कल्याण डोंबिवलीतील जुन्या इमारतींना सुस्थिती प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील एकूण ३७८ धोकादायक इमारतींची यादी महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. सर्वाधिक १२२ धोकादायक इमारती डोंबिवली पूर्वेतील फ प्रभागाच्या हद्दीत आहेत. अतिधोकादायक इमारती ९१ आहेत. या इमारती कल्याण पश्चिमेतील क प्रभागाच्या हद्दीत आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्त गोविंद बोडके यांनी पालिका अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ३० वर्षांहून अधिक काळ उभ्या असलेल्या सर्व जुन्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या कामासाठी पालिका हद्दीतील ३० वर्षांहून जुन्या इमारतींचे मालक, भोगवटादार, गृहनिर्माण संस्था चालक यांना नोटिसा बजावण्याचे आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांना सांगितले.

महाराष्ट्र पालिका अधिनियमातील कलम २६५ (अ) मध्ये इमारतीच्या भोगवटा वापरण्यास परवानगी दिल्याच्या तारखेपासून किंवा इमारत बांधकामाच्या किमान ५० टक्के इतक्या क्षेत्राचा प्रत्यक्ष भोगवटा केल्याच्या तारखेपासून यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या तारखेपासून ३० वर्षांचा कालावधी समाप्त झाला असेल, अशा इमारतींचा यात समावेश असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

अशा इमारतींमधील भोगवटादारांनी संबंधित इमारत मानवी निवासासाठी राहण्यायोग्य असल्याचे बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र महापालिकेत नोंदणी असलेल्या बांधकाम अभियंत्यांकडून घ्यावे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थलांतराचे आवाहन

पालिकेने इशारा देऊनही जे इमारत मालक, भोगवटादार संरचनात्मक परीक्षण करणार नाहीत, अशा इमारतीला पावसाळ्यात काही झाल्यास त्याची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार नाही, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या धोकादायक इमारतींत पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेथील रहिवाशांनी अन्यत्र राहण्यास जावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.