‘लोकसत्ता अर्थभान’मधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन; रविवारी बदलापूरमध्ये कार्यक्रम

मुंबई : लोकसभा निवडणूक असल्याने सादर होणाऱ्या यंदाच्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत फारशी अपेक्षा नसली तरी बचत, गुंतवणुकीच्या दृष्टीने काही प्रमाणात होणाऱ्या बदलाबाबत नक्कीच उत्सुकता आहे. ही घटिका जवळ येत असताना नव्या वित्त वर्षांतील आर्थिक नियोजनाचे धोरण काय असावे, विद्यमान बदलत्या अर्थस्थितीत उत्पन्न व खर्च यांचा मेळ कसा राखावा, याबाबतचे मार्गदर्शन जाणून घ्यायचे असेल तर येत्या रविवारी बदलापूरमध्ये होत असलेल्या ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रमाला जरूर भेट द्या!

‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा कार्यक्रम रविवारी सकाळी १०.३० वाजता काटदरे मंगल कार्यालय, गांधी चौक, कुळगाव, बदलापूर (पूर्व) येथे पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे. तसेच निमंत्रितांकरिता काही जागा राखीव आहेत. यावेळी उपस्थितांना गुंतवणूकविषयक प्रश्न मांडण्याची संधी आहे.

गुंतवणूक, बचत तसेच भांडवली बाजार, म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक यावेळी उपस्थित राहणार आहेत. उत्पन्न, खर्च, बचत व गुंतवणूक यांचा मेळ व महागाईवर मात देणारे धोरण तयार करणे याबाबत ‘गुंतवणुकीचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे मार्गदर्शन करतील. वयाच्या व उत्पन्नाच्या विविध टप्प्यातील गुंतवणुकीचे नियोजनही ते यावेळी सांगतील. तर म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजार, त्यात सूचिबद्ध समभाग यांचा आढावा, गुंतवणुकीबाबतची दिशा, याबाबत आर्थिक सल्लागार सुयोग काळे सांगतील. बाजारातील घडामोडीं परिणाम तसेच फंडांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े हेही ते यावेळी नमूद करतील.

कधी

रविवार, १३ जानेवारी २०१८

सकाळी १०.३० वाजता

कुठे

काटदरे मंगल कार्यालय, गांधी चौक, कुळगाव, बदलापूर (पूर्व)

वक्ते

कौस्तुभ जोशी :

अर्थनियोजनाचा  श्रीगणेशा

सुयोग काळे

म्युच्युअल फंड आणि

समभाग गुंतवणूक