ठाणे, डोंबिवली आणि कल्याण शहरांत दिवाळीनिमित्त रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील राम मारुती रोड, डोंबिवलीतील फडके रोड, कल्याण येथील खडकपाडा, दुर्गाडी किल्ला परिसरांत यंदाही तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत जल्लोष केला, तर दुसरीकडे गडकरी रंगायतन येथे काही तरुण ‘आरे वाचवा’चे फलक घेऊन दाखल झाले होते. ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांना आरे जंगल वाचविण्यासंदर्भात प्रश्न विचारा’ अशी विनंती या फलकांवर करण्यात आली.

ठाण्यातील राम मारुती रस्ता, तलावपाळी; तर डोंबिवलीतील फडके रस्त्यावर सकाळी ७ वाजल्यापासून तरुण दाखल होण्यास सुरुवात झाली होती. शाळा- महाविद्यालयांतील जुन्यानव्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी ढोल-ताशांच्या गजराच्या ठेक्यावर ताल धरला. या कार्यक्रमांमुळे घंटाळी पथ, सहयोग मंदिर मार्ग परिसरात वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात आल्याने नौपाडा, गोखले मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

डोंबिवलीत संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी फडके रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या, तर डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्त्री गाथा’ या कार्यक्रमात ‘स्त्री’ या विषयावर जनजागृती करण्यासाठी नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. तसेच फडके रस्त्यावर ढोलताशांची पथके तरुणाईला थिरकवत होती. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या तरुणांची सेल्फी काढण्यासाठी स्पर्धा सुरू होती. बाजीप्रभू चौक ते अप्पा दातार चौकदरम्यान असलेला फडके रस्ता, आगरकर रस्ता, बाळासाहेब पथ, मदन ठाकरे चौक, टिळक रस्ता परिसरात मोठी गर्दी जमली होती. कल्याण येथील खडकपाडा येथील साई चौकात एका सामाजिक संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमातही तरुणांनी मोठी गर्दी केली होती.