‘‘मी जेव्हा सरावाला जातो, तेव्हा प्रत्येक सराव सत्रात ०.१ टक्क्यांनी सुधारणा करण्याचे ध्येय समोर ठेवतो. दररोज केलेल्या मेहनतीचेच एके दिवशी फळ मिळते. अशी कोणतीही जादू माझ्याकडे नाही, जिच्यामुळे माझ्या धावा धावफलकावर झळकतात,’’ असे स्पष्ट मत भारताचा भरवशाचा फलंदाज विराट कोहलीने पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कोहली एक खेळाडू म्हणून अधिकाधिक समृद्ध होत आहे, याचे स्पष्टीकरण देताना आश्चर्याच्या सुरात तो म्हणाला, ‘‘माझ्याविषयी चांगले बोलले जात आहे, याचे मलाच आश्चर्य वाटते. कारण माझे टॅटूज, स्टायलिस्ट कपडे, आदी गोष्टींसाठीच चर्चा व्हायची. या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे सोपे असते, परंतु दररोज आपले कौशल्य सुधारणे अतिशय अवघड असते.’’

‘‘बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील अखेरच्या चेंडूच्या वेळी हार्दिक पंडय़ाच्या आसपास त्याला योग्य रीतीने मार्गदर्शन करू शकतील असे खेळाडू होते. यावेळी भावनाप्रधान होणे उपयोगाचे नव्हते. अखेरच्या चेंडूच्या वेळी मी लाँग ऑनला होतो. फलंदाजाला चेंडू मारता न आल्यावर महेंद्रसिंग धोनी काय करणार, याचा मी विचार करीत होतो. ते अंतर किती होते मला माहीत नाही. पण धोनीने चेंडू फेकला नाही, तर आपल्या वेगाच्या बळावर स्टम्पला तो लावला. कठीण प्रसंगात शांतपणे असे निर्णय घेण्यात धोनी वाकबगार आहे,’’ असे कोहलीने सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन म्हणाला की, ‘‘भारताविरुद्धचा सामना हा कदाचित माझ्या कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो. त्यामुळे स्वाभाविकपणे हा सामना माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. पाकिस्तानविरुद्ध आमची कामगिरी चांगली झाली आहे, ही संघाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे.’’

भेटी लागी जिवा..

खेळपट्टीच्या स्वरूपाविषयी गंभीर असणाऱ्या संघ संचालक रवी शास्त्री यांनी संघाच्या सरावासाठी बिंद्रा स्टेडियम गाठल्यावर सर्वप्रथम क्युरेटर दलजीत सिंग यांची भेट घेतल्यावर सर्वाच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा करून सामन्याविषयीचे ठोकताळे शास्त्रींनी बांधले. मागील वर्षी वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची निर्णायक एकदिवसीय लढत गमावल्यानंतर त्याचा राग शास्त्री यांनी क्युरेटर सुधीर नाईक यांच्यावर काढला होता. मात्र त्यानंतर पहिल्या कसोटीसाठी मोहालीत येताच शास्त्री यांनी चक्क ७३ वर्षीय दलजीत सिंग यांचे पाय धरले होते. त्यानंतर फिरकीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी आरामात जिंकली होती. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही सरावानंतर दलजीत सिंग यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.