तस्करीत जप्त केलेले ७० कासव वनविभागाकडे
ठाणे : मुंबई, ठाण्यात तस्करी करून घरात बेकायदा पाळलेल्या ‘स्टार’ प्रजातीच्या ७० कासवांची सुटका करून ठाणे वन विभागाने या कासवांना ताडोबा अभयारण्यात सोडण्यास सुरूवात केली आहे.
पूर्वी जप्त करण्यात आलेल्या कासवांना कर्नाटक राज्यात सोडले जात होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच ताडोबा अभयारण्यात स्टार कासवाची प्रजाती आढळून आल्याने आता वन विभागाने या अभयारण्यात हे कासव सोडण्यास सुरूवात केली आहे. राज्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग करण्यात येत असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्टार कासव ही प्रजाती भारतीय असून ती वन्यजीव सुरक्षा कायद्यांतर्गत येते. मात्र, अनेकजण या कासवांची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी करत असतात. तर काहीजण या कासवांना घरी पाळत आहेत. ठाणे वन विभागाने गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणी कारवाई करून ७० स्टार कासव जप्त केली होती. हे कासव ठाणे वन विभागाच्या ताब्यात होती. त्यांना मुक्त करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानुसार या ७० कासवांना टप्प्याटप्प्याने ताडोबा अभयारण्यात सोडण्यात येत आहे. मंगळवारी २१ कासवांना वन विभागाने ताडोबा अभयारण्यात सोडले आहे. या कासवांवर वन विभाग लक्ष ठेवत असून कासवांच्या प्रकृतीमध्ये बिघाड न झाल्यास उर्वरित कासवांनाही याठिकाणी सोडण्यात येणार आहे. ताडोबा अभयारण्यात स्टार कासवे आढळून आली होती. त्यामुळे कर्नाटक ऐवजी ताडोबा अभयारण्यातच या कासवांना सोडण्याचा निर्णय घेतला. राज्याबाहेर कासवांना सोडण्याऐवजी राज्यातच कासवांना ठेवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचे उप वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले.
दोन दिवसांचा प्रवास
ठाणे ते ताडोबा अभयारण्य हा दोन दिवसांचा प्रवास या कासवांनी केला. त्यांना एका कंटेनरमधून नेण्यात येत होते. तसेच कासवांना ताण येऊ नये म्हणून प्रत्येक तीन तासांनी वाहन थांबविण्यात येत होते. कासवांची तपासणी करून त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू होता. असे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी सांगितले.