टाळेबंदीच्या काळात ग्राहकापर्यंत थेट भाजीपाला पोहोचावा, यासाठी पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातील शेतकरी व्यापाऱ्यांनी मुंबई ठाण्यात थेट भाजी विक्रीचा प्रयत्न जोमाने सुरू केला आहे. आता कोकणातील हापूस आंबा ही मुंबई महानगर क्षेत्रातील वसाहतींच्या प्रवेशद्वापर्यंत पोहोचविण्यासाठी कोकणातील आंबा बागायतदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

या आंबा विक्रीसाठी कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने पुढाकार घेतला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या महापालिकांनी कोकणाची आंबा विक्रीसाठी यंत्रणा उभी करावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे.

मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीचा कालावधी हा कोकणाच्या हापूस आंबा निर्यातीचा सुवर्णकाळ असतो. मात्र, करोनामुळे देशातील तसेच परदेशातील वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने आंबा निर्यातीचा प्रश्न बागायतदारांसमोर उभा ठाकला आहे. यासाठी

रत्नागिरीतील शेतकऱ्यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील वसाहतींच्या प्रवेशद्वापर्यंत आंबा पोहोचविण्यासाठी नियोजन केले आहे. या नियोजनाला परवानगी मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या शेतकऱ्यांनी कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या या मागणीची कोकण विभागीय कृषी सहसंचालकांनी दखल घेतली आहे. तसेच सहसंचालक कार्यालयाने आंबा विक्रीच्या नियोजनासाठी पुढाकार घेतला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या महापालिकांना त्यांच्या क्षेत्रातील वसाहतींमध्ये आंबा विक्री करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. कोकण कृषी सहसंचालकांकडून बागायतदारांची ही मागणी पूर्ण झाल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे, असे मत रत्नागिरीचे आंबा बागायतदार बिपिन माने यांनी व्यक्त केले आहे.

साडे तीनशे रुपये डझनाने विक्री

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या महापालिकांमध्ये काम करणारे कर्मचारी हे शहरातील विविध भागांमध्ये राहतात. या कर्मचाऱ्यांची ते राहत असलेल्या वसाहतीमध्ये आंबा विक्री करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे महापालिका प्रशासनाला करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी ते राहत असलेल्या वसाहतींमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आंबा विक्री करण्यास पुढाकार घेतल्यास एका कर्मचाऱ्याला रत्नागिरीच्या शेतकरी गटांतर्फे १०० पेटी आंबे विक्री करण्यास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे आंबे ३५० रुपये डझन इतक्या दरात विक्री करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

यंदा करोनामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून यातून मार्ग काढण्यासाठी कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय प्रयत्न करत आहे. कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांना आंबा विक्रीसाठी करण्यात आलेल्या आवाहनाला सर्वच महापालिका प्रशासन उत्तम प्रतिसाद देत आहेत.

– विकास पाटील, कृषी सहसंचालक, कोकण विभाग.