घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच इमारतींच्या वसाहतींमधून नवे ठाणे वसले आहे. ठाण्यातील हे नवे नगर मुंबईच्या वेशीवर आहे. गेल्या २० वर्षांत या परिसराचा झपाटय़ाने विकास झाला. पूर्वी किफायतशीर किंमत हे येथे घर घेण्याचे मुख्य कारण होते. त्यापैकी अनेकांनी गुंतवणूक म्हणून घरे घेतली. त्यामुळे या भागात भाडय़ाने राहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. असे म्हणतात की घोडबंदर परिसरातील सुमारे ३० टक्के रहिवासी भाडय़ाने राहत आहेत. ऋतू एनक्लेव या भव्य संकुलातही काहीशी तशी परिस्थिती होती, मात्र कालांतराने येथे रमलेले काही भाडेकरू आता घरांचे मालकही झाले आहेत..

भव्य अशा घोडबंदर रस्त्याने सूरज वॉटर पार्कच्या पुढे बोरिवलीच्या दिशेने जाताना डावीकडे नजरेच्या टप्प्यात ऋतू एनक्लेव हे भव्य संकुल येते. १९८५ पूर्वी हा परिसर औद्योगिक क्षेत्रात मोडत होता. पारसी आणि मुस्लीम मालक असलेल्या २१ एकर जागेत चिकू आणि आंब्याची बागायत होती. हरिसिद्धी प्रॉपर्टीचे मुकुंद पटेल यांनी ही जागा विकसित करण्यासाठी घेतली. २० ते २५ वर्षांपूर्वी हा परिसर निर्जन होता. अरुंद रस्ता, एस.टी. हे एकमेव वाहतुकीचे साधन असलेल्या या जंगलसदृश परिसरात राहणे अगदी धाडसाचे होते, असे असतानाही बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामाची कुदळ येथे मारली.

ऋतू एनक्लेवचे बांधकाम ज्या वेळी सुरू झाले, त्या वेळी काम करण्यासाठी कंत्राटदार मिळत नव्हते. परिसर ठाणे, मुंबईपासून खूप दूर अंतरावर असल्याने तसेच काहीच सुविधा नसल्याने कंत्राटदार, कामगार येण्यास येथे तयार नव्हते. त्यावर उपाय म्हणून बांधकाम व्यावसायिकाने संकुलातील एक इमारत खास कंत्राटदारांसाठीच तयार केली. त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली आणि गरजेपुरत्या सुविधाही बांधकाम व्यावसायिकाने दिल्याने हे कंत्राटदार येथेच राहू लागले. त्यामुळे संकुलाचे काम मार्गी लागले.

ऋतू एनक्लेव संकुल २१ एकर जागेत वसलेले आहे. १९९९ मध्ये रहिवाशांना सदनिकांचा ताबा मिळाला. २००३ मध्ये संकुलाचे काम पूर्णत्वास आले. साधारण ६५ टक्के मराठी समाज येथे राहतो. तब्बल ३० इमारती या सात मजल्याच्या असून प्रत्येकाला लिफ्ट आहे. या इमारती ११ सोसायटय़ांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा स्वतंत्र कारभार आहे. या सोसायटींची एक फेडरेशन तयार करण्यात आली आहे. त्या फेडरेशनअंतर्गत सोसायटय़ांचे कामकाज सुरू असते. फेडरेशनच्या अध्यक्षा अस्मिता भावे आणि सचिव वल्लभदास मालवणकर आणि त्यांचे सहकारी सदस्य यांच्या हाती संकुलाची जबाबदारी आहे. संकुलात दोन बंगले आहेत. ११ दुकाने, झाडाफुलांनी बहरलेले भव्य उद्यान, चिन्मय मिशन संस्थेचे केंद्र, वाहनतळ, श्रीकृष्ण आणि श्रीशंकराचे मंदिर, गॅस पाइपलाइन आहे. सीसीटीव्ही आता प्रत्येक सोसायटीने लावायला घेतले आहे. पर्जन्य जलसंधारण प्रकल्पही लवकरच राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वातानुकूलित यंत्रणेतून निघणारे पाणी एकाच ठिकाणी जमा व्हावे व ते पाणी वाहने धुण्यासाठी उपयोगात आणावे यासाठीही फेडरेशनचे प्रयत्न सुरू आहेत. दिवसभरात तीन तास पाणीपुरवठा होतो, तो मुबलक असतो. उलट काही प्रमाणात त्याचा अपव्यय होत असल्याने तो होऊ नये यासाठी प्रबोधनाची आवश्यकता असल्याची सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाणीव आहे. सुका आणि ओला कचरा वेगळा करणे, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून ते खत झाडांना वापरणे शक्य होईल. त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कूपनलिकेचे पाणी हे शौचालय तसेच झाडांसाठी वापरले जाते. प्रत्येक सोसायटीला दोन सुरक्षारक्षक आहेत. संकुलासाठी बांधकाम व्यावसायिकाने बससेवा दिली होती. सोसायटी झाल्यानंतर ती परवडणे कठीण झाल्याने ती सेवा बंद पडली आहे. सदनिकांचा ताबा घेतल्यानंतर काही वर्षांतच घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने वाहतूक व्यवस्थाही वाढली आहे. एसटीसह मुंबई, ठाणे, वसई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवा तसेच खासगी बस सेवा सातत्याने सुरू आहे. त्याचा लाभ येथील रहिवाशांना होतो. तसेच बहुतेकांचे स्वत:चे वाहन असल्याने प्रवासाची अडचण काही भासत नाही. डी मार्ट शेजारीच असल्याने तसेच काही दुकाने ही संकुलातच असल्याने गरजेच्या वस्तूंची पूर्तता चुटकीसरशी होत असते. कलमी आंब्यांची झाडे भरपूर प्रमाणात आहेत. काही ठिकाणी चिकू आणि चिंच, नारळाची झाडेही दिसतात. त्याचा आस्वाद रहिवासी घेत असतात. गुलमोहरासारखी सावली देणारी झाडे रहिवाशांचे उन्हापासून रक्षण करतात. कासारवडवली पोलीस ठाणे वसाहतीच्या शेजारीच आहे, अशी माहिती फेडरेशनचे सचिव मालवणकर यांनी दिली.

बगळे, मच्छर आणि भटकी कुत्री

घोडबंदर रस्ता हा काही वर्षांपूर्वी जंगलसदृश भाग होता. समुद्राची खाडीही जवळूनच गेल्याने बगळ्यांचे प्रमाण येथे मोठय़ा प्रमाणावर होते. विकासात अडथळा आणणारी घनदाट वृक्षे हळूहळू छाटली गेली आणि परिसर सीमेंट काँक्रीटच्या जंगलांनी वेढला गेला. परिणामी, या बगळ्यांची वसतिस्थाने नष्ट झाली. ऋतू एनक्लेव संकुलात वृक्षांची ही ठेव अजूनही असल्याने या बगळ्यांनी आता येथे बस्तान मांडले आहे. सकाळच्या वेळेत हे बगळे अन्नाच्या शोधात बाहेर गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास येथे पुन्हा फिरकतात. त्या वेळी ते त्यांच्या कर्णकर्कश सामूहिक आवाजाने संकुलातील शांतता भंग करतात. गुलमोहराच्या झाडांवर बगळ्यांचे थवेच्या थवे दिसतात. या झाडांखाली कोणाचे वाहन जर उभे असेल तर या बगळ्यांच्या विष्टेने ते अक्षरश: न्हाऊन निघते.

याबाबत झाडांच्या फांद्या वरच्या बाजूने छाटल्या गेल्यास हा त्रास थोडा कमी होऊ शकतो, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यासाठी महापालिकेकडे तक्रारही केली आहे. परंतु महापालिकेने केवळ इमारतीवर आलेल्या फांद्यांची छाटणी करून होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संकुलात प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील असलेला हा कल्लोळ दोन वर्षांपासून रहिवासी सहन करीत आहेत. बगळ्यांसह भटकी कुत्री आणि मच्छरांचा त्रासही रहिवासी सहन करीत आहेत. नीट स्वच्छता न होणाऱ्या शेजारील गटारामुळे मच्छरांची पैदास झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने रहिवासी हैराण आहेत.

मैदान, वाहनतळ अपुरे

संकुलात भले मोठे उद्यान आहे. या उद्यानात ज्येष्ठांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आहे. या उद्यानात खेळासाठी सीमेंट काँक्रीटचे छोटे मैदान करण्यात आले आहे. ८०० सदनिका असलेल्या या संकुलासाठी ते अपुरे पडत आहेत. या मैदानावर व्हॉलीबॉल, क्रिकेटसारखे खेळ खेळणारी मुले, तरुण यांच्या हल्ल्यागुल्ल्याचा त्रास या उद्यानात विरंगुळासाठी बसणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना होतो. वाहनतळाचा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे. वसाहत मध्यमवर्गीयांची असली तरी आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर काहींनी एकापेक्षा अधिक वाहने घेतली आहे. त्यामुळे वाहन उभे करण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. ते उभे करताना काहींची होणारी अरेरावी फेडरेशनला नाकीनऊ करीत आहे. विद्युत विभागाला त्यांच्या ट्रान्सफार्मरसाठी संकुलातील जागा देण्यात आली आहे, परंतु त्या जागेत वीज मंडळाचे भंगार जमा होताना दिसते. ते भंगार वेळेच्या वेळी साफ करण्याचे सांगूनही वीजमंडळ त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव सोसायटीला ते काम करणे भाग पडत आहे.

उत्पन्नासाठी नवी क्लृप्ती

संकुलात घराचे मूळ मालक कमी राहतात. त्यांनी भाडय़ाने घरे दिली आहेत. त्यातच महिना देखभाल दुरुस्तीचा खर्च सर्वानाच परवडत नसल्याने त्यावर उपाय म्हणून फेडरेशनने नवीन क्लृप्ती काढली आहे. संकुल रस्त्यालाच लागून आहेच, तसेच संकुलात ८०० सदनिका असल्याने व प्रत्येक घरातील चार ते पाच कुटुंब सदस्य पाहता ही संख्या चार हजारच्या आसपास जाते. त्यामुळे ग्राहकही मोठय़ा प्रमाणात मिळू शकतो. या दृष्टिकोनातून काही कंपन्यांना त्यांच्या उत्पादन, सेवेच्या मार्केटिंगसाठी, तर काहींना भाजी विक्रीसाठी जागा देऊन त्यांच्याकडून भाडे आकारणी केली जाते. इमारत देखभाल दुरुस्तीच्या खर्चाला हातभार म्हणून हे उत्पन्न उपयोगात आणले जाते.

बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम इतके मजबूत आहे की, शेवटच्या मजल्यावर बहुतेक ठिकाणी जाणवणारी गळतीची समस्या येथे बिलकूल जाणवत नाही.  केवळ १८ टक्के लोडिंग ठेवून हे बांधकाम केल्याने रहिवाशांना चटईक्षेत्रही मोठय़ा प्रमाणात मिळाले आहे. त्याचे समाधान रहिवासी व्यक्त करतात. व्यावसायिकाने चिन्मय मिशन या संस्थेला काही जागा दान म्हणून दिली आहे. त्या जागेत संस्थेने भव्य सभागृह उभारले आहे. त्यांच्यातर्फे गीता ज्ञानयज्ञसारखे उपक्रम येथे चालविले जातात. त्यांनी त्यासाठी श्रीकृष्ण मूर्तीचीही प्रतिष्ठापना केली आहे. सभागृह छोटय़ा स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी भाडय़ाने दिले जाते. ते भाडे समाजकार्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे येथे शिशुवर्गासाठी शाळाही आहे. काही जागा ही रस्ता रुंदीकरणात गेली आहे. तर काही महावितरण विभागाला, तसेच महापालिकेच्या आरोग्य केंद्राला देण्यात आली आहे. संकुलाला अद्याप क्लब हाऊस नाही. ही गरज पाहता बांधकाम व्यावसायिकाचे येथे असलेल्या गोडाऊनची जागा सोसायटीला हस्तांतरित केली आहे. त्याचे क्लब हाऊसमध्ये रूपांतर करण्याचे विचाराधीन आहे.

कार्यक्रमांचा जल्लोष

वसाहतीतले रहिवासी ‘जल्लोष’ हा वार्षिक कार्यक्रम साजरा करतात. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विविध स्पर्धा, संकुलातील रहिवाशांचे स्टॉल आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. पाच दिवसांचा गणेशोत्सव असतो. या पाच दिवसांतही रंगारंग कार्यक्रम होत असतात. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिनासह नवरात्रोत्सव आदी विविध कार्यक्रमांत रहिवासी उत्साहाने सहभागी होत असतात.

हरितपट्टा

संकुलात प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हिरवळ दिसून येते. या हरितपट्टय़ात आंबा, चिकू, नारळ आदींसह विविध फुलांची झाडे आहेत. या झाडाफुलांनी संकुल वेढले गेले आहे. ते अधिक सुशोभित करण्याचे फेडरेशनच्या विचाराधीन आहे. त्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. प्रवेशद्वारावर ज्येष्ठांसाठी आणि बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी आसनव्यवस्था असल्याने तेथे सभोवतालचे वातावरण पाहत मनमोकळ्या गप्पा मारता येतात.

suhas.dhuri@expressindia.com