ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कठोर र्निबध लागू असतानाही ठाणे जिल्ह्यातील भाजी मंडयांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. खरेदीसाठी आलेल्या अनेकजणांच्या चेहऱ्यावर मुखपट्टीही नसते. अंतर नियमांचाही या ठिकाणी पूर्णपणे फज्जा उडत आहे. पोलिसांकडूनही या गर्दीवर नियंत्रण मिळविले जात नाही. बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळेचे बंधन असल्याने गर्दी होते, असे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने कठोर र्निबध लागू केले आहेत. या र्निबधांमध्ये जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू करण्यास मुभा आहे. वेळेच्या र्निबधांमुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर शहरातील भाजी मंडयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. ठाण्यातील जांभळीनाका भाजी मंडईत सातत्याने अंतरनियमांचे उल्लंघन होत असून शुक्रवारीही हे चित्र कायम होते. अनेक भाजी विक्रेत्यांनी मुखपट्टीचा वापर करत नाहीत. काही ग्राहक आणि भाजीविक्रेत्यांची मुखपट्टी हनुवटीवर असते. जीवनावश्यक वस्तू वगळता काही फेरीवाल्यांनीही बाजारपेठेत बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरामध्येही अशीच परिस्थिती आहे. कल्याण येथील कोळसेवाडी, कल्याण बाजार समिती, टिटवाळा रेल्वे स्थानक, बल्याणी, विठ्ठलवाडी, डोंबिवली भागात भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. काहीजण कुटुंबासोबत भाजी खरेदीला येत आहेत. तर बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांमध्येही बाजारपेठेत भाजी मंडईसह इतर दुकानेही छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे चित्र आहे. बदलापूर पश्चिमेच्या भाजी बाजारात तर नागरिकांची सकाळी सात वाजल्यापासूनच झुंबड उडू लागली आहे. जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. लागू करण्यात आलेल्या र्निबधांमुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत एकाचवेळी गर्दी होते. असे खरेदीसाठी आलेल्या मेघा गायकवाड यांनी सांगितले.