scorecardresearch

सतीश मराठे

कृषी मंत्रालयाने त्यांची नियुक्ती राष्ट्रीय विकास महामंडळाचे संचालक म्हणून केली आहे.

सतीश मराठे

राज्यातील सहकार आणि बँकिंग क्षेत्रात गेली अनेक वर्षे निरलसपणे काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश मराठे यांना आता केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. कृषी मंत्रालयाने त्यांची नियुक्ती राष्ट्रीय विकास महामंडळाचे संचालक म्हणून केली आहे.

१ फेब्रुवारी १९५० रोजी मुंबईत जन्मलेल्या मराठे यांनी वाणिज्य आणि विधि शाखांची पदवी मिळवली. मुंबईच्या पोदार महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात भाग घेणे सुरू केले. सहकारी बँकिंग क्षेत्रातील गाढे अभ्यासक असलेले मराठे हे संघ परिवाराच्या मुशीतून घडले आहेत. आपल्या बँकिंग क्षेत्राची सुरुवात त्यांनी बँक ऑफ इंडियामधून केली. तेथून ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेत आले. या बँकेच्या विस्तारात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याने ते महाव्यवस्थापक बनले. डों.ना.स. बँकेत उल्लेखनीय काम केल्याने जनकल्याण सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना पाचारण करण्यात आले. या बँकेत त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे बँकेने नेत्रदीपक कामगिरी बजावली. नंतर सातारच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष म्हणून मराठे यांची नियुक्ती करण्यात आली. मराठी माणसांची बँक अशी ओळखअसलेल्या या बँकेने त्यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षे चमकदार कामगिरी केली.  नंतर राजकीय दबावामुळे बँकेची कर्जवसुली थंडावली. थकीत कर्जे (एनपीए) वाढत गेल्याने अखेर आयडीबीआयमध्ये या बँकेचे विलीनीकरण करावे लागले.

१९७९ मध्ये स्थापन झालेल्या  ‘सहकार भारती’मध्ये ते सुरुवातीपासून कार्यरत आहेत. केवळ राज्यात नव्हे तर देशभरात सहकारी संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. हाती घेतलेल्या योजनेत झोकून देऊन काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सहकार भारती ही सहकार क्षेत्रातील आज देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून अनेक जण स्वत:च्या पायावर उभे राहिले. आजही ते या संस्थेचे विश्वस्त आहेत. बँकिंग क्षेत्रातील विविध संघटनांमध्येही विविध पदे भूषवताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. नागरी सहकारी बँकांना घरघर लागली असतानाच्या काळात या बँकांची स्थिती सुधारण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती नेमली होती. मराठे यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव ध्यानात घेऊन सरकारने त्यांची या समितीवर नियुक्ती केली. या समितीने केलेल्या शिफारशींमुळे अनेक नागरी सहकारी बँका सुस्थितीत आल्या. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री हे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांसोबत बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेत असतात. सहकार क्षेत्रासाठीच्या अशा अनेक बैठकांना त्यांना आवर्जून बोलावले जात असे. बॅकिंग तसेच अनेक संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मराठे यांची आता महत्त्वाच्या मंडळावर नियुक्ती करून केंद्र सरकारने त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरवच केला आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध ( Vyakhtivedh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.