विकास आराखडय़ाची ४० टक्के अंमलबजावणी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेला विकास आराखडा कालबाह्य़ होण्यासाठी तीन वर्षे शिल्लक राहिल्यामु़ळे प्रशासनाने शहराच्या विकासाची पुढील २० वर्षांची दिशा ठरविणारा विकास आराखडा आखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, विद्यमान विकास आराखडय़ात आरक्षित करण्यात आलेल्या ४०४ भूखंडांपैकी केवळ ६७ भूखंडांचा विकास करणे पालिकेला शक्य झाले आहे. विकास आराखडय़ाचीही एकूणपैकी केवळ ४० टक्के अंमलबजावणी गेल्या दहा वर्षांत करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेची स्थापना १ ऑक्टोबर १९८२ रोजी झाली. त्यावेळेस या महापालिकेत ३२ महसुली गावांसह नगरपालिकेचा समावेश करण्यात आला होता. महापालिकेचे एकूण क्षेत्र १२८.२३ चौरस किलोमीटर इतके आहे. त्यावेळेची लोकसंख्या, भौगोलिक रचना, उपलब्ध जमीन या आधारे शहराची विकास योजना महापालिकेने तयार केली होती. या योजनेच्या काही भागास राज्य शासनाने ४ ऑक्टोबर १९९९ रोजी मंजुरी दिली होती. तर, यातून वगळलेल्या भागांसाठी सुधारित विकास योजना तयार करण्यात आली. त्यास ३ एप्रिल २००३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्याचीही अंमलबजावणी पालिकेने १४ मे २००३ पासून सुरू केली होती. ही योजना २० वर्षांपासून लागू करण्यात आली होती. त्यामुळे हा विकास आराखडा कालबाह्य़ होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला असून १३ मे २०२३ पर्यंत महापालिकेला शहराचा नवीन सुधारित आराखडा सादर करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी विशेष समितीची पालिकेने स्थापनाही केली आहे.

या समितीमार्फत मंजूर विकास योजनेची फेरतपासणी करणे, महापालिका क्षेत्राचे नव्याने सर्वेक्षण करणे आणि विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करणे तसेच पुढील प्रक्षेपित लोकसंख्येच्या आधारे विकास योजना सुधारित करणे, अशी कामे केली जाणार आहेत. असे असतानाच गेल्या २० वर्षांत महापालिकेने विकास आराखडय़ाची शंभर टक्के अंमलबजावणी करणे शक्य झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. ठाणे शहराच्या विकास आराखडय़ात ४०४ भूखंड आरक्षित होते. त्यापैकी नियमानुसार गेल्या दहा वर्षांत ६७ भूखंड महापालिकेने विकसित केले आहेत. तसेच आतापर्यंत केवळ विकास आराखडय़ाची केवळ ४० टक्केच अंमलबजावणी झाली असल्याची बाब महापालिका पर्यावरण अहवालातून समोर आली आहे.

 

२५ लाख  ठाण्याची लोकसंख्या ४६ टक्के शहरातील विकसित क्षेत्र

भूक्षेत्र विभागणीची टक्केवारी

भूक्षेत्र               क्षेत्र (हेक्टर)     टक्केवारी

रहिवास                      २६६५.६१       २०.७८

औद्योगिक                  १२५४         २.७८

राखीव                      १२६७.६५       ९.८८

रस्ता अंतर्गत क्षेत्र       ७४२.९७       ५.७९

संरक्षण क्षेत्र               १२२            ०.९५

वन क्षेत्र                     ३५६०           २७.७६

हरित क्षेत्र                  ३२११.७७       २५.७६

एकूण                        १२८२३           १००