बाळाचा जन्म हा मातेसाठी तसेच कुटुंबियांसाठी अतिशय आनंदाचा क्षण असतो. बाळ सुखरुप जन्मल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो. पण जन्माच्या वेळी काही गोष्टी हा जीव धोक्यात टाकण्यास कारणीभूत ठरु शकतात. उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर एक दोन नाही तर तब्बल ४० दिवसांनंतर ते बाळ कोमातून बाहेर आले आहे. योगिता हिरवा या २८ नोव्हेंबर रोजी बाळंत झाल्या. त्यांचे मूल जन्मत:च कोमात गेले. त्याच्यावर मागील ४० दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. जान्हवी भोसले आणि डॉ. रविंद्र रोकडे हे दोघेही त्याच्यावर उपचार करत होते. या उपचारांसाठी आवश्यक असणारी औषधेही स्वत: डॉक्टरांनी आपल्या खर्चाने आणली.

आईच्या गर्भात असताना बाळाने पोटातच विष्ठा केली. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास झाला. त्यामुळे हे बाळ कोमात गेले. इतक्या दिवसांच्या डॉक्टरांच्या मेहनतीला अखेर यश आले आणि हे बाळ ४० दिवसांनंतर सामान्य बाळाप्रमाणे दूध पिऊ लागले. आपल्या मेहनतीला फळ आल्याने बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही अश्रू अनावर झाले. आपल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय कष्टाने या बाळाचा जीव मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने या संपूर्ण टीमचे आभार रुग्णालयाचे डीन सुधाकर शिंदे यांनी मानले. ही घटना म्हणजे एकप्रकारे जादूप्रमाणेच आहे असे मत या बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले.