08 March 2021

News Flash

‘रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली..’

भावगीत हा मनाचा हळवा कोपरा कधीच झाला होता.

भावगीत हा मनाचा हळवा कोपरा कधीच झाला होता. तबकडय़ांमधून भावगीते ऐकवणे हे कंपन्यांचे काम सुरू होतेच. त्याचबरोबर कंपन्यांनी कॅसेटस्ची निर्मिती केली. फोनो, ग्रामोफोन होतेच; आता कॅसेट प्लेअर आले. काही वेळा एक कॅसेट, तर काही वेळा दोन, तीन किंवा चार असे कॅसेट संच विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागले, तेही आकर्षक कव्हरसकट. सहा से.मी. बाय दहा से.मी. अशा आकारातील आयताकृती कॅसेटस् हाताळायलाही सहजसुलभ होत्या. ध्वनिमुद्रिकांमधून लोकप्रिय झालेली गाणीसुद्धा मग कॅसेटस्च्या स्वरूपात मिळू लागली. बाजारात सिंगल कॅसेट प्लेयर किंवा डबल कॅसेट प्लेयर दिसू लागले. अशाप्रकारे भावगीते ऐकण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध झाला.

याच काळात ध्वनिमुद्रिका आणि कॅसेट अशा दोन्ही माध्यमांत सहभागी झालेल्या मधुर व तरल आवाजाच्या गायिका अनुराधा पौडवाल यांची गीते रसिकांना मनापासून आवडली. आवाजाचा वेगळा लगाव व त्यातील भावपूर्ण हळुवारपणा श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला. भावगीत व पाश्र्वगायन या दोन्ही प्रांतात, संगीतकारांपासून रसिकांपर्यंत, सर्वानी हा सुरेल आवाज आपलासा केला.

गायिका अनुराधा पौडवाल, संगीतकार अनिल-अरुण आणि गीतकार शांताराम नांदगावकर यांनी मिळून अनेक गोड गोड भावगीते रसिकांना दिली. गीतप्रांतात, विशेषकरून मराठीत, ज्या संगीतकार जोडय़ा प्रसिद्ध झाल्या त्यात ‘अनिल-अरुण’-अनिल मोहिले व अरुण पौडवाल- ही जोडी अग्रेसर ठरली. या जोडीने उत्तमोत्तम गीते दिली. त्यांच्या गाण्यांच्या चाली आणि म्युझिक अरेंजमेंट या दोन्ही गोष्टी सरस ठरल्या. अनिल मोहिले हे उत्तम व्हायोलिनवादक, तर अरुण पौडवाल हे उत्तम अकॉर्डियन व कीबोर्डवादक. हे दोघे एका संगीतरचनेसाठी एकत्र आले अन् पुढे या जोडीने दिलेले प्रत्येक गीत अत्यंत श्रवणीय असे झाले. त्यातलेच एक गाजलेले गीत-

‘रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली

मनमीत आला तिच्या पाऊली।

फुलल्या मनाच्या मुक्या पाकळ्या

झुलल्या लता आज प्रीतीतल्या

अशी आली, प्रीती ल्याली, नवी ही कळी।

रजनी अशी ही निळीसांवळी

किरणांत न्हाली धरा मलमली

अशा वेळी, प्रिया येई, फुले लाजली।’

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील मधुर आलापाने हे गीत सुरू होते. तो आलाप तालासह येतो. या आलापानंतर येणारे व्हायोलिनचे स्वर आपल्याला गायनाकडे नेतात. या गीताचा मुखडा अनुराधाजींच्या स्वरात ऐकला, की बहरलेल्या रजनीगंधाचा म्हणजेच निशिगंधाचा प्रीतसुगंध मनामध्ये दरवळू लागतो! दुसऱ्या ओळीतील ‘तिच्या पाऊली’ हे शब्द रजनीगंधा फुलांसाठीसुद्धा आणि ‘मनमीत’च्या मनातील प्रेयसीसाठीसुद्धा आहेत. अंतऱ्यापूर्वी वाजविलेला सतार व व्हायोलिनचा म्युझिकपीस अर्थपूर्ण आहे. गायनातील चालीचा ‘ओघ’ त्यामध्ये दिसतो. तोच मूड पुढे कायम ठेवला आहे. दोन्ही अंतरे संपताना ‘नवी ही कळी’ आणि ‘फुले लाजली’ या शब्दांचे खास वेगळे उच्चारण करून समेवर येणे हे दाद देण्यासारखे झाले आहे.  गायिकेचे हे मधुर व तालात बांधलेले उच्चार ऐकण्यासाठी हे गीत पुन:पुन्हा ऐकायलाच हवे. रूपक ताल गाण्यामध्ये ऐकताना तो गाण्यातल्या भावनेसह येतो व संपूर्ण गायनभर संगत करतो. फुलांचा ताजेपणा व टवटवीतपणा घेऊनच हे गीत आपल्यासमोर येते. ती ताकद शब्दांचीसुद्धा आहे. गाताना भावनेचे उच्चारण होत नाही. परंतु शब्दांच्या उच्चाराच्या ओघात ती अर्थ व आशय यांसह गायनात आपसूक येते. किंबहुना भावगीत गाताना तसे झालेच पाहिजे. मुख्य म्हणजे, भावना ही शिकवून येत नाही. आपल्या मनात गाणे व शब्द रुजले, तर त्याचे फूल होऊन ते बाहेर येणार व उमलणारच. आणि या गीतात ते परिपूर्ण दिसते. यासाठी गायिका, गीतकार व संगीतकार यांना श्रेय दिलेच पाहिजे.

गायनातील आपले गुरू कोण, हा प्रश्न विचारताक्षणी अनुराधाजी म्हणाल्या, ‘‘खरं सांगू, मी लताजींची गाणी ऐकत ऐकत गायनाचा सराव केला. पं. जसराज, पं. रामनारायण, पं. पोहनकर यांचेही मार्गदर्शन मिळाले. माझी आई- इंदूताई नाडकर्णी हिने पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले.’’

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अनुराधाजी (तेव्हाच्या अलका नाडकर्णी) गीत-संगीताच्या मैफलींतून सहभाग घेत असत. पुढील काळात उत्तम वादक अरुण पौडवाल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अरुणजी हे हिंदूी चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे संगीत संयोजक होते. ‘अभिमान’ या हिंदी चित्रपटासाठी अनुराधाजींना एक श्लोक गाण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या पाश्र्वगायन कारकीर्दीची सुरुवात झाली. तरल आवाज आणि उत्तम भावाविष्कार यांमुळे अनुराधाजींचे गायन श्रोत्यांना भावले. त्यानंतर जवळपास अडीचशे मराठी-हिंदी चित्रपटांसाठी अनुराधाजींनी पाश्र्वगायन केले. ‘दुर्गा अमृतवाणी’, ‘माता के भजन’, ‘गणेश अमृतवाणी’, ‘आरती संग्रह’, ‘शिवगुणगान’, ‘छठ महिमा’, ‘शिव सुमिरण’ असे जवळपास तीनशे आध्यात्मिक गीतांचे आल्बम हे संपूर्णपणे अनुराधाजींच्या स्वरातले आहेत. त्यांच्या गायन कारकीर्दीबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पद्मश्री सन्मान, मदर तेरेसा पुरस्कार, महाराष्ट्र सरकारतर्फे महमद रफी पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार, अशा पुरस्कारांनी अनुराधाजींचा गौरव झाला. कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

अनिल-अरुण या संगीतकार जोडीबद्दल अतिशय कौतुकाने अनुराधाजी म्हणाल्या : ‘‘ते दोघे म्हणजे ‘शंकर-जयकिशन ऑफ मराठी सिनेमा’ आहेत. चाली बांधताना त्यांना नेहमी नावीन्याचा ध्यास असे आणि एखादी चाल लोकप्रिय कशी होईल, अरेंजमेंटमधील संगीत उत्तमच असेल याकडे त्यांचा कटाक्ष असे.’’ अनिल-अरुण या जोडीने दिलेले प्रत्येक गीत रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे, आनंद देणारे झाले. सांगीतिक दर्जा म्हणून सर्वोत्तम झाले. या जोडीला जेव्हा गीतकार शांताराम नांदगावकर भेटले तो क्षण म्हणजे उत्तमोत्तम भावगीतांची आश्वासक चाहूल होती.

गीतकार नांदगावकरांची सून आणि पाश्र्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी अतिशय जिव्हाळय़ाने गीतकार नांदगावकरांची माहिती दिली- नांदगावकर हे मूळचे कोकणातील कणकवलीच्या नांदगावचे. लहानपणीच ते मुंबईत आले. परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. कविता लिहिण्याची त्यांना लहानपणापासून आवड होतीच, त्यामुळे पुढील काळात ते गीतरचनेकडे आकर्षित झाले. शब्दांमधून जगरहाटी मांडणे ही त्यांची ताकद होती. अनेकदा सिच्युएशन्ससाठी गाणी लिहिणे हे व्यावसायिक काम त्यांना करावे लागले. पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांच्या क्षमतेचा प्रत्ययही त्यांनी आणून दिला. श्रोत्यांच्या ओठांवर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांनी भावगीते, भक्तिगीते, चित्रगीते लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ‘ससा तो ससा’ या बालगीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. संगीतकार अनिल-अरुण यांच्यासह त्यांची ‘वेव्हलेंग्थ’ जुळली. श्रेष्ठ गायक किशोरकुमार यांनी गायलेले मराठी गीत-‘अश्विनी, ये ना..’ हे नांदगावकरांचेच. त्यांनी स्वत:ला कधी चौकटीत बंदिस्त केले नाही. त्यांनी ‘दलितांचा राजा भीमराव माझा..’ हे गीतही लिहिले आणि जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या खासगी आल्बमसाठी ‘जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला..’ हे तत्त्वज्ञान सांगणारे गीतसुद्धा लिहिले. सुनील गावस्कर यांनी गायलेले ‘या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला’ हे गीतसुद्धा नांदगावकरांचेच. त्यांनी ‘अष्टविनायक’ या चित्रपटाकरिता लिहिलेली गीते लोकप्रिय झाली.

माडगूळकर, खेबूडकर ही मंडळी उत्तमोत्तम गीते देत होती, त्या काळात नांदगावकरांचा गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. त्यांच्या गीतलेखनावर ग. दि. माडगूळकर यांच्या काव्याचा प्रभाव होता. ते गदिमांना गुरुस्थानी मानत. गदिमा जेव्हा नांदगावकरांच्या खार येथील घरी आले तेव्हा त्यांनी गदिमा यांना ‘राम प्रहरी राम गाथा’ हे गीत ऐकवले. गदिमांनी खूप तारीफ केली. शाहीर अमरशेखांचे पोवाडेदेखील नांदगावकरांसाठी प्रेरणास्थान ठरले. अमरशेखांचे पोवाडे ते आवर्जून ऐकायला जात असत.

एका कार्यक्रमात नांदगावकरांना विचारले, ‘तुमचा चष्मा हा डोळय़ांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर म्हणजे डोक्यावर असतो, असे का?’ तेव्हा कवी मिस्कील हसले व म्हणाले, ‘कवी हा नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो. त्यामुळे मी केवळ लिहीत असतानाच डोळ्यांवर चष्मा सरकवतो. एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो.’ एकूणच, गीतकारांमध्ये नांदगावकरांचा वरचष्मा आहे हे खरे आहे!

– विनायक जोशी

vinayakpjoshi@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2017 1:55 am

Web Title: anuradha paudwal and shantaram nandgaonkar
Next Stories
1 ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’
2 चांदणे शिंपीत जाशी..
3 ‘मधु मागशि माझ्या सख्या, परी..’
Just Now!
X