महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन करताना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधातील आंदोलनानंतर ९२ ते ९३ टक्के मशिदींवरील भोंग्यांचे आवाज कमी झाल्याचा दावा केला. भोंग्यांविरोधातील आंदोलन यशस्वी ठरल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. राज यांनी मंगळवारी केलेल्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतल्या मुस्लिम समुदायात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जुमा मशिदीच्या विश्वस्तांनी ‘अल् इस्लाह’ नावाचे मोबाईल ॲप लाँच केले आहे. मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टमधून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

नक्की वाचा >> “खरं तर लग्न झाल्या झाल्या…”; दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरुन राज ठाकरेंचा शिंदे सरकारला मिश्कील टोला; सभागृहात पिकला हशा

आपल्या आंदोलनामुळेच ९२ टक्के मशिदीवरील भोंगे बंद झाले असून मुस्लिमांकडूनही या आंदोलनाचे स्वागत करण्यात आल्याचा दावा ठाकरे यांनी केल्याचा संदर्भ देत शिंदे यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट करत या नव्या ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. “राज ठाकरे यांनी “मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर त्यासमोर हनुमान चालिसा लावू” हा इशारा दिल्यानंतर आपल्याकडच्या सुमारे ९२ टक्क्यांहून अधिक मशिदींनी लाऊडस्पीकरवरून दिली जाणारी अजान बंद केली. कधी नव्हे ते सर्वसामान्य नागरिकांची सकाळची झोपमोड बंद झाली. मुस्लिम धर्मगुरूंनी घेतलेल्या या योग्य निर्णयासाठी राज ठाकरेंनी त्यांचे जाहीर कौतुक आणि अभिनंदनही केले,” असं पोस्टच्या सुरुवातीला शिंदे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…”

“हा गोंगाट रोखण्यासाठी आता मुस्लिम समाज आणखी दोन पावलं पुढे गेला आहे,” असं म्हणत शिंदे यांनी नवीन ॲपची माहिती दिली आहे. “मुंबईतल्या मुस्लिम समुदायात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जुमा मशिदीच्या विश्वस्तांनी काल ‘अल् इस्लाह’ नावाचे मोबाईल ॲप लाँच केले. इस्लाह म्हणजे रिफॉर्म/ सुधारणा! या ‘अल् इस्लाह’ ॲपच्या माध्यमातून मोबाईल वापरकर्त्याला नमाजची वेळ झाली की थेट लाइव्ह अलर्टप्रमाणे कळवली जाईल. जुमा मशिदीत जेव्हा जेव्हा अजान दिली जाईल तेव्हा तेव्हा या ॲपच्या माध्यमातून ती अजान मोबाईल वापरकर्त्याला थेट लाइव्ह ऐकता येईल. म्हणजे भोंगा/ लाऊडस्पीकरची गरजच नाही. ध्वनी प्रदुषण होण्याचा प्रश्नच नाही,” असं शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> …अन् राज ठाकरेंनी हातानेच इशारा करत वसंत मोरेंना स्वत:च्या कारमध्ये बसण्यास सांगितलं; वसंत मोरे म्हणतात, “मी हो म्हटल्यानंतर…”

पुढे शिंदे यांनी, “राज ठाकरेंनी हेच तर सांगितलं होतं.’भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे,’ हे सांगतानाच ‘आजच्या काळात तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा वापर करून धार्मिक गोंगाट कमी करता येऊ शकतो’ हे त्यांनी अनेकदा जाहीरपणे स्पष्ट केलं होतं. ‘राज ठाकरे धार्मिक द्वेष पसरवत आहेत’ या मनसे विरोधकांच्या टीकेला जुमा मशिदीचं हे ‘अल् इस्लाह’ ॲप म्हणजे सणसणीत उत्तर आहे,” असंही म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जुमा मशिदीच्या या ‘इस्लाह’चं म्हणजेच या सुधारणेचं मनसे स्वागत! जुमा मशिदीच्या विश्वस्तांचे मनःपूर्वक अभिनंदन” असंही शिंदेंनी या पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.