शांतता समितीच्या बैठका; समाजमाध्यमांवरील मजकुरावर नजर
राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद जमीन वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या आठवडय़ाभरात निकाल येण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सतर्क झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून समाजमाध्यमांवरील वादग्रस्त संदेशामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आता व्हॉटसअॅप ग्रुपवरील संदेशांवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. तर भिवंडीत सर्व धर्मीयांच्या बैठका घेऊन त्यांना धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याशिवाय हिंदू आणि मुस्लीम धर्मातील प्रमुख नेत्यांकडून शांततेचे आवाहन करणाऱ्या चित्रफिती मोबाइलवर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई येत्या काही दिवसांत निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीआधी राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद जमीन वादाचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या निकालानंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस सर्तक झाले आहेत. ठाणे दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द केल्या आहेत. जे सुट्टीवर गेले आहेत, त्या सर्वाना हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहेत.
भिवंडी आणि मुंब्रा या शहरातील संवेदनशील परिसरात पोलिसांनी शांतता समितीच्या माध्यमातून बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकांमध्ये पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला नागरिकांना जातीय सलोखा राखण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच स्थानिक पोलीस चौक सभा घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नये आणि धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहेत. याशिवाय हिंदू आणि मुस्लीम धर्मातील प्रमुख नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शांततेचे आवाहन करणाऱ्या चित्रफिती पोलिसांनी तयार केल्या असून त्या समाजमाध्यमाद्वारे प्रासारित केल्या जात आहेत. अनेकदा समाजमाध्यमांवर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित होतात आणि त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता व्हॉट्सअॅप ग्रुपवरील संदेशांवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच यापूर्वी झालेल्या दंगलीत सहभागी असलेल्या समाजकंटकांची यादीही पोलिसांनी तयार केली असून त्यांच्याकडून कोणताही गैरप्रकार होणार नसल्याचे लेखी हमीपत्र पोलिसांनी घेतले आहे.
पोलीस व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये
समाजमाध्यमांवर चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह संदेश पसरविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी पोलिसांनी विविध व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये प्रवेश मिळविल्याचे समजते. दरम्यान, एखादा आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर संदेश आढळल्यास त्या व्यक्तीचा मोबाइल फोन जप्त करून त्याच्याविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.