News Flash

मुंबईतले दिवस

जीवनात विनोद शोधावा लागतो तसाच मी विरंगुळा शोधला.

जीवनात विनोद शोधावा लागतो तसाच मी विरंगुळा शोधला. मुंबईत मंत्रालयाला लागूनच ओव्हल मैदान आहे. त्यावर दररोज एक-दोन तरी क्रिकेट सामने होत असत. आणि विधानसभेचे अधिवेशन असले की मोर्चा! आम्हा नागपूरकरांसाठी मोर्चा हा नवीन प्रकार होता. मोर्चा शिस्तबद्ध असल्याने लाठीमार वगैरेचा कधी प्रश्न येत नसे. काही वेळा तेव्हा मंत्रालयात नवीन असलेल्या लिफ्टने सहाव्या मजल्यावर जाऊन मी चक्कर मारत असे. या इमारतीत सर्व मंत्र्यांची कार्यालये असल्यामुळे स्वच्छता होती.

थोडक्यात, हळूहळू मुंबई आणि मुंबईकरांचा मला परिचय होऊ लागला होता. पण तरी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी विदर्भ, मराठवाडा, गुजरातमधील कर्मचारी समरस होऊ शकले नव्हते. इथे कर्मचाऱ्यांचा उल्लेख झालाच आहे तर थोडीशी माहिती द्यावीशी वाटते. गुजरातमधून फक्त गरजेपुरताच कर्मचारीवर्ग मुंबईत आला होता. त्यांचा राज्यकारभार पूर्वीसारखाच त्यांच्याच राजधानीतून सुरू होता. अन्यथा द्विभाषिकाचा कारभार प्रथमदर्शनीच कोसळला असता. त्यावेळी लोकलची ८-७, ९-३, ६-२ वगैरे प्रचलित भाषा आम्हाला समजणे शक्य नव्हते. कमी गर्दीची लोकल आली तरच तीत चढण्याचे धाडस आम्ही करीत असू. त्यामुळे मुंबईत पहिले काही महिने तरी वेळेत कार्यालयात पोहोचणे आम्हाला अवघड होते. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीऐवजी ‘मुलाचे पाय लोकलमध्ये दिसतात’ असे असेल तरच आम्हा बाहेरच्यांना लोकलप्रवास शक्य होत असे.

सायंकाळी बरोबर साडेपाचला कार्यालय बंद व्हायचे. मी कधी कधी साहाय्यक संचालकांबरोबर कार्यालयातून निघत असे. हे गृहस्थ मनमिळावू, विनोदी स्वभावाचे होते. साडेपाचची लोकलची गर्दी टाळण्याकरिता आम्ही दोघे विन्डो शॉपिंग करत व्ही. टी.ला (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) पोहोचत असू. त्यामुळे हे अंतर कापायला आम्हाला २० मिनिटांऐवजी ४० मिनिटे लागत. परवडत नाही म्हणून मी राहत असे तिथली खाणावळ बंद झाल्यामुळे फोर्टमधील खाणावळ मी सुरू केली होती. पण सतावणारा प्रश्न होता तो आर्थिक बाबीचा! मुंबईला आल्यावर वेतननिश्चिती न झाल्यामुळे नागपूरच्या पगारातच आम्ही मुंबईत दिवस काढत होतो. दोन महिन्यांचा पगार आगाऊ घेतल्यामुळे हातात फक्त १०८ रुपये पडत होते. त्यात ५० रुपये घरी, ३० रुपये खाणावळ आणि ५ रुपये रेल्वे पास असा खर्च होत असे. परिणामी दोन जेवणांच्या मधे कँटीनमध्ये जाऊन काही खाणे मला शक्य नव्हते. नागपूरला असताना मी जेवण करून कार्यालयात जात असे आणि कार्यालय सुटल्यावर थेट घरीच येत असे. त्यामुळे हॉटेलात जाण्याचा प्रश्न नव्हता. मुंबईत मात्र जवळपास वर्षभर अशी आर्थिक तंगी होती. याचा चांगला परिणाम एकच झाला, की पुढेही कधी मला कँटीनमध्ये जावेसे वाटले नाही! विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण ५२ वर्षांच्या सरकारी नोकरीत मी एक पैसाही (कुणी पाहुणा भेटायला आला तर अपवाद!) कँटीनमध्ये खर्च केलेला नाही. पुढे दिल्लीत गेल्यावर कार्यालयातून निघायला खूप रात्र व्हायची आणि सकाळी कार्यालयात लवकर जावे लागे म्हणून मी थर्मासमध्ये अडीच कप कॉफी सोबत घेऊन जात असे. राहण्याच्या खोल्या.. (नागपूरकरांना त्यांना ‘घर’ म्हणणे योग्य वाटत नसे!) मधे जिना आणि त्याच्या दोन्ही बाजूला सहा-सहा खोल्या होत्या. सगळेजण एकटेच होते. त्यामुळे जेवण झाल्यावर समोरील व्हरांडय़ात बसून सगळे गप्पा मारीत.

पाच-सहा महिन्यांनी सर्व गोष्टी स्थिरस्थावर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता आणि वेतननिश्चिती याकडे लक्ष देणे सरकारला भाग होते. सत्ता मुंबईकरांच्या हाती असल्यामुळे आपले नुकसान होणार नाही अशाच योजना करण्याचा त्यांचा बेत होता. एकदा तर असेही कानावर आले, की ज्येष्ठताक्रम ठरवताना मुंबईकरांचे एक वर्ष बरोबर गुजरातच्या कर्मचाऱ्यांची दोन वर्षे, विदर्भवासीयांची तीन, तर मराठवाडय़ातील कर्मचाऱ्यांची चार वर्षे गृहीत धरून ही ज्येष्ठतायादी तयार करण्यात येणार आहे! शेवटी कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन योग्य रीतीने ज्येष्ठता धरण्यात आली. वेतननिश्चिती हाही एक विनोदच होता. आदेशाचे प्रारूप आले की दोघे-तिघे शेजारी मिळणाऱ्या थकबाकीचा खडूने व्हरांडय़ात जमिनीवर हिशोब करीत. पहिल्या खोलीपासून सुरू होणारा हा हिशोब चौथ्या खोलीपर्यंत येत असे. पहिले तीन-चार महिने नागपूर सोडावे लागल्याची खंत बाजूला ठेवून मुंबईत जीव रमवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू होता. नंतर मात्रबहुतेकांची कुटुंबे मुंबईत येऊन ते आपापल्या संसारात रममाण झाले. माझ्या खोलीत मात्र एक गादी, एक सतरंजी, दोन उशा आणि एक ट्रंक होती- ती बरीच वर्षे.

विवाह होईपर्यंत आपल्याला असे मौजमस्तीत जीवन जगायचे आहे, हे मनाशी पक्के करून एक-एक दिवस व्यतीत करत होतो. नागपूर सोडण्यापूर्वी मी सकाळच्या कॉलेजात बी. ए.ची पदवी मिळवण्यासाठी अ‍ॅडमिशन घेतली होती. १९५७ च्या फेब्रुवारीत- म्हणजे ऐन तिसऱ्या वर्षांच्या परीक्षेच्या वेळीच मला नागपूर सोडावे लागले. आपले तीन वर्षांचे शिक्षणाचे श्रम वाया जाणार आणि आपण केवळ मॅट्रिकच राहणार याच्या यातना असह्य़ होत होत्या. एकदा प्राध्यापकांना भेटून यातून काहीतरी मार्ग निघू शकेल का, हे पाहण्याचं ठरवलं. राज्यशास्त्राचे प्राध्यापक रानडे आम्हाला शिकवायला होते. ते मला आणि मोठय़ा भावाला चांगले ओळखत होते. नोकरी करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत प्राध्यापकांच्या मनात आपुलकी असे. त्यांनी माझी अडचण समजून घेतली. म्हणाले, ‘‘तू निश्चिंतपणे मुंबईला जा. या वर्षीचे मी पाहून घेईन. पुढील वर्षी कॉलेज सुरू झाल्यापासून १५-२० दिवस आणि दिवाळीच्या अगोदर १४-१५ दिवस येऊन हजेरी लाव.’’ त्यामुळे बी. ए.चा तिढा तरी सुटला. पण त्याकाळी पीटी आवश्यक होती. त्याचे प्राध्यापक जवळच राहत होते. त्यांनीही सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे मुंबईत गेल्यानंतर थोडाफार स्थिरस्थावर झाल्यावर बी. ए.चा अभ्यास सकाळी लवकर उठून करणे क्रमप्राप्त झाले.

माझ्या ५२ वर्षांच्या या जीवनप्रवासात वारंवार एकच गोष्ट येण्याची शक्यता आहे, ती म्हणजे दैव आणि दैव! बी. ए.चे शेवटचे वर्ष. कुणाचे मार्गदर्शन नाही. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसातपर्यंत नोकरीनिमित्त घराबाहेर. शिवाय खाणावळीतील जेवणापायी विनाकारण अर्धा-पाऊण तास वाया जात होता. अशा वेळी मला दैवाने साथ दिली. माझ्या शेजारीच नाफडे नावाचे कुटुंब राहत होते. नाफडे दाम्पत्य अतिशय सज्जन. मेहेरबाबांचे निस्सीम भक्त. त्यांना एक मुलगी, तीन मुले. रविवारी सायंकाळी खाणावळ बंद असल्यामुळे मला ते जेवायला बोलावत. एकदा सौ. नाफडे म्हणाल्या, ‘‘तुम्ही रोज खाणावळीत जेवायला जायची आवश्यकता नाही. उद्यापासून इथेच जेवा.’’ नाफडे आणि मुलांनीही आग्रह केला. त्यांना नाही म्हणणे शक्यच नव्हते. पण त्यामुळे माझा सकाळचा पाऊण तास आणि संध्याकाळचा पाऊण तास वाचला. जेवण झाल्यानंतर मी दोन तास अभ्यास करू शकत होतो. एवढेच नाही तर सकाळी चार वाजता उठवल्यावर मला पुन्हा झोप लागू नये याकरता श्री. नाफडे माझ्या खोलीत झोपू लागले. त्यांच्यासमवेत अनेकदा मेहेरबाबांच्या जवळून दर्शनाचा योग आला. परंतु खेदाची गोष्ट ही, की मी बी. ए.ची परीक्षा देऊन परत आलो त्याआधीच मध्य प्रदेशात बदली करण्यासंबंधीची नाफडे यांची विनंती मान्य होऊन ते भोपाळला गेले होते. बी. ए. उत्तीर्ण झाल्याच्या माझ्या आनंदावर विरजण पडले.

बी. ए.ची परीक्षा पास झाल्यावर कार्यालयीन वेळेनंतर करायचे काय, असा प्रश्न मला पडला. त्यावेळी त्रिपाठी यांनी हिंदी साहित्य संमेलन, वाराणसी यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या ‘साहित्य विशारद’ या परीक्षेस बसण्यास मला सुचविले. तत्पूर्वी मी महाराष्ट्र हिंदी प्रचार समितीची ‘कोविद’ ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केली होती. ही पदवी एम. ए.च्या स्तराची होती. पुस्तके घेणे परवडणारे नसल्यामुळे संस्थेच्या ग्रंथालयातून किंवा तिथेच बसून अभ्यास सुरू केला. सहा महिन्यांच्या अविश्रांत प्रयत्नांनंतर ही पदवीसुद्धा मी मिळवली. दोन वर्षांत बी. ए. आणि साहित्य विशारद झालो.

मुंबईतल्या प्रारंभीच्या काळात असे अनेक अनुभव घेतले. सुख-दु:खांना सामोरा गेलो. दोन्ही गोष्टी स्थितप्रज्ञतेने स्वीकारल्या. ही समस्त पाश्र्वभूमी इथे सांगण्याचे कारण म्हणजे पुढील अध्यायापासून माझे जीवन अनपेक्षितपणे वळण घेत आश्चर्यचकित करणाऱ्या एका दालनातील प्रवेशाने सुरू होणार आहे. मी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे कसा गेलो, याचे उत्तर खरं तर मलाही आजवर मिळालेले नाही. अनेकांनी मला हा प्रश्न वारंवार विचारला आहे. त्यांना या कथनातून उत्तर मिळते का, हे त्यांनी पाहावे. परंतु हे आख्यान सांगण्यामागे महत्त्वाचा उद्देश हा आहे, की गेल्या १५-२० वर्षांपासून तरुण मुले काही ना काही कारणांनी नैराश्याकडे ओढली जात आहेत, तसेच त्यातले काहीजण तर आत्महत्येपर्यंत गेल्याचे ऐकायला-वाचायला मिळते. अशांना मला सांगायचे आहे की, ईश्वराने मनुष्याला अनेक अवयव दिले आहेत, मार्ग दिले आहेत. मेंदू काम करत नसेल, पण हात-पाय तर करतात! मीसुद्धा फर्स्ट क्लास, डॉक्टर-इंजिनीअर बनण्याची स्वप्ने पाहणारा होतो. पण मला सतत होणाऱ्या टायफॉईडने मरणासन्न अवस्थेपर्यंत नेले होते. या आजाराने मेंदू सुस्तावला, मंद झाला. परंतु इतर अवयवांच्या भरवशावर केवळ तीन-साडेतीन वर्षांत मी कुणाचाही विश्वास बसणार नाही इतकी प्रगती केली. दिल्लीत असताना कथ्थक नृत्यांगना सोनल मानसिंग यांची माझी भेट झाली. अपघातात त्यांचा एक पाय निकामी झाला होता. पण कठीण परिश्रम करून त्या पुन्हा स्टेजवर आल्या. शेवटी विधिलिखित कधी चुकत नाही. ते बदलण्याचे सामथ्र्य कोणत्याही शक्तीत वा मंत्रात नाही.

राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:53 am

Web Title: ram khandekar share the unforgettable experience in loksatta part 4
Next Stories
1 नागपूरचा वियोग
2 भाषिकतेचे लोढणे
3 पायाभरणी..
Just Now!
X