|| सागर नरेकर

कोविड दर्जा नसलेल्या रुग्णालयांना पुरवठा करण्यास मज्जाव

ठाणे : करोना चाचणीचे उशिराने येणारे अहवाल, शासकीय रुग्णालयात खाटांची अनुपलब्धता आणि करोना चाचणीची अधिकृतता टाळून संशयित म्हणून उपचार घेण्यासाठी कोविड रुग्णालयाचा दर्जा नसलेल्या खासगी रुग्णालयांकडे वळणाऱ्या संशयित करोनाबाधितांची लवकरच रेमडेसिविर कोंडी होण्याची भीती आहे.

शासनाने नव्याने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार फक्त कोविड दर्जा असलेल्या रुग्णालयांनाच रेमडेसिविरचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे अशा दर्जा नसलेल्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर मिळणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी कोणत्याही मार्गाने रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर उपलब्ध करत होते.

आजच्या घडीला जिल्ह्यात कोविड दर्जा असलेल्या रुग्णालयांसोबतच कोविड दर्जा नसलेलेही तितकीच रुग्णालयेही सुरू आहेत. या रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या कुवतीनुसार आणि मागणीप्रमाणे उपचार केले जातात. दर्जा नसल्याने बिलांचे नियमही या रुग्णालये पाळत नाहीत. गेल्या काही दिवसांत अशा रुग्णालयांमध्ये असलेल्या रुग्णांनाही करोना आजारात जीवनदार देणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा मारा केला जात होता.

कोणत्याही मार्गाने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून ते या रुग्णांना दिले जात होते. अनेकदा रुग्णालये स्वत:ही इंजेक्शनचे चढ्या दराने रुग्णांना उपलब्ध करून देत होते. रुग्णही जीव वाचवण्यासाठी चढ्या दराने हे इंजेक्शन विकत घेत होते.

मात्र गेल्या काही काळात रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून सुरू झालेल्या गदारोळानंतर शासनाने या इंजेक्शनच्या वितरणासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार कोविड दर्जा असलेल्या रुग्णालयांतील औषधालयांत ही इंजेक्शन थेट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे इंजेक्शनचा होणारा काळाबाजार बंद होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकताच एक नियंत्रण कक्ष उभारून त्यात १५ अधिकाऱ्यांना पुरवठादार आणि रुग्णालयांतील मागणी पुरवठ्याचा समतोल राखण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या यंत्रणेमुळे आतापर्यंत कोविड दर्जा नसलेल्या रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्याचा मार्ग खुंटण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांची रेमडेसिविरची पंचाईत होणार आहे. त्यामुळे कोविड दर्जा नसलेले मात्र करोना संशयित रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालयेही चिंतेत पडली आहेत.

संशयित रुग्ण शासनाकडे वळवणे अशक्य

ठाणे जिल्ह्यात जितकी दर्जा असलेली कोविड रुग्णालये आहेत. तितकीच किंवा बहुधा त्याहून अधिक दर्जा नसलेली रुग्णालयेही आहेत, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील एका ज्येष्ठ  डॉक्टरने दिली आहे. या रुग्णालयांमध्ये सध्या एचआरसीटी स्कॅन, रक्तचाचणीवरून उपचार केले जातात. त्यांना रेमडेसिविर मिळणे अशक्यप्राय होणार आहे. तसेच एवढे संशयित रुग्ण शासनाकडेही वळवणे अशक्य आहे.

शासकीय नियमांनुसार आता कोविड दर्जा असणाऱ्या रुग्णालयांना थेट रेमडेसिविरचा पुरवठा केला जात आहे. दर्जा नसलेल्या रुग्णालयांमध्ये पुरवठ्याचा मोठा प्रश्न समोर आहे. त्याबाबत वरिष्ठांची चर्चा सुरू आहे. – राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे</strong>