नालासोपाऱ्यात संतप्त प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरल्याने गोंधळ उडाल्याचं चित्र पहायला मिळालं. लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालयं सुरु झाली आहेत. लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी, लोक एसटीने मुंबईपर्यंत प्रवास करत आहेत. पण सकाळी एसटी सेवा आणि एसटी स्टँड बंद असल्या कारणाने प्रवासी संतापले. यावेळी प्रवाशांनी थेट नालासोपारा रेल्वे स्टेशन गाठलं आणि ट्रॅकवर उतरले. यावेळी प्रवाशांनी आम्हाला लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी केली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.

लॉकडाउनच्या पाचव्या सत्रात मुंबईतील खासगी आस्थापने सुरु झाले आहेत. त्यात वसई-विरार मधील हजारो नागरिक कामावर जात आहेत. रेल्वे सेवा बंद असल्याने त्यांना प्रवासाठी एसटी महामंडळाच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे. पण मंगळवारी सकाळी नालासोपारा बस आगारातील सेवा अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाणारे चाकरमानी अचानक बंद झालेल्या बस सेवेने संतप्त झाले आणि त्यांनी बस आगारात ठिय्या आंदोलन केले. एसटी सेवा सुरु करा अशी मागणी करू लागले. यावेळी काही बस सुरु करण्यात आल्या होत्या. पण अपुऱ्या बस असल्याने संतप्त प्रवाशांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकाकडे वळवला आणि रेल्वे रोको केले.

यावेळी जमावाचा उद्रेक झाला होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी का? आम्हाला पण परवानगी द्या अशा मागण्या करत प्रवाशांनी एक तासाहून अधिक काळ रेल्वे सेवा ठप्प केली होती. शेवटी संतप्त जमावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी बळाचा वापर करत जमावावर नियंत्रण मिळवले. यानंतरही जमावाने पुन्हा एस टी आगारात पुन्हा निदर्शने केली. बस सेवा वाढवली जाईल असे आश्वासन मिळाल्यानंतर गर्दी कमी झाली.

एसटी महामंडळाची भूमिका
आज सकाळी नालासोपारा बस स्थानकावर अचानक तीन ते चार हजार प्रवाशांनी गर्दी केली. येथून दररोज सकाळी अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या व इतर कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेस सोडल्या जातात. (नालासोपारा, वसई विरार या भागातून दररोज सुमारे 300 बसफेऱ्या केल्या जातात.) अचानक गर्दी केलेल्या प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी हे मुंबईला त्यांच्या खासगी कार्यालयात कामासाठी जाणारे होते. त्या प्रवाशांनी अत्यावश्यक सेवेसाठी सोडल्या जाणाऱ्या बसमधून आम्हाला देखील प्रवास करण्याची परवानगी द्या अशी आग्रही मागणी केली. या प्रवाशांना सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करित, इथे लगेच बसेस उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे स्थानिक एसटी प्रशासनाने सांगितले. तरीदेखील संतप्त प्रवासी ऐकायला तयार नव्हते. पोलिसांनी हस्तक्षेप करून देखील संबंधित प्रवाशांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळता बसस्थानकावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक एसटी प्रशासनाने सुरक्षेची बाब म्हणून पोलिसांच्या सुचनेनुसार बसस्थानक तातडीने बंद केले होते, त्यानंतर लगेच सकाळी १०:३० वाजता बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या . भविष्यात प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जादा बस फेऱ्यां सोडण्यात येत आहेत.

लॉकडाउनमुळे लोकल सेवा अद्यापही बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र यामुळे मुंबईत कामाला जाणाऱ्या अनेकांना एसटीने प्रवास करत मुंबई गाठावी लागत आहे. यामधील बरेच कर्मचारी कर्जत, डोंबिवली, कल्याण, विरार येथून प्रवास करणारे आहेत. इतक्या लांबून त्यांना एसटी किंवा खासगी वाहनाने प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही.