चिंता बारमारलकांच्या पोटाची आणि मद्यपींची!

कुठल्याही निवडणुकीच्या काळात मद्यविक्रीस मनाई करून ‘ड्राय डे’ घोषित केला जातो. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये हा त्यामागे हेतू असतो. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेल्या ‘ड्राय डे’ला बहुजन विकास आघाडीच्या नेत्याने जोरदार विरोध केला असून हा निर्णय अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे बारमालक उपाशी असून कामगार देशोधडीला लागल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीसाठी पाच दिवसांचा ड्राय डे पालघर आणि ठाणे जिल्हय़ात लागू करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नरेंद्र पाटील यांनी मात्र त्याला विरोध केला आहे. हा निर्णय दोन्ही जिल्हय़ांतील मद्यपींवर अन्याय करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अजब तर्काचा युक्तिवाद करताना ते म्हणाले की, दोन्ही जिल्ह्य़ांत मिळून केवळ एकच जागा आहे. केवळ १ हजार ६० मतदार आहेत, त्यात ५० टक्के महिला आहेत. म्हणजे पाचशे मतदार आहेत. त्यातील निम्मे मद्यपान न करणारे आहेत. म्हणजे केवळ अडीचशे मतदार मद्यपान करणारे आहेत, तरीही हा ड्राय डे लागू करणे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले. यामुळे बारमालक उपाशी राहत असून बारमध्ये काम करणारे कामगार देशोधडीला लागले असल्याचा अजब दावा त्यांनी केला. ‘‘मी पुण्यातून आलो आणि बारमध्ये गेलो, तेव्हा ‘ड्राय डे’ असल्याचे समजले. मद्य नसल्याने मी बेचैन झालो’’ असेही ते म्हणाले. मी हजार रुपये भरून आजीवन मद्य परवाना घेतलेला आहे. हा निर्णय अशा परवानाधारक मद्यपींवर अन्याय करणारा असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. शासनाने याचा विचार करून उठसूट ‘ड्राय डे’ घोषित करू नये, अशीही मागणी त्यांनी केली.