X

गृहसंकुलांत विसर्जन करून कोंडी, प्रदूषणाला फाटा

ठाणे, कल्याण, बदलापूर येथील अनेक नागरिकांनी यंदा गृहसंकुलाच्या आवारातच कृत्रिम तलाव तयार करून एकत्रित विसर्जनाचा पर्याय स्वीकारला.

कृत्रिम तलावांत पर्यावरणपूरक विसर्जनाकडे नागरिकांचा कल

गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकांत एकीकडे ध्वनिप्रदूषण होत असले तरी दुसरीकडे शहरातील काही गृहसंकुलांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देत घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. ठाणे, कल्याण, बदलापूर येथील अनेक नागरिकांनी यंदा गृहसंकुलाच्या आवारातच कृत्रिम तलाव तयार करून एकत्रित विसर्जनाचा पर्याय स्वीकारला. काही गृहसंकुलांनी आपल्या अनेक वर्षांपासूनच्या सामूहिक मिरवणुका रद्द केल्या. त्यामुळे यंदा विसर्जनाच्या दिवशी वाहतूक सुरळीत राहिल्याचा दावाही ठाणे वाहतूक पोलिसांनी केला.

गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जन मिरवणुकांदरम्यान वाहतूक कोंडी होत असे. शहराच्या अंतर्गत भागातून मुख्य रस्त्याकडील तलावांच्या दिशेने यायचे असल्यास वाहतूक कोंडीतच खूप वेळ जात असे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने विसर्जनघाटांवरच कृत्रिम तलाव तयार केले असून त्यात मूर्ती विसर्जित केल्या जात आहेत, मात्र त्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागतात. गर्दी, वाहतूक कोंडी, ध्वनी व वायुप्रदूषण आणि रांगा टाळण्यासाठी गृहसंकुलांतच विसर्जन करण्यास अनेकांनी प्राधान्य दिले.

ठाण्यातील सावरकर नगर भागातील जय भारती गृहसंकुल, शिवाजीनगर येथील रतनबाई कंपाऊंड तसेच कोलशेत येथील एव्हरेस्ट वर्ल्ड या गृहसंकुलांनी यंदा संकुलांमध्येच पर्यापरणपूरक विसर्जन केले. दीड व पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन अशा प्रकारे झाल्याने शहारातील रस्त्यांवर दर वर्षीपेक्षा कमी वाहतूक कोंडी झाल्याचे नागरिक तसेच वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे वाहतूक पोलीस विभागातर्फे गणेशोत्सवाआधीच घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत जनजागृती करण्यात आली होती. त्याचा परिणाम दीड दिवस आणि पाच दिवसांच्या विसर्जनादरम्यान दिसला. दर वर्षीपेक्षा यंदा वाहतूक कोंडी कमी होती. अनधिकृत वाहनांवरदेखील वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली. नागरिक आता घरच्या घरी गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करत आहेत हा एक चांगला पायंडा पडत आहे.

– अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे पोलीस वाहतूक विभाग

अंबरनाथ, बदलापूर

बदलापुरात अनेक रहिवाशांनी आवारातच गणेशमूर्ती विसर्जित केल्या. काही लोकप्रतिनिधींनीही आपापल्या प्रभागात कृत्रिम तलाव तयार केले आहेत. उल्हास नदीपात्रापर्यंत जाणाऱ्या अडीचशे गणेशभक्तांनी कृत्रिम तलावाचा पर्याय निवडला. पाचव्या दिवशी ४११ मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्यात आले. तीन कृत्रिम तलावांत दीड हजारांहून अधिक मूर्ती विसर्जित केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. अंबरनाथमध्ये पालिकेने पाच कृत्रिम तलाव तयार केले आहेत. त्यात अडीच हजार गणेशमूर्तीचे विसर्जन केले.

कल्याण-डोंबिवली

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीत गणेशवाडी भागातील बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. याच भागात एक कृत्रिम हौद उभारण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली. डोंबिवलीतील अनेक कुटुंबांनी घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन केले. अनेक गृहसंकुलामधील रहिवाशांनी शाडूची मूर्ती आणून तिचे कृत्रिम तलावात विसर्जन केले, असे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करणारे संदीप बोडके यांनी सांगितले.

गृहसंकुलात गणेशमूर्ती विसर्जनाचे हे पहिलेच वर्ष होते. गणशोत्सवाआधीच जनजागृती केली. अनेकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. पुढच्या वर्षीही अधीपासूनच पर्यावरणपूरक विसर्जनाविषयी जनजागृती करणार आहोत.

– शैलेश कारेकर, पर्यावरण संरक्षण सार्वजनिक विसर्जन समिती, ठाणे