*जेवणाची सोय मात्र नाही

*लोकसत्ता ठाणे’च्या वृत्ताची दखल

अंबरनाथमधील चार वर्षांपासून रखडलेले आयटीआय वसतिगृह अखेर विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. अंबरनाथसह उल्हासनगर, ठाणे, भिवंडी, भायखळा येथील २२ विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घेतला आहे. अपुऱ्या विद्यार्थी संख्येमुळे जेवणाची सोय मात्र या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होऊ शकलेली नाही. या वसतिगृहात जेवणासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था आहे, मात्र कॅटर्सची उपलब्धता होऊ शकली नसल्याने जेवणाची सोय उपलब्ध नाही.

अंबरनाथ पश्चिमेकडील आयटीआयमधील वसतिगृहाचे काम मागील चार वर्षांपासून रखडले होते. काही महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण झाले. या ठिकाणी अधीक्षकाचे पद रिक्त होते. तसेच विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंग नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले नव्हते. याबाबत काही दिवसांपूर्वीच ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. अखेर अधीक्षकाचे रिक्त पद भरण्यात आले व पलंगांची व्यवस्था करण्यात आल्यानंतर हे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. वसतिगृहाची निवास व्यवस्था ३०० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची आहे. तीन मजल्यांपैकी प्रत्येक मजल्यावर २० खोल्या आहेत. वसतिगृह सुरू झाल्यापासून अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज येणे सुरू झाले आहेत. मात्र, वसतिगृह वेळेत सुरू झाले नसल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी नाइलाजाने तीन ते चार हजार भाडे भरून इतरत्र राहात आहेत.

कॅटर्सचा नकार

विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे सभागृह बांधून तयार झाले असले तरी सध्या विद्यार्थी संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर अथवा वसतिगृहातच स्वतचे जेवण बनवावे लागत आहे. कारण, कमी संख्या असल्याने कॅटर्स येण्यास तयार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. विद्यार्थी संख्या वाढल्यावर कॅटर्स तयार होतील असे आयटीआय व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.