एकूण रुग्णसंख्या १७ हजार ८२३ वर, ३.३४ टक्के रुग्णांचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेगणिक वाढत असतील तरी जिल्ह्य़ातील करोनावर मात करण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्य़ात १७ हजार ८२३ रुग्णांपैकी ४९ टक्के रुग्णांनी करोनावर मात केली असून जिल्ह्य़ात सध्या ४७.६६ टक्के सक्रिय करोना रुग्ण आहेत, तर, जिल्ह्य़ात ३.३४ टक्के नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला असून यातील बहुतांश रुग्ण हे ५० वर्षे वयोगटाच्या वरील आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात दररोज सरासरी ५०० ते ७०० नवे करोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी जिल्ह्य़ात करोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्य़ात बुधवार सायंकाळपर्यंत एकूण करोना रुग्णांची संख्या १७ हजार ८२३ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी ४९ टक्के म्हणजेच ८ हजार ७३३ रुग्णांनी करोनावर मात केल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे, तर एकूण रुग्णसंख्येपैकी सध्या ४७.६६ टक्के म्हणजेच ८ हजार ४९५ सक्रिय करोना रुग्ण जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी असणाऱ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर जिल्ह्य़ात आत्तापर्यंत ५९५ रुग्णांचा आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ३.३४ टक्के इतके आहे. हे मृत्यूचे प्रमाण अल्प असून या मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांश रुग्ण हे ५० वर्षांच्या पुढील वयोगटातले आहेत. जिल्ह्य़ात सक्रिय करोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याची बाब दिलासादायक असून करोना फैलाव रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याकडे प्रशासन लक्ष देत आहे.