रेल्वे रूळ ओलांडताना पाच महिन्यांत १६ अपघात

वसई : करोनाकाळात वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वे मार्गातून चालणे व लोकलमधून पडून अपघात होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील पाच महिन्यांत मीरारोड ते वैतरणा या स्थानकादरम्यान १६ अपघाताच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

वसई रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा या दरम्यानच्या सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. या मार्गावर दरवर्षी मोठय़ा प्रमाणात अपघाताच्या घटना घडत असतात.

परंतु या वर्षी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवा ही अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी व मालवाहतूक यासाठी सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळही कमी प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट आहे.

याआधी दिवसाला सरासरी ३ ते ४ अपघात होते. यंदा टाळेबंदीत एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये १६ अपघात झाले आहेत. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जून महिन्यात सर्वाधिक नऊ अपघात झाले आहेत. त्यामध्ये आठ जणांचा बळी गेला आहे. या अपघातात जास्त करून रेल्वे रूळ ओलांडणे व रेल्वे मार्गात चालणे यामुळे हे अपघात झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

महिना           मृत्यू        जखमी

एप्रिल             १                –

मे                   १                  १

जून                ८                  १

जुलै                २                  –

ऑगस्ट            १                 १

एकूण              १३               ३

रेल्वेची वाहतूक सेवा ही सध्या कमी प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु जे अपघात आता होत आहेत ते केवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना झाले आहेत.

– यशवंत निकम , रेल्वे पोलीस निरीक्षक वसई