08 March 2021

News Flash

‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात..’

कवी कृ. ब. निकुंब यांची एक कविता आपल्या पाठय़पुस्तकात अभ्यासाला होती.

कवी कृ. ब. निकुंब यांची एक कविता आपल्या पाठय़पुस्तकात अभ्यासाला होती. शाळेतील मराठीच्या तासाला ही कविता एक उत्तम काव्य म्हणून आपण सर्वजण शिकलो. काव्यरसिकांनाही ही कविता खूप आवडली. त्यातील सासुरवाशिणीची हृद्य भावना थेट त्यांच्या मनाला भिडली. ही कविता नुसती वाचली तरी मन हळवं होतं. ‘माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला’ अशी अवस्था प्रत्येकाचीच होते. जेव्हा कवितेतील शब्द चालीत स्वरबद्ध होतात तेव्हा ती कविता सर्वदूर पोहोचते. त्याचे गीत होते आणि श्रोत्यांना ते वारंवार ऐकायची संधी मिळते. या कवितेचं भाग्य असं की, या कवितेची दोन वेळा दोन वेगवेगळ्या संगीतकारांकडून चाल बांधली गेली आहे. त्यातली एक रचना आपणा सर्वाना माहीत असलेली. ती गायली आहे सुमन कल्याणपूर यांच्या सुमधुर स्वरात. आणि त्याचे संगीत कमलाकर भागवत यांचे आहे. ही रचना सर्वाच्या इतकी मनात खोलवर रुजली आहे, की ती चालीसकट सगळ्यांना पाठ आहे. गीत-संगीताच्या कार्यक्रमांतून बऱ्याच वेळा ती सादर होत आलेली आहे. या गाण्याला ‘वन्स मोअर’ ठरलेलाच. आणि या गाण्याची दुसरी चाल तत्पूर्वी २०-२२ वर्षे आधी बांधली गेली आहे. त्याचे संगीतकार आहेत ए. पी. नारायणगावकर आणि गायिका कालिंदी केसकर. दोन्ही चाली भिन्न, वाद्यमेळ वेगळा आणि गायनशैलीही वेगळी आहे. एकाच कवितेस दोन वेगवेगळ्या संगीतकारांनी स्वरबद्ध करून ती श्रोत्यांसमोर ध्वनिमुद्रिकेच्या रूपात येणे ही भावगीतांच्या प्रांतातील काही पहिलीवहिली घटना नक्कीच नाही. सहज आठवायचं म्हटलं तरी पट्टदिशी चार-पाच इतर गाणीही आठवतात. या कवितेतील एकच भावना दोन वेगळ्या पद्धतीने स्वरबद्ध झाली आहे. पैकी एक चाल माहितीची आणि रसिकांच्या मनात वसलेली आहे. मग अर्थातच दुसरे गीत कुठे ऐकायला मिळेल याचा शोध सुरू होतो. बऱ्याच वेळा ‘अरेच्चा.. दुसरी चालसुद्धा आहे का?’ अशी आश्चर्याची भावनाही आपण व्यक्त करतो. या आश्चर्यात स्वाभाविकपणा असतो. आनंदही असतो. भावगीत प्रांतातील ही मोलाची भर आहे ही भावनासुद्धा असते.

‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात

माहेरी जा सुवासाची कर बरसात ।

सुखी आहे पोरं सांग आईच्या कानात

आई भाऊसाठी परि मन खंतावतं ।

विसरली का ग भादव्यात वर्स झालं

माहेरीच्या सुखाला गं मन आंचवलं ।

फिरून फिरून सय येई जीव वेडावतो

चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो ।

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार

हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार ।

परसात पारिजातकाचा सडा पडे

कधी फूल वेचायला नेशील तू गडें ।

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय

माया माझ्यावर दाट जशी तुझी माय ।

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला

माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला।’

या गीतामध्ये दोन-दोन ओळींचे, मुखडा सोडून, सात अंतरे आहेत. ए. पी. नारायणगांवकर यांच्या चालीत सहावा अंतरा नाहीए. त्या गाण्याची चालसुद्धा द्रुतलयीत आहे. हवाईन गिटार या वाद्याचा त्यात वापर केलेला दिसतो. भागवतांच्या स्वररचनेत व्हायब्रोफोन व सतार ही वाद्ये प्रामुख्याने आढळतात. नारायणगांवकरांच्या चालीत ‘कर बरसात’ या शब्दांमधील ‘त’ या अक्षरावरील सांगीतिक जागा ‘एकवार पंखावरूनी’च्या ‘तुझ्या अंगणात’मधल्या ‘त’ची आठवण करून देते. ए. पीं.च्या चालीत पहिला अंतरा गायल्यानंतर मुखडा पूर्ण गायला गेलाय. दोघांच्या चालीत अंतऱ्यानंतर गाणे पुन्हा साइन लाइन व क्रॉस लाइनवर येत नाही. एका गाण्यात कालिंदी केसकर व दुसऱ्या गाण्यात सुमन कल्याणपूर हे भावमधुर स्वर आपल्या मनाची पकड घेतात. अर्थात जास्तीत जास्त वेळा आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गीतच ऐकलेले आहे. कालिंदी केसकर यांनी गायलेले गीतही तितकेच श्रवणीय आहे.

संगीतकार कमलाकर भागवत यांचे ज्येष्ठ बंधू रत्नाकर भागवत यांनी त्यांच्या भरभरून आठवणी सांगितल्या. कमलाकर भागवत यांचा जन्म २० ऑक्टोबर १९३२ रोजी रायगड जिल्ह्य़ातील महाड या गावी झाला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून छोटे कमलाकर मेळ्यामध्ये गात असत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. संगीत शिकण्यासाठी घरात अनुकूल वातावरण नव्हते. वडिलांची महाड-मुंबई मोटार सव्र्हिस होती. पण कमलाकरांना संगीत शिकायचे होते. लहानपणी शाळेला सुट्टी लागल्यावर ते मुंबईतल्या शास्त्री हॉलमध्ये वास्तव्याला असणाऱ्या मोठय़ा बहिणीकडे- लीला कान्हेरे यांच्याकडे येत असत. त्यावेळी मंगेशकर कुटुंबीय त्याच परिसरात राहत होते. साहजिकच त्यांच्या घरी जाण्याची संधी कमलाकरांना मिळत असे.

पुढे काही दिवसांनी त्यांनी महाड सोडले आणि मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर पडेल ते काम त्यांनी केले. मुंबईतले आयुष्य अतिशय खडतर होते. तरीही जिथे संगीत कानी पडेल तिथे जाऊन ते श्रवण करायचे, हा त्यांचा निर्धार पक्का होता. या काळात आकाशवाणीवरून प्रसारित होणारे गायिका हिराबाई बडोदेकर यांचे गाणे त्यांना आवडू लागले. शिवाय वयाच्या दहाव्या वर्षांपासून सिनेसंगीत कानावर पडलेले होतेच. गुलाम हैदर, शामसुंदर, हुस्नलाल भगतराम, खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास, दादा चांदेकर, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, केशवराव भोळे यांचे संगीत त्यांच्या मनावर प्रभाव टाकणारे ठरले. १९४८ साली महाराष्ट्र सरकारचे काही कार्यक्रम त्यांनी केले. १९५२ पासून ‘म्युझिक स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांकडून दीड रुपया फी आकारून ते संगीतशिक्षणाद्वारे अर्थार्जन करू लागले. मान्यवरांच्या शिफारशीमुळे त्यांना महानगरपालिकेत संगीत शिक्षकाची नोकरीही मिळाली. तिथे त्यांनी तळागाळातील मुलांना संगीत शिकविले. आपण गाऊ शकतो हा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. एकदा आकाशवाणीसाठी लिहिलेल्या ख्रिस्तजन्मगीतांच्या कार्यक्रमात निवेदकाकडून त्यांचे ‘रेव्हरंड भागवत’ असे नाव चुकून घोषित झाले. त्यांच्या जिमी अल्मेडा या शिष्योत्तमाने अतिशय प्रेमाने आपल्या या भागवत गुरुजींना आपले घर राहावयास दिले. कामगार वस्तीतील मुलांना त्यांनी व्रतस्थाप्रमाणे संगीत शिकवले. त्यांच्या मनातले ‘म्युझिक मिशन’ अशा तऱ्हेने यशस्वी झाले. ‘संगीतातून समाजसेवा करणारे’ अशी त्यांची ख्याती झाली. गायिका सुमन कल्याणपूर यांनी भागवतांकडे अनेक गीते गायली. १९७१ च्या सुमारास भागवतांची ‘गृहिणीगीते’ ही ध्वनिमुद्रिका बाजारात आली. त्यातली सर्व गाणी लोकप्रिय झाली. यातलेच ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ हे एक गीत.

‘मी ए. पीं.ची मुलगी..’ असे अभिमानाने सांगणाऱ्या गायिका मधुवंती पेठे यांनी त्यांचे वडील- संगीतकार ए. पी. नारायणगांवकर यांच्या अनेक आठवणी गप्पांत उलगडल्या. पं. आत्माराम पांडुरंग नारायणगांवकर यांचे जन्मगाव पुण्याजवळील सासवड. १९१७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण नारायणगावातच गेले. श्री समर्थ रामदास स्वामींचे शिष्यांनी १७५३ मध्ये या गावात भव्य श्रीराम मंदिराची स्थापना केली होती. ए. पीं.च्या आई-वडिलांनी रामसेवेचे व्रत घेतले होते. हा वारसा पुढे त्यांना मिळाला. घरात सर्व वाद्ये होती. वयाच्या दहाव्या वर्षी ते भजने गाऊ लागले. प्रभात फेरी हे तर गाणे म्हणण्याचे हमखास स्थान! पुण्याचे दत्तात्रय देव यांच्याकडे मिळालेले रागदारीचे शिक्षण, मुंबई- भेटीत ऐकायला मिळालेले बालगंधर्वाचे गाणे, सज्जनगड भेटीत औंध संस्थानच्या महाराजांनी ऐकलेले ए. पीं.चे गाणे, १९३३ मध्ये औंधमध्ये आल्यावर संस्थानचे दरबारी गवई पं. अनंत मनोहर जोशी यांच्याकडे मिळालेली गायनाची तालीम अशा सर्व गोष्टींमुळे ए. पीं.चे गाणे बहरले. औंधच्या महाराजांनी त्यांना ‘संगीतरत्न’ ही पदवी दिली. पुढे पुण्यामध्ये आल्यावर पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्य पं. बापूराव केतकर यांची तालीम त्यांना लाभली. मुंबई आकाशवाणीची ऑडिशन ते पास झाले आणि १९४२ मध्ये आकाशवाणीवर त्यांचा पहिला कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमात त्यांना व्हायोलिनसाथ श्रीधर पार्सेकरांची, तर तबलासाथ पं. पंढरीनाथ नागेशकर यांनी केली होती. पुढे एच. एम. व्ही. कंपनीचे या कलाकाराकडे लक्ष गेले आणि त्यांना भावगीताची रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. सुगम गायन सादर करण्याची खुबी त्यांच्याकडे होती. १९४५ ते १९५५ हा दहा वर्षांचा एच. एम. व्ही. कंपनीमधला काळ ए. पीं.साठी महत्त्वाचा ठरला. एच. एम. व्ही. पुस्तिकेमधून या कलाकाराची जाहिरात दिसू लागली. अनेक गायक-गायिकांनी ए. पीं.ची गीते गायली. त्यातील पं.राम मराठे यांनी गायलेली ‘दे चरणी आसरा देवा’, ‘पंढरीनाथ नामाचा’, ‘आला जणू चंद्रमा’, ‘हासे बाला..’ ही गीते विशेष गाजली. मराठी संवाद ध्वनिमुद्रिकांच्या संगीत संयोजनातही ए. पीं.चा सहभाग असे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही कन्नड भाषेतील भावगीतांच्या ध्वनिमुद्रिकासुद्धा निघाल्या आहेत.

ए. पी. नारायणगांवकर हे गायक, संगीतकार, संगीत नट, कीर्तनकार, लेखक, समीक्षक, अध्यापक, समाजसेवक असे बहुपेढी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कन्या मधुवंती पेठे, आसावरी आगाशे, पुत्र दीपक व स्नुषा मीरा नारायणगांवकर ही सर्व मंडळी गायन क्षेत्रातच आहेत. त्यांच्या पुढल्या पिढीत संगीत ओघानेच आले आहे.

संगीतकार कमलाकर भागवत यांचे शिष्य जिमी अल्मेडा आणि ज्योती अल्मेडा यांच्या पुढाकाराने माणगाव- निजामपूर परिसरातील वनवासी कल्याण आश्रम शाळेत कै. संगीतकार कमलाकर भागवत सभागृह उभे राहिले. गुरूचे ऋण व्यक्त करणे ही त्यामागील भावना आहे.

‘घाल घाल पिंगा वाऱ्या..’ या गीताच्या निमित्ताने या दोन्ही संगीतकारांबद्दल जाणून घेणे अगत्याचे वाटले. कवी कृ. ब. निकुंब यांच्या या काव्यातील आर्त भावना सासुरवाशिणींना माहेरची आठवण करून देते. ती मनात पिंगा घालत राहते. या ध्वनिमुद्रिका यायच्या आधी स्त्रीभावनेची गीते पुरुष गायकच गायचे. रसिकही ते स्वीकारत. नंतर काळ बदलला. या काव्यात जरी स्त्रीभावना व्यक्त झालेली असली तरी प्रत्येक संगीतप्रेमीने हे गीत कधी ना कधी मनातल्या मनात- तेही मोठय़ा आवाजात गायलेले आहे.

विनायक जोशी

vinayakpjoshi@yahoo.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2017 1:15 am

Web Title: vinayak joshi articles in marathi on marathi poems
Next Stories
1 ‘जीवाच्या जिवलगा नंदलाला रे..’
2 ‘निळा सावळा नाथ..’
3 ‘केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर..’
Just Now!
X