ठाणे : वडील लग्न करून देतील म्हणून वांगणी परिसरातील दोन सख्ख्या बहिणींनी घरातून पलायन केले होते. या दोन्ही बहिणींचा पोलिसांनी २४ तासांत शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. वडील चेष्टेने त्यांना लग्नाबद्दल बोलत होते. या मुलींनी ते खरे समजून घरातून पलायन केले होते, अशी माहिती कुळगाव बदलापूर पोलिसांनी दिली.

वांगणी येथील ढवळेपाडा भागात १५ आणि १६ वर्षीय मुली त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात. यातील १५ वर्षीय तरुणी सातवीत तर १६ वर्षीय तरुणी नववीत शिकते. त्यांचे वडील त्यांना चेष्टेने तुमचे लवकरच लग्न लावून देतो असे म्हणत असत. यामुळे घाबरलेल्या या दोन्ही तरुणींनी १३ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजता घरातून पलायन केले. आई-वडिलांनी त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्ना केला.  मात्र त्यांचा शोध लागला नाही. अखेर दुपारी त्यांच्या आई-वडिलांनी त्या हरविल्याची तक्रार कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्यात केली. मुंलींकडे  मोबाइल नसल्याने त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. याच दरम्यान आणखी एक १५ वर्षीय तरुण गावातून गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या आई-वडिलांनीही पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याच्याकडे मोबाइल होता. पोलिसांनी तात्काळ त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा फोन बंद होता. तर त्याचे शेवटचे स्थळ रायगडमधील कर्जत रेल्वे स्थानक दर्शवीत होते. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि मुरबाडचे उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने कर्जत रेल्वे स्थानकात तपास सुरू केला.  १४ ऑक्टोबरला पुन्हा या तरुणाचे मोबाइलवर शेवटचे स्थळ तपासले असता ते वांगणी भागात दिसले. पथकाने तात्काळ हालचाली सुरू करून या तरुणाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत घरातून पळून गेलेल्या दोन मुली होत्या.  तिघांनीही एका मुख्य मार्गावरून जाणाऱ्या टेम्पोला हात करून कर्जत गाठले. तेथील एका मंदिरात तिघेही थांबले. दुसऱ्या दिवशी पैसे संपल्यानंतर पुन्हा टेम्पोला हात करून वांगणीत आले. त्यांचे वडील त्यांना लग्नाबद्दल चेष्टने म्हणत होते. त्यामुळे या दोघींनी घरातून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले.