याचिकाकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची ठाण्याच्या महापौरांची मागणी

ठाण्यातील उदयनगर भागात झाड अंगावर कोसळून झालेल्या अपघातात वकील किशोर पवार यांना जीव गमवावा लागल्याने या मुद्दय़ावरून सुरू झालेल्या वादात आता महापौर मीनाक्षी िशदे यांनी उडी घेतली आहे. या मृत्यूप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या जोर धरत असताना वृक्षांच्या फांदी छाटण्यासंबंधी राष्ट्रीय हरित लवादने मध्यंतरी दिलेल्या स्थगिती निर्णयावर महापौर शिंदे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शिवाय वृक्ष पडून होणाऱ्या जीवितहानीस संबंधित याचिकाकर्त्यांस जबाबदार धरावे आणि त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका घेतल्याने महापौर विरुद्घ पर्यावरणप्रेमी अशा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील उदयनगर भागात झाड अंगावर कोसळून वकील किशोर पवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापालिका प्रशासनावर टीकेचे भडिमार होत असून या घटनेप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. असे असतानाच ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षांच्या छाटणीसंबंधी दिलेल्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उभे करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

एकतर्फी निर्णय अयोग्य..

मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्य़ांबरोबर ठाणे महापालिका क्षेत्रातही वृक्ष कोसळण्याचे प्रकारात जीवित व वित्तहानी झाली आहे. त्यामुळे वृक्षांची छाटणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादकडे मध्यंतरी दाद मागितली होती. या याचिकेवर लवादाने झाडाच्या फांद्या छाटणीबाबत दैनंदिन तक्रारींवर वृक्ष अधिकाऱ्यांनी स्वत:च्या अधिकारात निर्णय घेऊ नये, असा निर्णय दिला. यासंबंधी फांद्या छाटणी आणि वृक्षतोडीसंबंधी धोरण ठरविण्याच्या सूचनाही लवादाने केल्या. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादच्या या निर्णयाला हरकत घेत महापौर मीनाक्षी िशदे यांनी अशा घटनांना जबाबदार धरून याचिकाकर्त्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. यावेळी महापालिका प्रशासनाचे मत किंवा अभिप्राय, पावसाळ्यात प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. शिवाय एका याचिकेचा आधार घेऊन दिलेल्या निर्णयामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसाच महापालिकेच्या अधिकारावर गदा आणणारा आणि ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’ या बाबींनाही हरताळ फासणार आहे, असे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कुठलाही अभ्यास किंवा विचार करून हे पत्र दिलेले नाही. कदाचित हे पत्र त्यांनी चुकून दिले असावे. तसेच त्यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन मगच आपले मत मांडावे.

प्रदीप इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ते.