चुलत्याचे शिर दुचाकीवरून नेऊन कचराभूमीत फेकल्याचे उघड

ठाणे : चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचे शिर धडावेगळे करून ते दिवा कचराभूमीवर टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शीळ डायघर पोलिसांनी याप्रकरणी मृत व्यक्तीचा पुतण्या अमित नागरे याच्यासह निहाल हांडोरे, अविनाश वानखेडे, शुभम ढबाले, अमर शर्मा यांना अटक केली आहे.

शिळ डायघर येथील पिंपरी गाव परिसरात १५ नोव्हेंबरला एका डोंगराच्या पायथ्याशी शिर नसलेले धड पोलिसांना आढळले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. हे धड कोणाचे आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. याच दिवशी सकाळी विष्णू नागरे नावाची व्यक्ती हरवल्याची तक्रार शिळ डायघर पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलिसांनी विष्णू यांच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेह दाखविला. त्यावेळी हा मृतदेह विष्णू यांचाच असल्याचे नातेवाईकांनी सांगितल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांचे पथक करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी विष्णू यांचा पुतण्या अमित नागरे याची चौकशी सुरू केली असता, त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे पोलिसांना मिळत नव्हती. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाच्या गुन्ह्य़ाची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी सर्वप्रथम विष्णू यांचे शिर दिवा कचराभूमीतून शोधून काढले. त्यानंतर तांत्रिक तपास करून त्याच्या इतर चार साथीदारांनाही अटक केली.  अमित याच्या वडिलांचा २०१६ मध्ये आजारपणात मृत्यू झाला होता. मात्र, वडिलांवर विष्णू नागरे यांनी करणी केल्याचा संशय अमितच्या मनात होता. विष्णू यांची हत्येचा विचार त्याच्या मनामध्ये आल्यानंतर त्याने याची माहिती त्याच्या इतर चार साथीदारांना दिली. १४ नोव्हेंबरला रात्री विष्णू यांना या पाचही जणांनी डोंगर पायथ्याजवळ मद्यपार्टी करण्यासाठी बोलावले व त्यांची हत्या केली.