टेलीग्राम या मेसेजिंग अॅपचे सीईओ पावेल ड्युराव यांना शनिवारी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. टेलीग्रामचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी करण्यात येत असून त्यावर नियंत्रणत ठेवण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांना फ्रान्समध्ये अटक झाल्यानंतर आता भारतातही खंडणी आणि जुगार यासारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये या अॅपचा सहभाग आहे का, याचा तपास भारत सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) टेलीग्रामवरील P2P कम्युनिकेशनची चौकशी करत आहेत. या तपासानंतर अॅप संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे या तपासात टेलीग्राम अॅप दोषी आढळल्यास या अॅपवर भारतात बंदीघालण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत टेलीग्रामकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा – १ सप्टेंबरपासून होणार ‘हा’ बदल? बनावट कॉल, Messagesची चिंता दूर; नवीन नियम टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढवणार…
खरं तर टेलीग्रामचे भारतात ५० लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. पण गेल्या काही वर्षांत टेलीग्राम हे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृतींसाठीचा अड्डा बनले आहे. या अॅपचा वापर करून गुन्हेगारांनी अनेकांना लाखो -कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. मध्यंतरी यूजीसी नेट परीक्षेतील घोटाळ्यादरम्यानही हे अॅप चर्चेचा विषय बनले होते. या परीक्षेचा पेपर या फोडल्यानंतर या अॅपद्वारे तो विकण्यात आला, असा आरोप करण्यात आला होता.
टेलीग्रामची स्थापना झाल्यापासून जगभरातील अनेक सरकारांनी ॲपवर नियंत्रण आणावे, यासाठी दबाव आणला आहे. मात्र अॅपचे सीईओ दुरोव्ह यांनी विविध देशातील सरकारांचा दबाव झुगारून लावला. त्यामुळे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याची त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.
हेही वाचा – सेकंड हॅण्ड iPhone घेण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी एकदा नक्की बघा; नाही तर होईल नुकसान
भारताबरोबरच जगभरातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात टेलीग्रामचा वापर होतो आहे. युक्रेन आणि रशियामध्ये टेलीग्राम प्रामुख्याने अधिक प्रमाणात वापरले जाते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांचे सरकारी अधिकारी संवादासाठी टेलीग्रामचा वापर करतात. तसेच रशियामधील सरकारी विभाग, अधिकारीही टेलीग्रामचा अधिकृतपणे वापर करतात. दोन्ही देशांत युद्ध छेडल्यानंतर या युद्धासंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणून टेलीग्रामकडे पाहिले जाते.