News Flash

हे असं कसं होतं?

एखादी गोष्ट कशी कार्य करते हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच असते.

अ‍ॅनिमल्स या विषयाखाली निसर्गातली नवलाई उघडून दाखवलेली आहे.

एखादी गोष्ट कशी कार्य करते हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच असते. मग त्या दृष्टीने आपोआपच आपला शोध सुरू होतो. म्हणजेच माहितीशी संबंधित पुस्तकांचे वाचन, जाणकार व्यक्तींशी चर्चा इत्यादी. सर्वात सोपा मार्ग म्हणजे कॉम्प्युटरवर गुगलसारख्या सर्च इंजिनवर केलेला सर्च. सर्च केल्यावर आपल्याला लाखोंच्या संख्येने रिझल्ट्स मिळतात; परंतु आपल्याला हवी असलेली माहिती सविस्तरपणे, पण अगदी सोप्या शब्दांत सांगणाऱ्या साइट्स अगदी मोजक्याच असतात.
अशा साइट्सच्या यादीतील howstuffworks.com/ या साइटचे नाव प्रामुख्याने घ्यायला हवे. या साइटवर विविध अकरा विषय आणि त्यांच्या उपविषयांची माहिती मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. लेख, विषयाशी संबंधित चित्रे, व्हिडीओ इत्यादी स्वरूपात ही माहिती आपल्याला येथे मिळवता येते.
उदाहरणादाखल, लहानथोरांना मोटारींचे अतिशय आकर्षण असते. या साइटवर ऑटो (Auto) या विषयाखाली खूप मनोरंजक माहिती उपलब्ध आहे. मोटारींबद्दलच्या मूलभूत ज्ञानापासून त्यांची विविध प्रकारची मॉडेल्स, मोटारींच्या शर्यतींविषयी माहिती, ड्रायिव्हग आणि सुरक्षितता, विविध प्रकारची इंधने व त्यांची कार्यक्षमता, मोटारींची खरेदी-विक्री यांसारख्या विषयांवर उपयुक्त माहिती आणि व्हिडीओज येथे दिसतील.
अ‍ॅनिमल्स या विषयाखाली निसर्गातली नवलाई उघडून दाखवलेली आहे. पाळीव प्राणी या विभागात विविध प्रकारच्या पाळीव प्राण्यांचे संगोपन, ते प्राणी एकमेकांशी कसा संवाद साधतात, त्यांना बरोबर घेऊन प्रवास करताना घ्यायची काळजी यांसारखी माहिती मिळेल. वन्यप्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल तसेच जे प्राणी काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्याविषयी वाचायला मिळेल. त्याचबरोबर घोडा आणि झेब्रा हे दोन्ही प्राणी एकाच कुळातील असूनही आपण घोडय़ावरून प्रवास करू शकतो; परंतु झेब्य्रावरून नाही, असे का? यांसारख्या गमतीदार विषयांवरील माहिती देणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत.
विज्ञान या विषयाखाली पर्यावरण, अवकाश, मिलिटरी, भौतिक विज्ञान आणि त्यांच्यातील नवनवीन शोधांची माहिती यांसारखे नेहमीचे विषय आहेतच. याशिवाय विज्ञान आणि श्रद्धा/अंधश्रद्धा यावर एक उपविभाग आहे. थोर शास्त्रज्ञ आइनस्टाइनच्या मृत्यूनंतर त्यांच्या मेंदूचे वैद्यकीय विश्लेषण केले गेले. ‘आइनस्टाइनचा मेंदू कसा कार्य करत असे’ या लेखात या संदर्भातील माहिती वाचायला मिळेल.
अशा विविध माहितींचा खजिना वरील साइटवर लोकांना खुला करून दिलेला आहे. या खजिन्यात सतत नव्याने भर पडतेच आहे. या साइटवरही बुद्धीला चालना देणाऱ्या बहुपर्यायी प्रश्नमंजूषा आहेत आणि या प्रश्नमंजूषा लेखांप्रमाणेच माहितीपूर्ण आहेत. तुम्ही योग्य अथवा अयोग्य पर्याय जरी निवडलात तरी तुम्हाला योग्य उत्तरासहित त्याचे स्पष्टीकरण वाचायला मिळते.
सुरुवातीला विज्ञान तंत्रज्ञान विषयाला वाहिलेल्या या साइटवर आता जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी माहिती उपलब्ध आहे. ती वाचकांना आवडेल याची खात्री वाटते.

– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2015 1:47 am

Web Title: article on internet school
टॅग : Tech It
Next Stories
1 यारा ‘सिरी’, ‘सिरी’..
2 संकेतस्थळ कसे बनवू
3 विंडोजची तिशी
Just Now!
X