग्रजी वृत्तनिवेदिका’ याच नात्याने प्रेक्षकांना माहीत होत्या.

त्यांचे व्यक्तिमत्व मात्र, ‘दूरदर्शन’च्या त्या छोटय़ा पडद्यापेक्षा मोठे होते. बंगाली अभिनेते पहाडी सन्याल यांच्या त्या कन्या. घरात नाटकसिनेमाचे वातावरण असल्याने, अगदी वयाच्या १३ व्या वर्षीपासूनच कोलकाता आकाशवाणीवरील नभोनाटय़ांमध्ये त्या आवाज देऊ लागल्या. इंग्रजी विषय घेऊन बीए आणि एमए या पदव्या मिळवत असताना साक्षात् सत्यजित राय यांनी एका चित्रपटात (देबी) काम करशील का अशी विचारणा केली असूनही, ‘मी शिक्षणालाच महत्त्व देणार’ अशा शब्दांत लुकू यांनी नकार दिला होता.

युरोपमध्ये काही काळ घालवून लुकू  सन्याल मुंबईत आल्या. इथल्या केसी, नॅशनल, एमएमके या महाविद्यालयांत त्यांनी इंग्रजीच्या अध्यापक म्हणून काम केले. एमएमके महाविद्यालयातून, इंग्रजी विभाग प्रमुख या पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या आणि त्यांचे अनेक विद्यार्थी आज अध्यापनक्षेत्रातही आहेत. यापैकी पहिल्या नोकरीसाठी  ‘केसी’मध्ये, मुंबईतील ‘आकाशवाणी भवना’च्या नजीकच जावे लागत असल्याने त्यांनी तिथेही प्रयत्न केला. ऑडिशन देऊन त्या तिथेही नैमित्तिक वृत्तनिवेदिका म्हणून काम करीत. याच काळात एका जाहिरात संस्थेने, जाहिरातवजा माहितीपटासाठी आवाज देण्याची (व्हॉइसओव्हर) विचारणा केल्यावर त्यांनी ते काम सुरू केले व पुढे ‘फिल्म्स डिव्हिजन’साठी हिंदी-इंग्रजीत निवेदन लिहिण्यापर्यंत मजल मारली. हा अनुभव दूरदर्शनवर कामी आला. इंग्रजी बातम्या देणाऱ्या अगदी पहिल्या निवेदकांत त्या (गर्सन डिकून्हा, निर्मला माथन यांच्यासह) होत्या. इंदिरा गांधी यांना अटक, सचिनदेव बर्मन वा बेगम अख्म्तर यांचे निधन अशा बातम्या आपण दिल्याचे त्यांनी ‘नेटवर्क ऑफ विमेन इन मीडिया इन इंडिया’ या संस्थेच्या संकेतस्थळास मुलाखतीत नमूद केले होते. (त्यांचे छायाचित्रही त्याच स्थळावरील आहे). संसारात तणाव असल्याने मुलीसह त्या एकटय़ाच राहात होत्या. १४ ऑगस्ट १९८२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या इंग्रजी बातम्या बंद झाल्या, त्या दिवशी अखेरच्या वृत्तनिवेदिका लुकू सन्यालच होत्या.