News Flash

पतंगविज्ञान!

पिढी बदललीय. बोटे संगणकाच्या, मोबाइलच्या कळांवर जितक्या वेगात फिरतात, डोळे व्हिडीओ गेम्सच्या अवघड वेगवान वाटा टिपण्यात निष्णात झाली आणि तंत्रप्रेमाचे

| January 11, 2014 03:43 am

पिढी बदललीय. बोटे संगणकाच्या, मोबाइलच्या कळांवर जितक्या वेगात फिरतात, डोळे व्हिडीओ गेम्सच्या अवघड वेगवान वाटा टिपण्यात निष्णात झाली आणि तंत्रप्रेमाचे बाळकडू लहानग्या हातांचीही सहजसाध्य गोष्ट बनली. एक सोपी आणि सुंदर गोष्ट मात्र या हातांना अन् या डोळ्यांपासून हळूहळू पारखी होऊ लागली आहे. आकाशात बागडायला आणि त्यानिमित्ताने महोत्सवांची राजकीय रास सुरू करायलाच तेवढे संक्रांतीचे पतंगनिमित्त बनले आहे. व्हिडीओ गेम्स, मोबाइलमधील खेळ, सोसायटय़ांची उंची, केबल्सच्या तारा यांच्या धबडग्यात पारंपरिक पतंगबाजीच हरपून गेली आहे. निवडक शहरे, निवडक मोहल्ले पतंगबाजांचे शेवटचे शिलेदार जपून आहेत. मुंबई, पुण्यासारख्या राज्यातील काही शहरांतील काही बालेकिल्ले संक्रांतीपुरते सोडले तर आकाशपतंगांच्या रंगांना आणि छंदांना मुकण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सर्वागाला व्यायाम देणारा, मन एकाग्र करण्याची शक्ती असणारा आणि डोळ्यांची सुयोग्य कसरत घडवणारा हा खेळही दुर्दैवाने संगणकावरच खेळण्यासाठी राहू नये.. आज पतंग उडविता न येणाऱ्या नव्या पिढीला पुढे कधीतरी ‘फॅड’ निघाल्यावर पतंग उडवायला शिकण्यासाठी परदेशी ‘काइट फ्लाइंग क्लब’ची वाट धरावी लागू नये म्हणून पतंगविज्ञानाची ही थोडी नवी ओळख.
आजच्या व्हिडीओ गेमिंग व मोबाइलवरील खेळांच्या काळात पतंगबाजी मागे पडलीय. पूर्वी सगळी कुटुंबे घराच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवीत व दुसऱ्याची पतंग काटल्यावरचा आनंद जल्लोषात साजरा होत असे. तेव्हा लहान मुलांचा डोळ्यांचा व्यायाम पतंगबाजी पाहण्यात आपोआप होत असे. गणित माहिती नसण्याच्या काळात पतंगीच्या कणीचे माप योग्य होई. पतंगीच्या पाठीमागे धावण्यात आवश्यक ती कसरत होईच वर पतंगांचा तोल सावरण्याच्या शिक्षणातूनच जगण्यातील अडथळ्यांतून सावरण्याचे धडे मिळत. तेव्हा धारदार मांजापासून पक्ष्यांनाही मार लागल्याचे क्वचित घडे आणि पतंगबाजाचा काटाकाटीच्या ‘स्कोअर’वर मोहल्ल्याची नजर खिळे. पतंगबाजांची आणि पतंग उडविणाऱ्यांची खाशी भाषा होती. ढील, घशीट, हापसा, कौआ, छडी पतंगांच्या रंगांवरूंन त्यांना ओळखण्याची नावे होती. आज ती एका पिढीची पतंगभाषाच अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. नाही म्हणायला आता गुजरातमध्ये  ‘उत्तरायण’ या नावाने पतंग महोत्सव साजरा होतो. मुंबईतही गुजरात पर्यटन महामंडळाने लागोपाठ तिसऱ्या वर्षी पतंग महोत्सवाचे आयोजन केले. एकीकडे आपण अनेक पारंपरिक खेळांचे महत्त्व हरवून बसलो आहोत. पतंगही त्यातला एक आहे. मात्र असे महोत्सव  कृत्रिम वाटत असले तरी ते या खेळांना टिकवून धरण्यासाठी काहीअंशी मदत करू शकतात.
पतंग उडतो कसा, हा प्रश्न अनेकांना पडत असतो, पतंग उडतो म्हणजे तो गुरुत्वाला भेदून वर जाण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एखादी वस्तू हवेत असते तेव्हा ती गुरुत्वाकर्षणाने खाली पडणार हा निसर्गनियम आहे. चेंडू हवेत फेकला तर खाली पडतो, हे त्याचेच उदाहरण. मग पतंगच कसा काय उडतो, तर त्याचे उत्तर सरळ आहे की, तो हवेमुळे वर जातो. जेव्हा हवा एखाद्या वस्तूला खालून वर ढकलते तेव्हाच ती वर जाते व तिथे टिकून राहू शकते. आपण प्लास्टिकची पिशवी फुगवली तर ती चटकन हवेत वर जाते, कारण खालून हवेचा दाब असतो. जर तुम्ही पंख्यासमोर रिबन धरलीत तर ती वर उडते. एखादी वस्तू हवेत उचलली जाते तेव्हा तिचा पृष्ठभाग व आकारही महत्त्वाचा असतो. अगदी कागदी विमानेसुद्धा हवेत तरंगतात. पण कागदाचा गोळा करून तो वर फेकला तर तो खाली येतो. कारण येथे आपण त्याचा पृष्ठभाग लहान केलेला असतो. जर झाडाची पाने जोराने हलत असतील तर ते पतंग उडवण्यास अनुकूल वातावरण असते. वाऱ्याचा वेग ताशी ७ ते १८ मैल असेल तरच पतंग व्यवस्थित उडू शकतो.
पतंग उडण्याचे विज्ञान
पतंग हवेपेक्षा जड असतो तरी तो उडतो, कारण त्याच्या दोन्ही बाजूंनी व खालून असलेला हवेचा प्रवाह त्याला वर जाण्याचा जोर प्राप्त करून देतो. शिवाय त्याचे निमुळते टोक त्याला हवेत वर जाण्यास मदत करते. पतंग हवेत असताना त्याच्या वरच्या भागावरून हवा जाते तेव्हा कमी दाबाची पोकळी तयार होते, त्यामुळे त्याला वर जाण्यास जागा मिळते, त्याच वेळी तो खालून वर ढकलला जातो. लिफ्ट (खालून वर उठाव), ड्रॅग (पतंगाच्या पृष्ठभागावर होणारा वाऱ्याचा विरोध) व ग्रॅव्हिटी (गुरुत्व) तसेच थ्रस्ट (वाऱ्याचा जोर) ही सगळी बले पतंगात जिथे एकत्र येतात त्याला दाब केंद्र असे म्हणतात, ते आपण समजतो तसे जिथे पतंगाला दोरी बांधलेली असते तिथे नसते. गुरुत्व व ड्रॅग यांच्यावर जेव्हा वाऱ्याचा खालून वरती असलेला जोर मात करतो तेव्हा पतंग उडतो. आपण पतंगाची दोरी हलवतो तसा तो आणखी वर जातो, कारण पतंगाचा वाऱ्याशी असलेला कोन (अँगल ऑफ अ‍ॅटॅक) बदलतो. परिणामी वाऱ्याचा पतंगावर खालून वर असलेला जोर वाढतो, म्हणूनच पतंगाच्या दोरीला हिसके दिल्यावर तो आणखी वर जातो. पतंगाला दोन समान भाग असलेले पंख असतात; त्यामुळे जो कोन तयार होतो त्याला ‘डायह्रेडल कोन’ असे म्हणतात. त्यामुळे पतंग सहज वर जातो व समतोल साधत स्थिरही राहतो. पतंगाच्या काडय़ा, त्याची शेपूट, आकार यावरही तो किती पटकन उडणार हे अवलंबून असते. स्विस गणितज्ञ डॅनियल बरनॉली याने पतंग का उडतो याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण १७३८ मध्ये केले. त्याच्या मते पतंगाचा उडण्याचा कोन हा हवेचे दोन भाग करतो. एक वर व एक खाली असतो, त्यात वरती हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो व खालच्या बाजूला जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. त्यातील फरक कमी असला तरी तो पतंगाला वर ढकलण्यास पुरेसा ठरतो. पावसाळ्यात मात्र पतंग उडवल्याने शॉक बसण्याचा धोका असतो.  साधारणपणे विजेच्या खांबांजवळ पतंग उडवू नये. मैदानावर पळत जाऊन तुम्ही पतंगाला वर उडण्यास अनुकूल स्थिती निर्माण करू शकता.
छंदाची गरज का?
तुलनेने अत्यंत स्वस्त आणि थोडाशा हातसफाईने हस्तगत होऊ शकणारा हा मैदानी खेळप्रकार वाढण्याची गरज आजच्या संगणकप्रेमी पिढीला अधिक आहे. संगणक, टीव्ही, मोबाइल्स आणि विविध गॅझेट्सवरचे सातत्याचे वावरणे यातून व्यक्तीची एकाग्र शक्ती कमी होत चालली आहे. पतंग उडविण्याने आनंदासोबत मिळणारी एकाग्र स्थिती ही संगणकीय गेम्सहून अधिक असते. डोळ्यांना आणि मानेला आवश्यक असलेल्या हालचाली पतंगबाजीतून घडू शकतात. पतंग फोटोग्राफी ही छायाचित्रणातील नवी शाखाही तयार झाली आहे. सध्या परदेशामध्ये या छंदाच्या उपयुक्ततेबाबत विविध संशोधन होत आहे. मात्र पतंग आनंद घ्यायचा असल्यास अशा संशोधनाचे निष्कर्ष येईस्तोवर वाट पाहायची गरज नाही.
इतिहास आणि भूगोल
प्राचीन ग्रीक वैज्ञानिक आर्काइट्स याने पतंगाचा शोध लावला असे मानले जाते. काही नोंदीनुसार पतंगाचा इतिहास तसा २००० वर्षांपूर्वीचा आहे. पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेला असेही उल्लेख आहेत. तेथील एका लोककथेनुसार एक शेतकरी शेतात काम करीत असताना त्याने उडणारी टोपी दोरीने खेचून धरली; तेच पतंगाचे पहिले रूप होते. त्यानंतर ख्रि.पू. २०० मध्ये चीनचा जनरल हान सिन याने हान भिंतीवरून पतंग उडवण्याची पद्धत सुरू केली. चीनच्या व्यापाऱ्यांनी पतंगबाजी कोरियात नेली व तेथून पतंग आशियात पंख पसरवून बसला. जपानमध्ये सातव्या शतकात बौद्ध भिख्खूंनी पतंगबाजी आणली. त्यांचा त्यातील हेतू हा वाईट आत्म्यांना हाकलून पिकांचा चांगला हंगाम लाभावा असा होता. भारतात पतंगाचा इतिहास मुघल काळातला आहे. त्या वेळच्या चित्रात काही व्यक्ती प्रेमसंदेश पाठवण्यासाठी पतंग वापरत असत, असे तेव्हाच्या चित्रांवरून दिसते. पहिल्या महायुद्धात पतंगांचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला. अठराव्या शतकात त्यांचा वापर संशोधनासाठी केला गेला. बेंजामिन फ्रँकलिन, अ‍ॅलेक्झांडर विल्सन यांनी हवामानाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर केला, तर राईटबंधू यांनी त्याचा वापर करून पुढे विमानाचा शोध लावला. विल्यम एडी व लॉरेन हारग्रेव्ह यांनी हवामानाचा अभ्यास त्याच्या मदतीने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 3:43 am

Web Title: kite science
Next Stories
1 विज्ञानवेध २०१४
2 that’s इट: ‘गोल’ बच्चन!
3 कर्करोग संशोधनात आता प्रतिकारशक्ती यंत्रणा सुधारण्यावर भर
Just Now!
X