|| डॉ. रोहिणी पटवर्धन

वृद्धांचा अपमान, छळ होतो त्याची कारणे, लक्षणे आणि परिणाम आपण पाहिले; पण मुळात आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की वृद्धांना होणारा त्रास, ही काही एका दिवसात घडणारी घटना नाही. त्याची सुरुवात कितीतरी आधी झालेली असते, असू शकते. त्याची बीजे कधी कधी ज्येष्ठांच्या मनात असणाऱ्या भावना किंवा अनुभवलेले प्रसंग या स्वरूपात असू शकतात. उदा. सासुरवास सहन केलेल्या सासूला नवीन सुनेचे केलेले कौतुक किंवा तिला दिली जात असलेली मोकळीक मनात असूया निर्माण करू शकते आणि नकळत सुनेशी वाईट वागणे सुरू होते. त्याचा सगळ्यांना त्रास होतो आणि कुठेतरी सासूबद्दलची आदराची भावना नष्ट होऊ शकते.

एखाद्या वडिलांची स्वत: इंजिनीअर, डॉक्टर व्हायची इच्छा असते ती मुलाने पूर्ण करावीच, असा आग्रह असतो. मुलाने नकार दिला तर त्याला वाईट वागवले जाते. शिक्षणात अडथळे आणले जातात. डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर, वकिलाच्या मुलाने वकील, उद्योगपतीच्या मुलाने धंद्यात लक्ष घालावे, अशा आग्रहापोटी मुळातच एकमेकांबद्दल अढी निर्माण होऊ शकते. दुसरे म्हणजे मुलांना आपण कसे वाढवतो, काय संस्कार करतो, आपल्या वडीलधाऱ्या माणसांशी कसे वागतो ते मुले पाहात असतात आणि त्याप्रमाणे ते ज्येष्ठांना वागवतात.

ही अगदी नमुन्यापुरती कारणे झाली. व्यक्ती, परिस्थितीनुसार ती वेगळी असतात. याशिवाय महत्त्वाची गोष्ट अशी की मुलांची किती प्रमाणात जबाबदारी घ्यायची किंवा घ्यायची नाही याबद्दल कोणतीच स्पष्टता नसते. शिक्षण किती काळपर्यंत आपण करू शकतो, उद्योगधंद्याला कितीपर्यंत मदत करू शकतो, शिक्षण, घर, नोकरी, लग्न, त्यांच्या मुलांची जबाबदारी याबाबत विचार केला गेला पाहिजे. आणि त्याबाबत मुलांशी मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे म्हणजे गरसमज निर्माण होत नाहीत. त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव कमी होऊ शकतात. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे प्रचंड वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचे सतत भान ठेवणे आवश्यक पाहिजे. जुन्या कल्पना उदा. कर्ज काढू नये वगरे विचार आता कालबा होत चालले आहेत हे लक्षात घेऊन मुलांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मन तयार केले पाहिजे. वस्तू वाया घालवणे, नीटनेटक्या ठेवणे अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींबद्दल सतत सूचना देणाऱ्या आई-वडिलांबद्दल मुलांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. अशी सारखी कटकट करणाऱ्या आई-वडिलांबद्दल असणारी प्रेमाची जागा फक्त कोरडय़ा कर्तव्यात बदलते आणि छोटय़ा-मोठय़ा अपमानापासून सुरुवात होऊन पुढे प्रमाण वाढू शकते. याच्या उलट सारखे मुलांच्या पुढे नमते घेत राहिले तर मुले विचारेनाशी होतात. यासाठी तोल साधता आला पाहिजे.

हा तोल साधणं ही तारेवरची कसरत आहे खरी; पण ती करायलाच हवी. त्यासाठी गरज आहे ती आपले विचार, आपले समाजाशी असणारे संबंध वाढविण्याची. त्यासाठी प्रथम भूतकाळाची साथ सोडली पाहिजे. ती वेळ आणि आजची वेळ तुलना सोडून दिली पाहिजे. कारण भूतकाळ पुन्हा जगता येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भविष्यकाळाची चिंता करत बसून चुकीचे वागू नका. आज एखादी गोष्ट मुलांची पटली नाही तर, आपण त्याला सांगितले, बोललो तर तो पुढे आपली काळजी घेणार नाही या भीतीने न पटलेली गोष्ट सहन करू नका. एकदा का तुमच्या मनात तो ताण निर्माण झाले की तुमच्या विचारामध्ये मन संकुचित बनते आणि तुम्ही नीट विचार करू शकत नाही. त्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचा मोकळ्या मनाने विचार करा, त्याला योग्य तो मार्ग सापडेल हा हे सर्व सविस्तर लिहिण्यामागचा उद्देश.

वृद्धांचा छळ होण्यामागची कारणे निर्माण होण्याची वेळ वेगळीच असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्व काळजी घेऊनसुद्धा आपण अगदी योग्य विचाराने योग्य वागूनसुद्धा छळ होणारच नाही, असे खात्रीने सांगता येत नाही हे फार गंभीर सत्य आहे. म्हणूनच मग विचार करावा लागतो तो असा त्रास छळ अथवा अपमान झालाच तर काय करता येईल.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळी ज्या प्रसंगी तुम्हाला जाणवेल की हे आपल्याला (कोणत्याही प्रकारच्या अपमानामध्ये) त्रासदायक होते आहे त्याच वेळी त्या व्यक्तीला जाणीव करून द्या की मी हे चालवून घेणार नाही. प्रथम त्याच व्यक्तीशी मोकळेपणाने बोलण्याचा मार्ग स्वीकारा. तुम्हाला ते त्रासदायक वाटते आहे ते त्यांना कळू दे. नेहमी मुद्दाम तसे केले जाते असे नाही. सध्याच्या ताणाच्या धावपळीच्या आयुष्यात त्यांच्याकडून नकळतपणे अशी वागणूक होऊ शकते. त्यांचीही एक बाजू आहे हे गृहीत धरून नीट शांतपणे सोयीची वेळ पाहून त्यांच्याशी बोला. स्वत:च कल्पना करून घेऊन कुढत बसू नका.

एवढे करून पण वारंवार अशा घटना घडत असतील तर जवळचा खात्रीचा नातेवाईक, मित्र, वकील, डॉक्टर कोणाशीतरी बोला आणि तुम्हाला वाटणारी भावना खरंच खरी आहे ना ते तपासून पाहा. या गोष्टी इतरांपर्यंत नको जायला या विचाराने न बोलल्यास त्रासाची तीव्रता निश्चितच वाढेल. अती झाल्यावर तरी बोलावेच लागेल त्यापेक्षा योग्य वेळी वाच्यता करा. नाहीतर शरीराने, मनाने पिचून गेल्यानंतर बोलल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी लागणारी मनाची शक्ती नाहीशी होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या टप्प्यावर भावना, लोक काय म्हणतील या विचारांपेक्षा स्वत:च्या शारीरिक, मानसिक आणि आíथक सुरक्षिततेचा विचार करा. गरजेनुसार कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञांची मदत घ्या. कारण कधी कधी तुम्हाला वाटले तरी कायदा वेगळा असू शकतो. अशा वेळी कायद्याची मदत होत नाही. अनीताताईंना मुलाने घराबाहेर काढले. त्यांची समजूत घर माझ्या नवऱ्याने बांधले म्हणजे त्यांच्यानंतर मीच मालकीण, पण प्रत्यक्षात नवऱ्यानेच घर मुलाच्या नावावर केले होते (चूक त्यांची नाही पण येथे कायदा साथ देणार नाही.)

वृद्ध अवहेलना होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले तरी कायद्यामध्ये तशी ठोस तरतूद नाही. मालमत्ता विकण्यास भाग पाडणे, चोरी करणे यासाठी गुन्हेगारी कायद्यामध्ये तरतूद आहे. १९५६च्या हिंदू कायद्यामध्ये आणि १९७३च्या फौजदारी कायद्यामध्ये वृद्धांची काळजी घेतली जावी असा उल्लेख आहे. पण याला न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागते. वेळ पसा आणि शक्ती या तीनही गोष्टी त्यासाठी आवश्यक असतात आणि या तीनही गोष्टी ज्येष्ठांकडे नसतातच. पर्यायाने कायद्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग होत नाही. शहरांमध्ये पोलिसांची हेल्पलाइन असते. त्रास होत असेल तर त्या नंबरवर ज्येष्ठ तक्रार करू शकतात. पण पोलिसांबाबतही म्हणावी तशी खात्री वाटत नाही. कारण पोलिसाला त्या व्यक्तीपर्यंत पोचू दिले जात नाही आणि पोलीस मध्यस्ती करू शकतात पण केस करू शकत नाहीत. त्याला तक्रारदाराने लेखी तक्रार करणे आवश्यक असते.

२००७ मध्ये पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण हा कायदा महाराष्ट्रात संमत झाला आहे. त्यानुसार मुले सांभाळ करत नसतील तर त्या विरुद्ध तक्रार करण्याची तरतूद आहे. पण त्यासाठी त्या त्या जिल्ह्य़ात डेप्युटी कलेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे जावे लागते आणि आधीच मंत्र्यांच्या दौऱ्यापासून ते पूर, निवडणुका यासारख्या कामाखाली दबलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत पदरमोड करून दूरच्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी जाण्याचे कोणतेच ‘बळ’ ज्येष्ठाकडे नसते. हे सत्य आहे. एकूण ज्येष्ठांचा कोणीच वाली नाही असे अत्यंत खेदाने म्हणावे लागते.

तात्पर्य असे की कायद्यापेक्षा मुळात आंधळेपणाने कोणताही निर्णय न घेणे. कायद्याचा पूर्ण अभ्यास करणे, घराण्याच्या अब्रूचा प्रश्न न करता, सुरुवात होते असे वाटताच त्याला वाचा फोडणे किंवा सावध होणे, घरात पिचत राहण्यापेक्षा थोडे धाडस करून आपले सर्व आíथक व्यवहार नीट ठेवून एखाद्या स्वतंत्र वृद्धाश्रमामध्ये राहण्याचा निर्णय घेणे. वकिलाच्या सल्ल्यानुसार काही वेळा नोटीस बजावणे यासारख्या मार्गाचा अवलंब केल्यास या अत्यंत संवेदनाशील अशा प्रश्नावर उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

माझ्या ‘संघटना साखळी’ या लेखात लिहिल्याप्रमाणे स्थानिक पातळीवरचे गट याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. कारण या गटातल्या लोकांचे एकमेकांकडे येणे-जाणे असल्याने त्या गटातील सदस्यांचा दबावगट बनू शकतो.

एकूणच ‘संहिता साठोत्तरी’चे लेख लिहिताना सुरुवातीपासूनच मी खूप तळमळीने ज्येष्ठांनीच ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे हे वेळोवेळी आग्रहपूर्वक प्रतिपादन करत आले आहे. पण अजून ते पुरेसे पोचले असे वाटत नाही. कारण ‘संघटना साखळी’ लेखाला सर्वात कमी लोकांनी ई-मेलद्वारे प्रतिसाद दिला. हरकत नाही. यापुढे द्यावा. असो, कधी ना कधी हे पटेल, नव्हे पटवून घ्यावेच लागेल याची खात्री आहे.

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com