25 February 2021

News Flash

अबोली रिक्षा योजना कागदावरच

तीन वर्षे उलटले तरी शंभरपैकी केवळ दहाच महिलांना लाभ

तीन वर्षे उलटले तरी शंभरपैकी केवळ दहाच महिलांना लाभ

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत निराधार महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याकरिता २०१७ रोजी शंभर ‘अबोली’ रिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यास तीन वर्षे उलटून गेले असले तरी केवळ दहाच महिलांना या रिक्षा देण्यात आल्या आहेत. एकंदर पालिकेला या योजनेचाच विसर पडला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महिलांनी आपल्या पायावर उभे राहावे म्हणून प्रशासनाने अबोली रिक्षा योजना आणली. अबोली रंगाच्या रिक्षा या महिलांसाठीच असून महिलांनीच त्या चालवायच्या आहेत. मीरा-भाईंदर शहरात भाजप पक्षाची एकहाती सत्ता आल्यामुळे निराधार महिलांना महिला बालकल्याण विभागामार्फत १०० रिक्षा देण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला होता. या रिक्षा टप्प्याटप्प्याने  देण्याचे ठरले असून त्याकरिता महानगरपालिका अधिकारी आणि गटनेते अशी समितीची स्थापनादेखील करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या समितीची एकही बैठक झाली नाही.

त्याचप्रमाणे महिलांना देण्यात येणाऱ्या या ‘अबोली योजने’करिता पालिकेकडे पुरेसे आर्थिक भांडवलच उपलब्ध नसल्यामुळे योजना रद्द करण्यात येत असल्याची माहिती सूत्रानुसार मिळाली आहे.

२०१७ रोजी ‘अबोली’ योजनेअंतर्गत महिलांना रिक्षा देण्याकरिता पालिकेमार्फत भाईंदर पश्चिम येथील मॅक्सस मॉल परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दहा महिलांना रिक्षा देण्यात आल्या असून वर्षभरात शंभरहून अधिक महिलांना रिक्षा देण्या च्या घोषणा करण्यात आल्या होत्या.

‘अबोली’च्या आशेवर पालिकेच्या चकरा

टाळेबंदीनंतर हातावर पोट असलेल्या कुटुंबीयांवर मोठय़ा प्रमाणात आर्थिक संकट आले. त्यामुळे अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख असलेल्या महिला मिळेल ते काम करण्यास धडपड करत आहेत. त्यामुळे पुरुषांप्रमाणे रिक्षा चालवून उपजीविका भागविण्याकरिता अनेक महिला ‘अबोली’ रिक्षाच्या आशेवर पालिकेच्या चकरा मारत आहे. परंतु योजनेत केवळ शंभरपैकी दहाच महिलांना रिक्षा देऊन प्रकल्प गुंडाळण्यात आला असल्यामुळे महिलांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात अधिक माहिती घेण्यात येत असून संबंधित विभागाला अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.

– संभाजी वाघमारे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका

पालिकेमार्फत रिक्षा देण्यात येणार आहेत. परंतु प्रशासनाकडून ठरवण्यात आलेल्या अटीशर्तीत येणाऱ्या महिला पात्र ठरत नसल्यामुळे रिक्षा देणे अशक्य ठरत आहे.

– ज्योत्स्ना हसनाळे, महापौर, मीरा-भाईंदर महानगरपालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 1:42 am

Web Title: aboli rickshaw scheme on paper in mira bhayandar zws 70
Next Stories
1 ऑनलाइनला टक्कर देण्यासाठी व्यापारी सरसावले
2 पाच खासगी रुग्णालये ‘कोविडमुक्त’
3 महिलेची लूट
Just Now!
X