12 July 2020

News Flash

दानयज्ञाला उद्यापासून सुरुवात!

या वार्षिक दानयज्ञाची पाचवी आवृत्ती उद्यापासून, गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू होत आहे.

उद्यापासून दररोज एका संस्थेच्या

कार्याची माहिती, पत्ता, दूरध्वनी क्रमांक व देणग्यांसाठी आवश्यक असलेला अन्य तपशील ‘लोकसत्ता’मध्ये क्रमाने प्रसिद्ध करण्यात येईल, आणि गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात हा एक आगळा दानयज्ञ संपन्न होईल. गणेशोत्सवानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
सरत्या श्रावणसरींच्या शिडकाव्यामुळे दुष्काळछायेच्या सावटातून सावरण्याच्या, दिलाशाच्या वातावरणात विघ्नहर्त्यां श्रीगणेशाचे आगमन होत आहे. तरीही दुष्काळावरून सुरू असलेले राजकारण, शाकाहार-मांसाहाराच्या वादात शिजू पाहणारी समाजातील कटुता, माँ-बाबा-बुवांचा ढोंगी बाजार, नियमांना डावलून आणि सामाजिक स्वास्थ्याचे सारे निकष धुडकावून रस्तोरस्ती मांडलेले बेदरकार मंडप, त्यातून होणारा सार्वत्रिक त्रास आणि सालाबादप्रमाणे भेडसावणाऱ्या लहानमोठय़ा चिंता आहेतच.. हे सारे सहन करीत भक्तिभावाने आपल्या आराध्य दैवताच्या आगमनासाठी अवघा महाराष्ट्र आतुर झाला आहे. उद्या घरोघरी आणि गल्लोगल्ली श्रीगणेशाची पूजा होईल. भक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागेल आणि विघ्नहर्त्यां गणेशाच्या मंत्रपुष्प-आरतीच्या सुरात सारी दुखे, व्यथा-वेदना तात्पुरत्या का होईना, हलक्या होतील.. कारण, जगण्याची आणि सहन करण्याची नवी ताकद देण्याची शक्ती या उत्सवात आहे. एका बाजूला काहीसे निराशेचे सूर उमटत असले, तरी या वातावरणाला दिलाशाची किनारदेखील आहे. समाजात विधायक कार्याचा वसा घेऊन अनेक व्यक्ती-संस्था निरपेक्षपणे समाजमन घडविण्याच्या कार्यात गुंतलेल्या आहेत. ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून या संस्थांची एक विधायक साखळी गेल्या पाच वर्षांत ‘लोकसत्ता’ने बांधली. या वार्षिक दानयज्ञाची पाचवी आवृत्ती उद्यापासून, गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू होत आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक जाणिवेने काम करणाऱ्या दहा नव्या संस्थांची ओळख या उपक्रमातून ‘लोकसत्ता’
परिवारातील लाखो वाचकांना होणार आहे. या सत्कार्यात सहभागी होण्याची अनेकांची अतीव इच्छा असते. मात्र, व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा अन्य अनेक कारणांमुळे त्यामध्ये थेट सहभाग शक्य होत नाही. अनेकदा ती एक खंत होऊन राहते. अशा वेळी, आपल्याच आसपास, कुणीतरी आपल्या मनातल्याच कामात झोकून दिल्याची माहिती मिळते, आणि त्यामध्ये सहभागी होण्याच्या इच्छापूर्तीचा क्षण जवळ येतो. ‘लोकसत्ता’च्या पाचव्या वर्षीच्या या उपक्रमातून अशा एकूण ५० संस्थांचे काम समाजासमोर येत आहे. यंदा गणेशोत्सवकाळात नव्या दहा संस्थांचा परिचय करून दिला जाणार आहे. या संस्थांचे कार्य हे समाजाला विधायक दृष्टी आणि वाटचालीची दिशा देणारे ठरेल अशी आमची खात्री आहे. समाजाचा आधार बनण्यासाठी धडपडणाऱ्या या संस्थांना समाजाकडूनही आधाराची गरज आहे. आपली सत्कार्याची इच्छा आणि या संस्थांची गरज यांची सांगड घालण्यासाठी ‘लोकसत्ता’ हे निमित्त ठरते, हे समाधानही मोलाचे आहे. दरवर्षांप्रमाणे यंदाही या संस्थांना लोकसत्ता परिवार व हितचिंतकांकडून मोलाचा आर्थिक हातभार लागेल आणि हीच समाजातील दुख, विघ्ने दूर करणाऱ्या विनायकाची खऱ्या अर्थाने आराधना ठरेल, अशी खात्री आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2015 3:55 am

Web Title: donation program begin from tomorrow
Next Stories
1 ‘निवडक भाषाच बालसाहित्याने समृद्ध’
2 प्रेमसंबंधातून महिला आयएएस अधिकाऱ्यास मारहाण
3 प्रतिकूल परिस्थितीतील ग्रंथसेवा
Just Now!
X