कै. भास्करराव बखले यांच्या स्मरणार्थ कै. काकासाहेब बर्वे यांनी आपल्या सहकाऱ्यासह १९२६ साली स्थापन केलेली कल्याण गायन समाजासारखी नामवंत संस्था कल्याण शहरात आहे, ही समस्त कल्याणकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
गेली ८९ वर्षे गायन, वादन, नृत्य इ. सर्व संगीत प्रकारांमध्ये या संस्थेचे कार्य अविरत सुरू आहे. गायन समाजात आपली कला सादर करण्यात अखिल भारतीय कीर्तीचे कलाकार धन्यता मानतात.
गायन समाजाच्या दिनकर संगीत विद्यालयात महिन्यातून एका शनिवारी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांमध्ये जलसा साजरा केला जात असे. शाळकरी वयात असताना अनेक वेळा या जलशाचा आनंद घेतलेला आहे. त्यानंतर पुढे नामवंत कलाकारांच्या गाण्याच्या मैफिलींचा आस्वाद नेने-रानडे सभागृहात घेतल्याचे आठवते. पं. राम मराठे, माणिक वर्मा, सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू, बेगम परवीन सुलताना इ. कितीतरी नामवंत कलाकारांना ऐकावयाची संधी मिळाली. पं. प्रभाकर कारेकर, आशा खाडिलकर, नीलाक्षी जुवेकर इ. कलाकारांची नाटय़ संगीताची मैफिल तसेच सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या हे कार्यक्रम विशेष स्मरणात राहणारे झाले.
असे म्हणतात की, कोणत्याही संस्थेच्या कामकाजाबाबत संकटे निर्माण झाली की, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा कस लागतो. कल्याण गायन समाजावरदेखील काही हितशत्रूंनी निर्माण केलेली संकटे उद्भवली, परंतु संस्था या सर्व संकटांमधून तावूनसुलाखून निघाली. गायन समाजाची इमारत आता भव्यदिव्य स्वरूपात उभी आहे. परंतु जुन्या वास्तूच्या जागी नवी वास्तू उभी करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सोडल्यापासून नवीन अद्ययावत वास्तू उभी राहेपर्यंतच्या काळात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अनेक अग्निदिव्यांना तोंड द्यावे लागले. मात्र गायन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व कालावधीत अतिशय सकारात्मक भूमिकेचा अवलंब करून आपले कार्य सुरू ठेवले.
प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी गीतासार पुढील थोडय़ा शब्दामध्ये सांगितले आहे.
केल्याशिवाय मिळत नाही,
केलेले फुकट जात नाही.
काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे.
काम करीत जा, हाक मारीत जा,
मदत तयार आहे,
विश्वास घालवणार नाही.
गीतेतल्या याच तत्त्वज्ञानाचा अंगीकार गायन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्यांचे फळ म्हणूनच त्यांनी केलेल्या श्रमाचे सार्थक झाले.
गायन, वादन क्षेत्रात वर्षभर चालत असलेल्या उपक्रमांबरोबरच देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन या संस्थेतर्फे गेल्या १४ वर्षांपासून केले जाते. देवगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलावंतांच्या कलेचा लाभ नामवंत कलाकारांचे कार्यक्रम केवळ मुंबई पुण्यातल्या रसिकांनाच अनुभवायला मिळतात हा समज देवगंधर्व महोत्सवाने खोटा करून दाखविला आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात ३ दिवस साजऱ्या होणाऱ्या देवगंधर्व महोत्सवाच्या वेळी कल्याणमधील वातावरण संगीतमय होऊन जाते.
गायन वादनाच्या निमित्ताने अनेक कलाकार कल्याण गायन समाजाच्या सभागृहात येत असतातच, परंतु महोत्सवाच्या आयोजनामुळे संगीत क्षेत्रातल्या अनेक नामवंतांच्या कलेचा आस्वाद रसिकांना घेता येतो. या वर्षीचा १४ वा देवगंधर्व महोत्सव दि. ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत संपन्न झाला. या वर्षीच्या महोत्सवात श्रीमती कलापिनी कोमकली, संगीत मरतड पं. जसराज यांचे गायन, डॉ. एन. राजम, संगीता शंकर व रागिणी शंकर यांचे व्हायोलिन वादन, पद्मश्री शाहिद परवेझ यांचे सतार वादन असे कार्यक्रम रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत सादर झाले. एखाद्या महोत्सवाचे आयोजन आणि नियोजन ही एक मोठी जबाबदारी असते. परंतु कल्याण गायन समाजाच्या कार्यकर्त्यांनी १४ वर्षे सातत्याने नामवंत कलाकारांचे आदरातिथ्य सुयोग्यरीत्या सांभाळून असंख्य दिग्गज कलाकारांच्या कलाविष्काराचा लाभ प्रेक्षकांना मिळवून दिला. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु’ या उपक्रमातदेखील त्यांना सामील होता आले.
कल्याण हे संस्थांचे गाव म्हणून ओळखले जाते. संगीत क्षेत्रात अविरत करत असलेल्या कार्यामुळे कल्याण गायन समाजाचे कल्याण व परिसराच्या सांस्कृतिक जीवनात एक वैभवशाली परंपरा निर्माण करून या परंपरेचे जतन केले जात आहे.

अ‍ॅड. सुरेश पटवर्धन