काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपचे नेते सीताराम येचुरी या दोघांविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विवेक चंपानेरकर यांनी १ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात शनिवारी झाली. न्यायालयाने राहुल गांधी आणि येचुरी यांना समन्स तसेच नोटीस बजावली असून या दोघांना पुढील सुनावणीसाठी ३० एप्रिलला न्यायालयात हजर राहावे लागणार असल्याची माहिती विवेक चंपानेरकर यांचे वकील आदित्य मिश्रा यांनी दिली.

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांनी या हत्येमागे आरएसएस विचारधारा असल्याची टीका केली होती. यानंतर चंपानेरकर यांनी आठवडय़ाभरापूर्वी राहुल गांधी आणि येचुरी यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात १ रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा केला होता.