शीघ्र प्रतिजन चाचणी सक्तीची केल्याचा परिणाम
ठाणे : शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मॉलमध्ये प्रवेशासाठी शीघ्र प्रतिजन चाचणी सक्तीची केली आहे. या चाचणीत नकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्तींनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे. तर सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. यामुळे चाचणी सक्तीच्या भीतीमुळे मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत २५ ते ३० टक्क््यांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या पार गेली असून हा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत. शहरातील मॉलमध्ये मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने मॉल व्यवस्थापकांना काही नियम आखून दिले आहेत. तसेच मॉलमध्ये प्रवेशासाठी शीघ्र प्रतिजन चाचणी गेल्या आठवड्याभरापासून सक्तीची केली आहे. मात्र, त्याचा परिणाम मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येत आहे. मॉलच्या प्रवेशद्वारावर होत असलेल्या शीघ्र प्रतिजन चाचणीमुळे ग्राहकांनी मॉलकडे पाठ फिरवली असून ग्राहकांच्या संख्येत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
पाच ते सहा महिन्यांपूर्वी करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर मॉल सुरू करण्यात आले होते. त्यामुळे मॉलचे अर्थचक्र रुळावर येत असतानाच आता मॉलला करोनाच्या दुसरा लाटेचा फटका बसू लागल्याचे चित्र आहे.
मॉल प्रशासनाची नाराजी
ठाणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने गेल्या दहा ते बारा दिवसांपासून महापालिका प्रशासनाने मॉलमध्ये प्रवेशासाठी शीघ्र प्रतिजन चाचणी सक्तीची केली असली तरी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मॉलमधील ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. रेल्वे तसेच बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अंतरसोवळ्याच्या नियमाचे उल्लंघन होत असतानाही शासनाकडून त्यांच्यावर कोणतेही निर्बंध घातले जात नाहीत. पण, मॉलमध्ये शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन होत असतानाही मॉल तसेच हॉटेलवर निर्बंध घालण्यात आले आहे, अशी नाराजी विवियाना मॉलच्या मुख्य विपणन अधिकारी रिमा कीर्तीकर यांनी व्यक्त केली.