12 December 2017

News Flash

‘मार्ग यशाचा’ जाणून घेण्यासाठी तुफान गर्दी

भल्या सकाळपासूनच टिप-टॉप प्लाझा सभागृहाबाहेर विद्यार्थी-पालकांची गर्दी जमली होती.

प्रतिनिधी, ठाणे | Updated: May 20, 2017 1:50 AM

उच्चशिक्षणाच्या पर्यायांबाबत ‘लोकसत्ता’च्या कार्यशाळेत अमूल्य मार्गदर्शन

सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टय़ा असल्यामुळे विद्यार्थीवर्गासाठी मौजमस्तीचे दिवस असले तरी, करिअरबाबत आजचा विद्यार्थी किती सावध आहे, याचेच प्रत्यंतर शुक्रवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतून मिळाले. ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाद्वारे करिअरच्या नव्या वाटा जाणून घेण्यासाठी व आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी तुफान गर्दी केली होती.

उच्चशिक्षणाच्या उंबरठय़ावर करिअरचा मूलमंत्र जाणून घेण्यासाठी मोठय़ा संख्येने जमलेले विद्यार्थी, आपल्या पाल्याला करिअरची अचूक दिशा गवसावी यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले पालक आणि विविध क्षेत्रांत उत्कृष्ट पदावर कार्यरत असलेल्या तज्ज्ञांचे करिअरविषयक मार्गदर्शन या त्रिवेणी संगमामुळे शुक्रवारी टिप-टॉप प्लाझाच्या सभागृहास ज्ञानकेंद्राचे स्वरूप प्राप्त झाले होते. करिअरबाबत मनात असलेल्या अनेक शंका घेऊन विद्यार्थी अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत सहभागी झाले. भल्या सकाळपासूनच टिप-टॉप प्लाझा सभागृहाबाहेर विद्यार्थी-पालकांची गर्दी जमली होती. मात्र, प्रचंड गर्दी असतानाही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्याचे आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन झाल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.

ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शासकीय सेवेतील संधी आणि आव्हानांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. शासकीय सेवेत लागणारी सहनशीलता, यशासाठी वाट पाहण्याची तयारी असणे याबाबतीत सत्यनारायण यांनी उलगडलेल्या बाबींवर चर्चा करताना विद्यार्थी अक्षरश: गुंगून गेले होते. ताणतणावावर मात करत यशापयशाचा सामना कसा करावा, याबाबत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले. त्यामुळे एकूणच करिअरबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनावर असलेला ताण हलका झाल्याचे दिसून आले.  केवळ डॉक्टर आणि इंजिनीयर हेच करिअरचे पर्याय नसून करिअरच्या वेगळ्या वाटा निवडत आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर असलेले जाहिरात क्षेत्रातील अभिजीत करंदीकर, आवाजातील करिअरविषयी प्रसिद्ध आर. जे. रश्मी वारंग, डिजिटल मीडियातज्ज्ञ मिहिर करकरे, क्रीडातज्ज्ञ वर्षां उपाध्ये या तज्ज्ञांच्या चर्चासत्राने विद्यार्थ्यांना करिअरचे नवे पर्याय खुले करून दिले. विवेक वेलणकर यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना विविध विषय शाखांची ओळख करून दिली. नीट आणि जेईई परीक्षेविषयक विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या भीतीचे निरसन प्रा. किशोर चव्हाण, प्रा. विनायक काटदरे यांनी चर्चासत्रातून केले. यावेळी मार्ग यशाचा जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

प्रायोजक

अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत. विद्यालंकार आणि एमआयटी-आर्ट, डिझाइन अण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे हे असोसिएशन पार्टनर आहेत. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स हे सपोर्टेड बाय पार्टनर आहेत. युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलेपमेंट, सासमिरा, विजय शेखर अ‍ॅकॅडमी आणि लक्ष्य अ‍ॅकॅडमी हे पॉवर्ड बाय पार्टनर्स असून युअरफिटनेस्ट या कार्यशाळेचे हेल्थ पार्टनर आहेत.

First Published on May 20, 2017 1:48 am

Web Title: good response to loksatta marg yashacha